ई-ज्ञानाचा खजिना...( लेख क्र . १९ )
परीक्षेसाठी उपयुक्त वेबसाइट
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांमध्ये आज भर पडली आहे, ती इंटरनेटची. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विविध गोष्टी या महाजालावर शोधत असतो. यूपीएससी परीक्षेसाठी इंटरनेट प्रभावीपणे वापरल्यास आपण भरपूर वेळ आणि ऊर्जा वाचवू शकतो. इंटरनेट म्हटले की नजरेसमोर येते गुगल. जगातील कोणतीही माहिती या सर्च इंजिनवर उपलब्ध आहे. पण इथे माहिती कशी शोधावी ही एक कला आहे. गुगल उघडल्यावर web, Images, map, video असे अनेक पर्याय आपल्याला दिसतात. त्याचा योग्य वापर करावा. उदा, तुम्हाला ग्रीसच्या अर्थव्यवस्थेविषयी माहिती हवी असेल तर Greece Financial Crisis असे टाइप करून newsवर क्लिक करावे, म्हणजे या विषयीची खडानखडा माहिती उपलब्ध होईल. गुगलनंतर सगळ्यात जास्त माहितीचा खजिना उपलब्ध असलेली वेबसाइट म्हणजे विकिपीडिया. येथे एखाद्या विषयावरची सखोल माहिती तुम्हाला मिळेल. कोणतीही घटना घडल्यानंतर ५ ते १० मिनिटांत या वेबसाइटवर संपूर्ण माहिती उपलब्ध असते. NCERTच्या पुस्तकांचे नागरी सेवा परीक्षेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही सर्व पुस्तके http://www.ncert.nic.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ती डाऊनलोड करून कधीही वाचता येतात. सर्व वृत्तपत्रे आणि मासिकांच्या स्वत:च्या वेबसाइट असतात. त्यांचा पुरेपूर वापर करावा. आपल्याला आवडलेली किंवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती किंवा लेख बुकमार्क करून ठेवावेत, जेणेकरून ते पुढे कामास येतील. योजना, कुरुक्षेत्र या मासिकांचे एक वर्षाचे अंक ऑनलाइन उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे India Year Book हा माहितीकोशही पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असतो. शासकीय योजना, कायदे, विधेयके यांच्या इत्यंभूत माहितीसाठी http://www.prsindia.org/ यावर भेट द्या, मात्र संपूर्ण वेबसाइट वाचायची गरज नाही. सारांश वाचला तरी पुरेसा आहे. त्याचप्रमाणे http://pib.nic.in/ या वेबसाइटला रोज एकदा तरी भेट द्या. महत्त्वाचे शासन निर्णय या वेबसाइटवर उपलब्ध असतात. पूर्व परीक्षेत भारतीय संस्कृतीवरील प्रश्नांची संख्या वाढली आहे. या विषयावरील सर्व प्रश्नांची तयारी ccrtindia.gov.in यावरून मिळेल. www.gktoday.in यावर भरपूर वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध आहे. अर्थशास्त्राच्या संकल्पना arthpedia यावर आढळतील. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विश्वकोश किंवा कुमार विश्वकोश या वेबसाइट उपयुक्त ठरतील. indiankanoon.org, india.gov.in/ या वेबसाइट विविध टप्प्यांवर कामास येतात. शिवाय गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमासाठी आपलं भविष्य घडवणारं www.upsc.gov.in ही वेबसाइट आहेच!
महत्त्वाची अॅप्लिकेशन्स
स्मार्टफोन आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. पण हा स्मार्ट फोन अधिक स्मार्टपणे वापरला तर आयुष्य सुकर होऊ शकते. दर पाच मिनिटांनी फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर काही आलंय का हे बघण्यासाठी आपण फोन बघत असतो. त्याच फोनमध्ये Constitution of India हे अॅप डाऊनलोड केले आणि चहा पिता-पिता एखादं कलम वाचलं तर? चांगली कल्पना आहे ना? आपण वाचत असलेल्या वृत्तपत्राचे अॅप जर वापरले तर तयारी आणखी सोपी होऊ शकते. प्रवासात येता-जाता यूट्युबवर एखादे व्हिडीओ ट्युटोरिअल बघितला तर हा वेळही सत्कारणी लागू शकतो. डीडी न्यूज, एअरसारखे अॅप शासन निर्णयांसाठी उपयुक्त आहेत. व्हॉट्सअपवरही (फक्त) अभ्यासविषयक बाबींसाठी ग्रूप तयार करून उपयुक्त माहितीची देवाणघेवाण होऊ शकते.
इंटरनेट वापरतानाची काळजी
इंटरनेट हे अभ्यासासाठी प्रभावी माध्यम ठरत असले तरी ते पुस्तकांना पर्याय नाही. तेव्हा आपला नेहमीचा अभ्यास सुरू ठेवा. इंटरनेट किती आणि कोणत्या वेळी वापरावे हे आधी ठरवून घ्या. अभ्यास करताना इंटरनेट वापरताना फेसबुक आणि ट्विटरचा मोह कटाक्षाने टाळावा. यूट्युबचा वापर करत असाल, तर फक्त उपयुक्त व्हिडीओ बघण्यासाठीच करा. व्हॉट्सअपवर अभ्यासासंबंधी ग्रूप असेल तर फक्त तीच माहिती शेअर करा. वायफळ गप्पा टाळा, अन्यथा वेळ वाया जाण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही. विकसित तंत्रज्ञानामुळे माहितीचा विस्फोट होतोय. पण आपले इप्सित साध्य करण्यासाठी आपण त्याचा कसा वापर करतो, यावर यशापयश अवलंबून आहे. तेव्हा तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, हे सतत लक्षात ठेवा आणि पुढे जा.
