नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

20) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

वृत्तपत्रे वाचाल, तर वाचाल...(लेख क्र . २०)

वृत्तपत्रे वाचाल, तर वाचाल
 
स्पर्धापरीक्षा द्यायच्या म्हणजे वृत्तपत्रांच्या सखोल वाचनाला पर्याय नाही. पण, वाचन कसे करायचे हे कोडे अनेकांना पडलेले असते. आज आपण याची उकल करायचा प्रयत्न करू.

सर्वप्रथम सामान्य वाचकांने वृत्तपत्र वाचणे व स्पर्धापरीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे वाचन यात फरक पडतो. सर्वसामान्य वाचक बातम्या वाचतो. तर स्पर्धापरीक्षा देणारा उमेदवार बातम्यांमधून माहितीचा शोध घेतो. दोन बातम्या एकमेकांशी जोडून काही नवीन आकलन घडते का हे बघतो. वृत्तपत्रे हा त्याच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग असतो.

पण, त्यात नक्की काय वाचायचे यात काहीचा गोंधळ उडतो. मला एक विद्यार्थी म्हणाला की, पेपर वाचनात त्याचा पूर्ण दिवस जातो. मी उडालोच, म्हटले कसे काय? तर उत्तरला की, तो पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत सर्वकाही वाचतो. मी डोक्यालाच हात लावला. तुम्हाला परीक्षेचा पेपर काढायला सांगितले, तर तुम्ही वृत्तपत्रातील कोणता भाग निवडाल? या प्रश्नाच्या उत्तरात काय वाचायचे त्याचे उत्तर दडलेले आहे. साधारणपणे दोन ते तीन दिवस चर्चेत राहिलेल्या गोष्टी पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाच्या असतात. तर ज्या घडामोडी आठवडा किंवा त्याहून जास्त दिवस चर्चिल्या गेल्या त्या मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाच्या ठरतात. एखाद्या बातमीचे अनेक पैलू असू शकतात. जसे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व स्थानिक तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक आदी जास्तीत जास्त कोनांतून ती घटना बघता आली पाहिजे. तरच ती चांगली समजते. अभ्यासाच्या दृष्टीने खूप बारीकसारीक आकडेवारी, लोकप्रिय घोषणा किंवा वैयक्तिक मते वर्ज्य मानावीत.

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतील व्यक्ती बाजूला काढून त्यातील प्रक्रिया शोधून काढता आली, तर आपोआपच मुद्देसूद अभ्यास होऊ लागतो. वृत्तपत्रातील नकाशे, चित्रे, कार्टून नक्कीच पाहावीत. त्याप्रकारे लक्षात ठेवायला बरे जाते. वृत्तपत्र वाचताना प्रत्येक बातमी सखोल वाचण्याची गरज नाही. आधी बातम्या आणि त्यातील मजकूर यांची वरवरची छाननी (sciming) करायची. नंतर मजकूर आपल्या अभ्यासाला पूरक आहे असे वाटले, तरच खोलात जाऊन वाचन करायचे. काय पूरक आहे ते अभ्यासक्रम व मागील प्रश्नपत्रिका यांचे सातत्याने निरीक्षण केल्यावर कळते. उदा. सलमानची हिट अॅण्ड रन केस. आपल्याला तितकीशी महत्त्वाची नाही. पण, भारताने चांदीपूर येथे अस्त्र या क्षेपणास्त्रची चाचणी घेतली ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

पेपरवाचन वेळच्यावेळी संपवलेले कधीही चांगले. आठवडाभरचा गठ्ठा करून ठेवायचा व नंतर एकदम वाचायचे याने पेपर ताजा वाचण्यात जी मजा येते ती येत नाही. त्यामुळे बातम्यांची परिणामकारकताही कमी होते. वृत्तपत्र वाचताना आपले आधीचे पूर्वग्रह बाजूला ठेवावेत. लहान मुलांच्या निरागसतेने बातम्या वाचाव्यात. तरच त्या बातम्या आपल्यावर खोलवर परिणाम करतात. कल्पनाशक्तीला चालना

वृत्तपत्रवाचनाचा अजून एक फायदा म्हणजे कल्पनाशक्तीला चालना मिळते. आपण विविध घडामोडींचा आढावा सातत्याने घेऊ लागतो, तेव्हा आपोआपच आपण पुढे काय घडू शकते याचा अंदाज बांधू लागतो. आपली कल्पनाशक्ती कामाला लावतो. असे अंदाज बरोबर ठरल्याचे दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात दिसतात, तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. अंदाज चुकले तरी अंदाज का चुकले याचा आढावा घेऊन आपले आकलन धारदार व्हायला मदत होते.वाचक पत्रे

वृत्तपत्रातील आवर्जून वाचण्यासारखा भाग म्हणजे 'वाचकांची पत्रे'. लोकशाहीमध्ये लोकमताचे महत्त्व मोठे असते व ते वाचकांच्या पत्रातून प्रतिबिंबित होते. 'जनतेची स्मरणशक्ती अल्प असते,' असे म्हटले जाते. पण, ते काही खरे नाही हे वाचकांनी पत्रे वाचल्यावर कळते. त्यातून विविध व्यक्तिगत अनुभव मांडले जातात व त्यावरून एखादे सरकारी धोरण योग्य दिशेने चालले आहे की, नाही हे कळते. 'ये पब्लिक है, ये सब जानती है' हेच खरे! 

वृत्तपत्रांमध्ये विविध भाग असतात, जसे एक पान राष्ट्रीय घडामोडी. एक पान आंतरराष्ट्रीय घडामोडी, एक पान आर्थिक घडामोडी व एक पान क्रीडाविषयक घडामोडींनी व्यापले असते. काही उमेदवार त्यातील त्यांना ज्यात आवड असते उदा. क्रीडा तितकेच वाचतात. इतर पाने भराभर पालटतात. पण, हे बरोबर नाही. या सर्वच गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. एखाद्याला आर्थिक घडामोडीत रस नसेल, तर रस घेतला पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवण्याही महत्त्वाच्या असतात. त्यात समसामाईक विषयांची विविध सखोल चर्चा असते. उदा. इच्छामरण. पुरवण्यांच्या वाचनाचा सामान्य अध्ययनात फायदा तर होतोच, पण निबंध लेखनातही होतो. वृत्तपत्रांचे वाचन फारतर दोन तासात संपले पाहिजे. एकदा तंत्रावर पकड आली, की एक तासही पुरतो. पेपरमधून जे काही वाचू त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत. आपली सगळी राज्ये व सगळे शेजारी देश अशा प्रत्येकाला दोन ते तीन पाने ठेवून एक वही करायची व कोणतीही नवीन माहिती आढळली की ती तिथे नोंदवायची. उदा. लक्षद्विपच्या मिनीकॉय बेटावर म्हाल भाषा बोलतात जी मालदिवमधील भाषा आहे. लगेच लक्षद्विपच्या नोट्समध्ये जाऊन तशी नोंद करायची. अशा प्रकारे आपल्या सगळ्याच नोट्स जशा राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल वृत्तपत्राच्या सहाय्याने अपडेट करत जायच्या. या अपडेट करायच्या प्रक्रियेत आपण गुंतलो की, तिथे सुरू घडामोडींचे ओझे अर्ध्याने उतरते.







- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- मुख्य परीक्षेचा वाडा चिरेबंदी

No comments:

Post a Comment