-रोहन नामजोशी,
( स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ )
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
अंतिम निकालाचा क्षण...(लेख क्र . १८)
यशाचा ध्यास आणि प्रयत्न
निकालानंतर यशस्वी विद्यार्थी एकाएकी सेलिब्रिटी होतात. एका दिवसात त्यांचे आयुष्य बदलून जाते. या सगळ्या लखलखाटात त्यांनी घेतलेली मेहनत, यशाचा ध्यास व प्रयत्न बहुतांश वेळा समोर येत नाहीत. निकालाकडे बघितले तर, दिसेल की यशस्वी उमेदवारांना अगदी पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, तरी ते ध्यास न सोडता यश मिळेपर्यंत प्रयत्न करतात. हे करताना अडचणी येत नाहीत, असे नाही. ग्रामीण भागातील अनेक मुले शहरामध्ये अभ्यासासाठी राहतात, मुलींना तर तेही शक्य होत नाही. मार्गदर्शन घेण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. तेही काहींसाठी अशक्य असते. पुस्तके वेळेवर मिळणे, अभ्यासासाठी चांगली जागा उपलब्ध असणे अशा छोट्याछोट्या गोष्टीही अनेकांसाठी मोठ्या ठरतात.
घरच्यांचा पाठिंबा व सहकार्य
घरच्यांचा पाठिंबा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. जर घरच्यांना विश्वासात घेतले असेल, तरच हा कठीण प्रवास सोपा होतो. यशस्वी उमेदवारांच्या यशावरच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर त्यांनी आपल्या घरच्यांचे मानलेले आभार हा समान मुद्दा आहे. कारण शेवटी मार्गदर्शन, पुस्तके, वाचायची जागा हे बाह्यघटक आहेत. ते एकवेळ जुळवता येतात, पण घरून पाठिंबा नसेल, तर मानसिक स्वास्थ्य ठिक राहात नाही आणि मग कितीही वेळा (आणि वर्षे) अभ्यास केला, तरी यश अशक्य ठरते. यशस्वी उमेदवारांची आणखी एक समान बाब म्हणजे त्यांनी दूरवर दृष्टी ठेवून दीर्घकालीन नियोजन केलेले असते. त्यामुळे त्यांचे काही निर्णय चुकल्यासारखे वाटले किंवा चुकले तरी ते अंतिम यशापर्यंत पोहोचतातच. या सर्व उमेदवारांनी परीक्षा द्यायचा निर्णय स्वतः घेतलेला असतो किंवा घरच्यांनी त्यांना सांगितले असते. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांना हा निर्णय पटलेला असतो.
अभ्यास कुठे केला?
यशस्वी उमेदवारांची पदवीची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. त्यांनी निवडलेले वैकल्पिक विषयही वेगवेगळे आहेत. त्यांच्या अभ्यासाची पद्धत व यशाचा मार्गही वेगळा असेल, पण एक सामायिक गोष्ट म्हणजे त्यांनी शहरांमध्ये अभ्यास केला किंवा त्यांनी अभ्यासाचा महत्त्वाचा टप्पा शहरात जाऊन समजून घेतला. यात ग्रामीण भागाला कमी लेखण्याचा भाग नाही. पण उत्तम ग्रंथालये, मार्गदर्शन व सराव परीक्षेची सोय शहरांमध्ये असते हे खरेच आहे. या यशस्वी उमेदवारांपैकी अनेकांनी सरकारने चालवलेल्या प्रशिक्षण संस्थांचा कधी ना कधी लाभ घेतलेला असतो, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे खासगी मार्गदर्शन घेण्याची ऐपत नाही, त्यांच्यासाठी सरकारने मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर अशा ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत. तिथे पुस्तके, वाचनालय, हॉस्टेल व विद्यावेतन अशी सोय केली जाते. ग्रामीण विद्यार्थ्यांना तर याचा खूपच फायदा होतो.
त्याशिवाय या उमेदवारांनी शक्य तेथून व शक्य तेवढ्यांकडून यशासाठीची सामग्री मिळवलेली असते. त्यात कोणताच मिंधेपणा नाही व मान-अपमानाचा मुद्दा नाही. तुमचा हेतू जर उदात्त असेल, तर विद्यार्जनासाठी मदत घ्यायची लाज वाटू नये आणि घेणाराच एके दिवशी देणारा होतो. ज्ञान ही जगातील एकमेव गोष्ट आहे, जी वाटल्याने वाढते. निकालातील बहुतेक जण एकमेकांना ओळखतात व त्यांनी एकमेकांना मदत केलेली असते. त्यातूनच सगळ्यांना यश मिळते.
आज अपयश, उद्या यश
यशस्वी उमेदवारांमागे अनेक अपयशी होणारेही असतात. पण अशा कोणत्याही मोठ्या परीक्षेत ते होणारच. याचा अर्थ त्यांनी परीक्षा देऊन चूक केली, असा होत नाही. मुळात या परीक्षेतून इतकी निवडक मुले यशस्वी होतात, की अपयशी उमेदवारांना अपयशी तरी कसे म्हणायचे? आजचे यशस्वी हे काल अपयशी होते व आजचे अपयशी उद्याचे सत्कारमूर्ती असणार आहेत. कोणी राखीव यादीतून पद काढतात. जे उमेदवार पद स्वीकारत नाहीत, त्यांच्या जागा राखीव यादीतून भरल्या जातात. त्याचा निकाल एका वर्षाने लागतो. तेव्हा पद न मिळालेले किंवा हवे ते पद न मिळालेले पुन्हा जोमाने कामाला लागतात. डॉ. गणेश पोटे हा आधी उपजिल्हाधिकारी झाला, त्यानंतर त्याने भारतीय राजस्व सेवा (IRS) प्राप्त केली. यावेळी तो मुलाखतीला होता, पण अंतिम यादीत स्थान मिळवू शकला नाही. त्याने दिलेली प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे.
गुजर गया दिन अपनी तमाम रौनक लेकर
जिंदगी ने वफा की तो कल फिर सिलसिले होंगे
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
यशासारखे यश नाही...(लेख क्र . १७)
नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा काल आपण केली. आज आपण त्या निकालातून कशाप्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते पाहू.
यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली.
या सर्व चर्चेचा सारांश असा की यूपीएससी करायचे की एमपीएससी हा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो, पण त्या प्रश्नाने गोंधळून जायची गरज नाही. दोन्ही परीक्षा आता एकमेकांना समांतरच आहेत. एकाच वेळी दोन्ही देता येतात व दोन्हीमध्ये एकाचवेळी यश मिळवता येते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकते, असेही आपण यंदाच्या निकालाकडे बघून म्हणू शकतो. उदा. सायली ढोले हिने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा देऊन उपजिल्हाधिकारी पद मिळवले व आता यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात रँकही मिळवली आहे. स्पर्धा परीक्षांच्या मैदानात जे उमेदवार गंभीरपणे उतरतात, ते कुठले ना कुठले पद मिळवतातच, असे दिसून येते. दुसरीकडे कुठलेही मोठे पद मिळाल्यानंतरच पुढचे यश मिळते, असे नाही. अगदी छोट्या परीक्षाही (मंत्रालय सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक) दिल्या पाहिजेत. मुळात कोणत्याच परीक्षेला व पदाला कमी लेखू नये. एखादे जरी पद मिळाले की आत्मविश्वास वाढतो व त्यातून पुढचे यश मिळत जाते. यशासारखे यश नाही, असे म्हणतात ते यासाठीच!
अल्पसंतुष्ट राहू नका
कोणतेही पद मिळाल्यावर हा धोका असतो, की काही तरी मिळवून दाखवायची जिद्द कमी होऊ शकते. नाही म्हटले तरी अभिनंदन, सत्कार यात गुंतायला होते. त्यातून मग पुढचे यश निसटू शकते. पण आपण यंदाचा निकाल पाहिल्यास या समस्येवर मात करून यश काढणारे उमेदवार दिसतील. अबोली नरवणे हिने मागच्याच वर्षी १६३वी रँक काढली होती. पण पुन्हा परीक्षा द्यायचे तिने ठरवले. जेव्हा या पुढच्या प्रयत्नाच्या तयारीसाठी आमची भेट झाली, तेव्हा उत्सुकतेने मी तिला विचारले होते, की मागचाच जोश कायम आहे का? तेव्हा अबोली म्हणाली, की नाही म्हटले तरी शैथिल्य आले आहे. पूर्वी कोणी विचारले की 'कॉफी प्यायला जायचे का?' तर मी लगेच काटेकोर विचार करायचे की त्यात किती वेळ जाईल आणि मग नकारच द्यायचे. आता कोणी विचारले तर मी लगेच तयार होईन. थोडक्यात पुन्हा नव्या उत्साहाने त्याच परीक्षेची तयारी करणे सोपे नसते. पण अबोलीने आपली रँक सुधारून दाखवून दिले आहे, की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर शैथिल्यावर मात करता येते.
वरच्या रँकसाठीचे प्रयत्न
अथक प्रयत्न करून वरची रँक आणणारे उमेदवारही आहेत. या वर्षीच्या यादीतील सचिन ओंबासे याचे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर असलेल्या सचिनने २००९मध्ये परीक्षा दिली, पण त्यात मुलाखतीपर्यंत पोहोचूनही यश आले नाही. त्यानंतर त्याने २०१०मध्ये २२८वी रँक मिळवली, २०११च्या परीक्षेत ४१०वी रँक, २०१३मध्ये २१५वी रँक आणि शेवटी २०१५मध्ये १६४वी रँक प्राप्त केली. भारतीय महसूल सेवा (आयआरएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) असे थांबे घेत त्याने यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) मिळवलीच. या जिद्दीला मानायला हवे. तुषार मोहिते, रत्नाकर शेळके हेही असे काही जिद्दी उमेदवार आहेत, ज्यांनी अल्प यशावर समाधान न मानता प्रत्येक वेळी जोरदार मुसंडी मारली. हा 'बचेंगे तो और भी लढेंगे'चा अनोखा मंत्र आहे. 'स्वप्न म्हणजे आपण जे झोपल्यावर बघतो, ते नव्हे, तर जागेपणी बघतो ते स्वप्न' असे डॉ. अब्दुल कलाम म्हणतात. असे जागेपणी स्वप्न पाहून, त्यासाठी जे प्रयत्न करतात, त्यांना विजयश्री यशोमाला घालते.
यशाचे नवे मानदंड
अनेकांनी नोकरी करून पद काढले आहे. त्यातून हे दाखवून दिले आहे, की पूर्णवेळ अभ्यास करूनच पदप्राप्ती करता येते असे काही नाही. एखादा उमेदवार पूर्णवेळ अभ्यास करतोय, की नोकरी करून परीक्षा देतोय हा प्रश्न कमी महत्त्वाचा असून उमेदवाराचा फोकस, सातत्य व यशप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करायची तयारी हे गुण निर्णायक ठरतात. मागे एका कार्यक्रमात अबोली म्हणाली होती, की यूपीएससी करताना तुम्ही त्यात पूर्ण बुडून जाता. दुसरे काहीही दिसत नाही की सुचत नाही. तुम्ही यूपीएससी खाता, यूपीएससी पिता, यूपीएससी जगता व त्याचाच श्वास घेता. ही अवस्था आपोआपच येते. याचा अर्थ हे सर्व यशस्वी विद्यार्थी फक्त पुस्तकी कीडा असतात, असे नाही. उलट त्यांच्यात कलागुणही असतात. स्वत: अबोली कथक नृत्यात प्रवीण आहे. तिने पूर्वी कथकचे जाहीर कार्यक्रमही केले आहेत. मागच्या वर्षी यशस्वी झालेली प्राजक्ता ठाकूर चांगली गायिका आहे. श्रीकांत येईलवाड या यशस्वी उमेदवाराला गिर्यारोहणाचा छंद आहे, तर धीरज सोनजे याला ब्लॉगिंग व ट्विटिंग करणे आवडते. योगेश भरसट याला फ्लूट वाजवायला आवडते, तर रोहन आगवणे याला टेनिस खेळण्याची आवड आहे. एकंदरीतच या सर्वांचा अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधील सहभाग ठळक दिसून येतो. पण ध्येयप्राप्तीसाठी आपले छंद तात्पुरते बाजूला ठेवावे लागतात हेही तितकेच खरे.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
यूपीएससी निकालाची ‘केस स्टडी’...(लेख क्र . १६)
निकालाचे घोषणापत्र
यंदा एका वर्षातच यूपीएससीची परीक्षा व निकाल प्रक्रिया पूर्ण झाली. अलीकडेच पुढील पूर्व परीक्षेच्या आधी अंतिम निकाल लावला जातो. जर पूर्व परीक्षेच्या आत अंतिम निकाल लागला नाही, तर उमेदवारांना पुढच्या परीक्षेला जायचे की नाही, हे कळणार नाही किंवा पूर्वपरीक्षेची तयारीही योग्यप्रकारे करता येणार नाही. आयोगाने आपले काम अधिकाधिक पद्धतशीर करत आणले आहे, असे दिसते. कारण २९ जूनला मुलाखती संपल्या व ४ जुलैला लगेच अंतिम निकाल घोषित केला. इतक्या कमी दिवसांत यापूर्वी कधीही निकाल लागला नव्हता. पूर्वी उमेदवार निकाल कधी येईल या उत्सुकतेने आयोगाची वेबसाइट उघडून बसायचे. पाच-पाच मिनिटांनी निकाल लागला का हे तपासत. कारण पूर्वी आयोग कधीही निकाल जाहीर करत असे. एकदा तर मध्यरात्री निकाल लागला होता. यावेळी मात्र आयोगाने निकालाची तारीख आदल्या दिवशी जाहीर केली व शनिवारी दुपारी एक वाजता तो अयोगाच्या वेबसाइटवर (www.upsc.gov.in) जाहीर झाला. या तत्परतेसाठी आयोग प्रशंसेस प्राप्त आहे.
जागावाटप
आता आपण पदांची वाटणी कशी आहे बघू या. पदांचा आकडा गेल्या काही वर्षांत वाढत चालला आहे. त्यापैकी ज्यांना अखिल भारतीय सेवा म्हणतात म्हणजे प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा व पोलिस सेवेची पदे पुढीलप्रमाणे. आयएएस - १८०, आयएफएस - ३२, आयपीएस - १५०. त्यानंतर केंद्रीय सेवा येतात. त्यात दोन प्रकार आहे. गट 'अ' आणि गट 'ब'. यातील गट 'अ' या प्रकारच्या सेवांमधील पदांची संख्या वाढती आहे. यावर्षी ती तब्बल ७१० होती. तर 'ब' गटाची २९२ पदे होती. त्यातील मोठा वाटा भारतीय महसूल सेवेचा (आयआरएस) आहे. भारत सधन होत असतानाच सरकारचा करमहसूल वाढत चालला आहे व त्याचबरोबर करसंकलनासाठीची व्यवस्था व्यापक होत चालली आहे.
६९ जणांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोणते ना कोणते प्रमाणपत्र राहून गेलेले असते किंवा प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी असतात. आरक्षणासंबंधी जे प्रमाणपत्र लागते, जातीचे किंवा इतर वर्गांच्या बाबतीत नॉन क्रिमीलेयरच्या प्रमाणपत्रांमध्ये या समस्या निर्माण होतात. केंद्राचे प्रमाणपत्र वेगळे असते व राज्यांचे वेगळे. यूपीएसीच्या परिक्षांसाठी केंद्राची प्रमाणपत्रे लागतात. हे बऱ्याच उमेदवारांना माहीत नसते आणि त्यामुळे कधीकधी ती प्रमाणपत्रे सादर करेपर्यंत निकाल राखून ठेवला जातो.
निकालाचे विश्लेषण
नुकताच लागलेला निकाल हा आपल्याला खूप काही शिकवतो. पहिले म्हणजे मुलींमध्ये जे यशप्राप्तीचे प्रमाण आहे, ते एकूण निकालांत कमी असले तरी वरच्या रँकमध्ये मुलींचे प्रमाण चांगले आहे. मुलींसाठी प्रशासकीय सेवा अत्यंत चांगले करीअर ठरू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही चांगले यश मिळवले आहे. त्यातून दिसते की ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. त्यांना योग्य मार्गदर्शनाची व सुविधांची जोड मिळाली, तर ते यशापर्यंत पोहोचू शकतात. मराठी माध्यमातून परिक्षा देणाऱ्यांचा विचार करता निकाल चांगला आहे. उदा. श्रीकांत सुसे याने मराठी माध्यमातून पद काढले आहे. जे अपंग आहेत, त्याच्यासाठी पण निकाल चांगला आहे. जी मुलगी अखिल भारतीय स्तरावर पहिली आली आहे, ती अपंग आहे. पद मिळवण्यासाठी तिने मोठा न्यायालयीन लढा दिला. त्यातून तिने स्वतः पद प्राप्त केलेच, पण पुढच्यांचाही मार्ग मोकळा करून दिला. हा निकाल नीट बघितला तर असे दिसेल की सर्वच शाखांच्या पदवीधरांना यश प्राप्त झाले आहे. उदा. अबोली नरवणे हिचा पदवीचा विषय होता, अर्थशास्त्र व तिने राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय घेऊन यश संपादन केले. निकालातून हेही दिसते की अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या मुलांनी देदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यातून या सनदी सेवा परीक्षेतील पारदर्शकता व समान संधी दिसून येते. निकालातून असे दिसेल की महाराष्ट्राला लोकसंख्येच्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून मुलांनी बाजी मारली आहे.
एकेकाळी आयोगाशी संपर्क साधण्यासाठी उमेदवांना घाईगडबडीने दिल्ली गाठावी लागे. सुदैवाने तो काळ आता मागे पडला आहे. आयोगाने संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत संपर्क साधून आपल्या समस्या मांडता येतात. संपर्क क्रमांक : ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/२३०९८५४३.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
उजळणीने उजळतील दाही दिशा....( लेख क्र . १५)
ज्ञानाला उजाळा देणारी उजळणी
ज्ञान म्हणजे एखादी चकचकीत भांडे समजू या. पण आपण ते कपाटात ठेवले की काळवंडते. तेव्हा ते वेळोवेळी घासूनपुसून ठेवावे लागते. तेव्हा कुठे ते लखलखते. ज्ञानाचे तसे आहे, उजळणीनेच ते लखलखते. आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला समजते व कायमची लक्षात राहील असे वाटू शकते. पण काही दिवसांनी स्मरणशक्ती क्षीण होते व त्या गोष्टीचे विविध कंगोरे बोथट होतात. उजळणीमुळे या समस्येवर मात करता येते. उजळणीमुळे एखादी गोष्ट पेपरवर छापावी तसे ज्ञान आपल्या मेंदूवर कोरले जाते. परीक्षेच्या वेळी अक्षरशः आपण कोणत्या पानावर बाण काढून काय लिहिले आहे हे डोळ्यासमोर दिसते (कॉपी करायची तर बातच नाही). याचा चांगलाच फायदा होतो. ऐन परीक्षेत आठवेल की नाही ही भीतीच संपते.
उजळणीचा एक मोठा फायदा म्हणजे आपण अभ्यासात कुठवर मजल मारली आहे व अजून किती पल्ला बाकी आहे याचा आढावा घेणे सोपे जाते. उजळणीमुळे आपण किती अभ्यास केला आहे हे तपशिलासकट लक्षात राहते. त्याचा मोठा फायदा म्हणजे आधीच काय ज्ञान आहे हे माहीत असले की नवीन ज्ञान कोणते हे लक्षात येते. ते बरोबर वेचून नोट्समध्ये जोडून आपण त्या परिपूर्ण करू शकतो. जे उमेदवार याप्रकारे उजळणी करीत नाहीत, त्यांना आपण पुढे जातो आहोत की मागे की एकाच ठिकाणी साचून राहिलो आहोत हे सांगता येत नाही. हा एक प्रकारचा चकवा असतो.
अभ्यासातील चकवा
या चकव्याचे लक्षण म्हणजे असे उमेदवार वर्षभर पूर्णवेळ अभ्यास करूनही तक्रार करतात की अभ्यास संपतोय असे वाटत नाही. उलट असे वाटते की कितीही अभ्यास करा कमीच पडतोय. खरे तर एका वर्षात वाचण्याजोगे सर्वच वाचून झालेले असते. पण ते ज्ञान धरून न ठेवल्याने (नोट्स न काढणे) किंवा नोट्स काढल्या व पण ज्ञानाचे व्यवस्थापन नीट न केल्याने (उजळणी) ते विसरायला होते. असे हे उजळणीचे महात्म्य आहे.
सराव-शेवटचा टप्पा
आता अभ्यासाचे तीन टप्पे पाहिल्यावर शेवटचा व तितकाच महत्त्वाचा टप्पा पाहायला हवा, तो म्हणजे सराव. बरेचसे उमेदवार पहिल्या तीन टप्प्यांतच इतके गुंतून जातात की ते या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतच नाहीत. पण हा टप्पा पार पाडल्याशिवाय यश नाही. वेळोवेळी चाचण्या द्यायला हव्यात. त्यात किती गुण मिळतात हे बघायला हवे. त्या गुणांची इतरांच्या गुणांशी तुलना करून बघायला हवी. इथे उमेदवारांची एक नेहमीची पळवाट असते, की अभ्यास तर होऊ द्या, मग चाचण्या देऊच. पण मग ती वेळच कधी येणार नाही.
स्पर्धापरीक्षांचा आवाका पाहता अभ्यास असा कधीच होत नाही. ५० टक्क्यांच्या आसपास गुण पडले की पदप्राप्ती होते. याचा अर्थ अगदी यशस्वी उमेदवारांचाही अर्धाच अभ्यास झालेला असतो. अभ्यास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ती निवड झाल्यानंतरही चालू राहते. इथे एका विशिष्ट चौकटीत आपण चर्चा करीत आहोत. एखादा विषय वाचून, टिपण काढून व उजळणी करून झाला की त्याच्यावरचे प्रश्न सोडवून आपण जे करतो आहोत ते गुणांमध्ये प्रतिबिंबित होत आहे की नाही हे बघितले पाहिजे. आणि अभ्यास गुणामध्ये प्रतिबिंबित होत नसेल तर तसे का होत नाही हे शोधले पाहिजे (failure analysis). जो घटक दुर्बळ वाटतोय, त्याचा नव्याने अभ्यास करून चाचणीला सामोरे गेले पाहिजे. हे सर्व अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करायचे. त्यात भावनिक गुंता आणायचा नाही. चाचणीत कमी गुण मिळाले म्हणून निराश व्हायची किंवा जास्त गुण मिळाले म्हणून हवेत जायची काही गरज नाही. या गोष्टीकडे matter of fact पद्धतीने पाहायचे.
सराव परीक्षेतून आपण किती पाण्यात आहोत हे कळते. 'झाकली मूठ सव्वालाखाची' असे होता कामा नये. 'परीक्षेत मी उस्फूर्तपणे प्रश्न सोडवेन' हा दृष्टिकोन महागात पडू शकतो. भरपूर सराव केल्यावरही उस्फूर्ततेला स्पर्धा परीक्षांमध्ये वाव असतोच. कारण परीक्षेत काय येईल हे काही सांगता येत नाही, तेव्हा शेवटी उस्फूर्तता दाखवावी लागतेच. सरावामुळे वाचतानाच त्यावर प्रश्न कशाप्रकारे विचारला जाऊ शकेल, असा विचार करायची सवय लागते. त्यामुळे विचारप्रक्रियेला चालना मिळून परीक्षेच्या दिशेने अभ्यास होतो.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
अभ्यासाचे जंतरमंतर .....( लेख क्र . १४)
आपण अभ्यासाचे जे चार कोन त्यांची चर्चा सुरू केली होती. ते म्हणजे वाचन, नोट्स, उजळणी व सराव. त्यातील नोट्सची चर्चा आपण आधी पूर्णत्वाला नेऊ. नोट्स काढताना त्या वेगळ्या कागदांवरच काढल्या पाहिजेत असे काही नाही. ते वेळखाऊ वाटत असेल तर एखादे पुस्तक प्रमाण मानून त्यातच अधोरेखित करायचे. त्या पुस्तकातच समासात नवीन मुद्दे जोडायचे. हे करताना जागा पुरली नाही तर त्या पुस्तकात बाहेरूंन पानं घालायची. या पद्धतीनेही नोट्स काढल्या तरी चालतात.
नाय, नो, नेव्हर
नोट्स काढताना कधीच त्या दुसऱ्या कोणत्या तरी नोट्सवरून काढू नका. पुस्तकातून नोट्स काढतात, नोट्समधून नव्हे. काहींना नोट्सची लपवालपवी करायला आवडते. त्याची काही गरज नाही. बिनधास्त कोणालाही दाखवा. तुमच्या नोट्स समोरच्याला काहीच उपयोगाच्या नसतात. नोट्स काढायची कोणा इतरांची शैली कॉपी करायचा प्रयत्न करू नका, स्वतःची शैली विकसित करा. किंवा ती आपोआप विकसित होत जाते. इतके सगळे नोट्सपुराण लावले आहे कारण एकदा नोट्स तयार झाल्या की स्पर्धापरीक्षेच्या इमारतीचा ढाचाच तयार झाल्यासारखे आहे. आता त्यामध्ये फक्त रंग भरायचे काम करायचे असते (तपशिल) पण ते तुलनेने सोपे असते. कोणी म्हणेल की एवढे सव्यापसव्य करण्यापेक्षा थेट लक्षातच ठेवायचे ना वाचलेले! ही कल्पना वाटते तेवढी सोपी नाही. अख्खेच्या अख्खे पुस्तक पाठ करून परीक्षेला जायला स्पर्धापरीक्षा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा नव्हे. तिथे अभ्यासक्रम अगदीच मर्यादीत असतो. स्पर्धापरीक्षेत अभ्यासक्रमाचा विस्तार (range) खूप मोठा असतो. अशावेळी निव्वळ पाठांतर करून लक्षात ठेवायचा पर्याय बाद होतो. तेव्हा सेकंड बेस्ट पर्याय म्हणजे नोट्स काढणे.
अचूकतेच्या वाटेवर
नोट्सचा आणखी एक फायदा म्हणजे दोन वेगळया गोष्टीतील दुवे शोधून (linkages) त्या गोष्टीतील आंतरसंबंध जोडणे सोपे जाते. नोट्स नसतील तर नुसत्या मनातल्या मनात ही उलाढाल करणे जड जाते. नोट्समुळे होणारा एक मोठा मानसिक फायदा म्हणजे काहीतरी साध्य केल्याचे समाधान. एरवी अभ्यास ही अमूर्त प्रक्रिया आहे. अशावेळी नोट्स नसतील व एखादयाने प्रश्न विचारला की गेले चार महिने काय केले? तर निश्चित सांगता येत नाही. पण नोट्स असतील तर त्या पुरावा म्हणून मांडता येतात.
नोट्स काढताना एखाद्या प्रकरणाचे प्राण/मर्म काढून घ्यावे लागते. आपोआपच त्या विषयाची मनात चांगली घुसळण होते, तेव्हाच मर्म सापडते. या प्रक्रियेतच अर्धा अभ्यास होतो. नुसतं वाचून पुढे जाण्यापेक्षा ही प्रक्रिया जास्त फलदायी ठरते.
नोट्स लिहून काढण्याच्या प्रक्रियेतून तो अभ्यास आपल्या शरीरात भिनतो. writing makes man perfect असं ते म्हणतात, ते याच अर्थाने.
नोट्स लिहिण्याच्या निमित्ताने हात लिहिता होतो व स्वतःची एक लेखनशैली विकसित होते. तिचा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत खूपच फायदा होतो. एरवी मुख्य परीक्षेत तीन तासांत पाच हजार शब्द लिहिणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!
कधी कधी स्पर्धापरीक्षेत असे होते की एखादी पोस्ट मिळते पण ती खालची असते व उमेदवाराला इच्छा असते की आपण पुन्हा नशीब अजमावून पाहू. म्हणून तो पुन्हा बसतो. पद कायम ठेवून बसता येते. त्यामुळे बहुसंख्य यशस्वी उमेदवार पुन्हा बसतातच. अशा वेळी पुन्हा सगळे नव्याने वाचायला वेळ नसतो. पण जर नोट्स हाताशी असतील तर कमी वेळातही सुधारणा करून वरचे पद हस्तगत करता येते.
या सर्व चर्चेतून ही गोष्ट स्पष्ट होईल की नोट्स काढणे हा जरी वरवर लाँगकट वाटला तरी प्रत्यक्षात तो शॉर्टकट आहे. नोट्स काढल्याने अभ्यासक्रमावर जी पकड येते ती इतर कशानेही येत नाही.
उजळणीचे कर्मकांड
आतापर्यंत आपण दोन टप्पे पार पाडले. वाचन व नोट्स. आता तिसऱ्या टप्प्याकडे वळू, ती म्हणजे नोट्सची उजळणी. नोट्सबद्दलचा आग्रह बघून काही उमेदवार रडतखडत का होईना नोट्स काढतात पण मग त्यांची उजळणी करायला कंटाळा करतात. जर वेळोवेळी उजळणी केली नाही तर नोट्स काढूनदेखील फायदा नाही.
उजळणी म्हणजे नोट्स फक्त वाचून काढायच्या. साधारणतः आठवड्याने किंवा दहा दिवसांनी हे कर्मकांड न चुकता करायचे. त्यादिवशी नवीन वाचन नाही झाले तरी चालेल पण उजळणी करायचीच. नोट्स जर थोडक्यात काढल्या असतील तर सगळ्या नोट्सचीसुद्धा एका दिवसात सहज उजळणी होते. उजळणी करताना एकेक शब्द, एकेक वाक्य वाचताना डोळ्यासमोर पुस्तकाचे पान तरळू लागते. अनेक खिडक्या उघडतात. अर्थात हे सगळे स्वतःच्या नोट्स उजळणी करताना होते. दुसऱ्याच्या रेडीमेड नोट्सची उजळणी करायला घेतलीत खिडक्या उघडणार नाहीत तर बंद होतील.
उजळणी करताना अधोरेखित केलेले, टिपणे काढलेले असे सर्वच वाचायचे व तेही अगदी नियमितपणे. जसे रंग देणारे रंगाचा पहिला हात दिल्यानंतर काही दिवसांनी दुसरा हात देतात. मगच रंग पक्का बसतो. तसाच हा प्रकार आहे. उजळणी केल्यानेच अभ्यास पक्का होतो.
उजळणी केल्याने शब्द व त्यांचा क्रम डोळयात फिट बसतो, विसरू म्हणता विसरता येत नाही. पाठांतराला उजळणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
अभ्यासाची बाराखडी .....( लेख क्र . १3)
दिसामाजी काही तरी लिहावे
आपण जे काही वाचतो त्याच्या नोट्स काढणे अत्यंत आवश्यक आहे. मागच्या प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम समोर ठेवून त्या प्रकाशात नोट्स काढायच्या. काहींना हे काम वेळखाऊ व अनेकांना कंटाळवाणे वाटते. नुसतं वाचायला मजा येते व वाचन भराभर होते. त्यामुळे अनेक पुस्तकांचा फडशा पाडून स्वतःलाच खूप वाचल्याचे समाधान देता येते. पण हे समाधान फसवं असतं. इतकी पुस्तकं वाचली की यश असा काही स्पर्धापरीक्षांमध्ये फॉर्म्युला नाही आहे. त्या पुस्तकातील किती समजलं व त्यातील किती लक्षात राहिलं हे निर्णायक ठरतं. तेव्हा संख्येचा नाद सोडा. कमी पुस्तके वाचली तर चांगली ज्ञानप्राप्ती होऊ शकतेच. शेवटी जास्त अभ्यास करून कमी समजून घ्यायचं नाही, तर कमी अभ्यासात जास्त समजले पाहिजे. थोडक्यात नोट्स काढल्या पाहिजेत. अगदी रोजच्या वृत्तपत्राच्याही नोट्स काढल्या पाहिजेत. पाठपुस्तकांच्या व संदर्भ ग्रंथांच्याही.
नो शॅार्टकट्स
यावर काही जण असा शॉर्टकट काढतील आदल्या वर्षी यशस्वी झालेल्या मुलांच्या नोट्स रेडीमेड वापरल्या तर, तर हा टप्पाच गाळता येईल. सावधान! हा शार्टकट लाँगकट ठरू शकेल. कारण प्रत्येक जण आपापल्या आकलन क्षमतेप्रमाणे आपल्या भाषेत नोटस् काढतो. त्यामुळे एकाचे कपडे जसे दुसऱ्याला फिट होत नाहीत तसे एकाच्या नोट्सचा दुसऱ्याला उपयोग नाही. कारण ज्याने नोट्स काढल्या असतात त्याने 'त्याला' महत्त्वाचे वाटणारे, 'त्याच्या' लक्षात न राहणारे मुद्दे वेगवेगळया आकृत्या काढून नोट्स मध्ये घेतले असतात. इथे धोका असा आहे की त्याने ज्या नोट्स काढल्या आहेत ते तुम्हाला आधीच माहिती आहे व जे त्याने नोट्समध्ये उतरवले नाही ते तुम्हाला माहीत नाही. (mismatch) खेळ खल्लास. सारांश अशा की ज्याच्या नोट्स त्यालाच कळतात. इतरांनी त्या वाचून काडीभरही फायदा होत नाही. स्वतःच्या नोट्स स्वतःच बनवलेल्या बऱ्या.
नोट्स काढायचे तंत्र
आता नोट्स कशा काढायच्या? तर नोट्स काढायच्या वेगवेगळया पद्धती आहेत. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे त्या वापरू शकतो. पारंपरिक पद्धत म्हणजे वेगळ्या पानांवर नोट्स काढायच्या. वहीत काढण्यापेक्षा सुट्या पानांवर काढणे बरे पडते. कारण त्याचे फायलिंग करणे सोपे जाते. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तरपत्रिकेवर रेघा नसतात. त्यामुळे नोट्स काढतानाच रेघा नसलेल्या कागदांवर नोट्स काढल्या तर आपोआपच सराव होतो. ज्या पेनने मुख्य परीक्षा लिहीणार त्याच पेनने नोट्स काढायच्या. हे आपण फारच तपशिलात जातो असे एखाद्याला वाटेल. पण म्हणतात ना, God is in details. बऱ्याच वेळा उमेदवार नोट्स काढताना साधे पेन वापरतात व परीक्षेआधी महागाचे भारी पेन घेतात. पण त्या पेनची सवय नसल्याने चुकल्याचुकल्यासारखे वाटते व एकाग्रता भंगते.
मर्मबंधातली ठेव
नोट्स काढायच्या म्हणजे एखादया गोष्टीचे मर्म मुठीत पकडणे. त्यामुळे संपूर्ण पानाचे किंवा धड्याचे मर्म जाणून ते नोट्स मध्ये पकडता आले पाहिजे. नोट्स वाचल्या की तो धडा जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे. हे ज्यांना कळत नाही, ते नोट्स काढताना पट्टी घेऊन बसतात व सगळ्या ओळी अधोरेखित तरी करतात किंवा जशाच्या तशा नोट्समध्ये उतरवून काढतात. याचा उपयोग नाही. नोट्स नेहमी थोडक्यातच पाहिजेत. एखादया धड्यातील मर्माचा मुद्दा (key point) एखाद्या उताऱ्यातील मर्माचे वाक्य (Trigger sentence) व एखाद्या वाक्यातील मार्मिक शब्द (trigger word) ओळखता आला पाहिजे. तो तसा ओळखून नोट्समध्ये घ्यायचा. अख्खीच्या अख्खी वाक्य उतरवायची गरज नाही. संकल्पनांना छोटे रूप दयायचे. असे करताना आकृत्या, फ्लो चार्ट, बाण यांचा सढळ वापर करायला काहीच हरकत नाही. असंही नुसते शब्द वाचून वाचून कंटाळा येतो. आकृत्यांच्या सहाय्याने लक्षात ठेवणे सोपे जाते. नोट्स काढताना अक्षरही अगदी मोत्यासारखे आले पाहिजे अशी काही गरज नाही. आपल्याला नंतर वाचता आले म्हणजे झाले.
काळा, निळा, हिरवा अशा वेगवेगळया रंगाचे पेनही वापरायला हरकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपे जाते. नोट्स काढताना एकाच भाषेत काढल्या पाहिजे असेही काही नाही. इंग्रजीतून नोट्स काढणारांनी अधूनमधून देवनागरी शब्द, वाक्य लिहिली तरी चालतील. मराठीतून नोट्स काढणारांनी रोमन लिपीचा वापर केला तरी चालेल. तेवढेच ते आकर्षक होते व लक्षात ठेवायलाही सोपे जाते.
नोट्स थोड्या सुटसुटीत काढायच्या. दोन्ही बाजूला थोडी जागा सोडायची. कारण आपण काढलेल्या नोट्स काही अचूक नसतात. ती फक्त एक बाह्य संरचना असते. जेव्हा त्या विषयाबद्ल नवीन माहिती मिळते तेव्हा ती त्या नोट्समध्येच अपडेट करायची. हे अपडेट करायचे काम सातत्याने करायचे व तिथेच करायचे. उदा. तुम्ही अकबराच्या कारकिर्दीवर नोट्स काढल्या. तर त्यातच अपडेट करत जायचे. प्रत्येक वेळेला नवीन माहिती मिळाली की वेगळ्या नोट्स काढायच्या नाहीत. तसे केले नंतर नोट्सचे व्यवस्थापन जड जाईल व शिवाय असे वाटू लागले की इतिहासात बरेच अकबर होऊन गेले. याचाच अर्थ नोट्सचा एकच सेट असला पाहिजे.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times