नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Friday, 31 July 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

स्पर्धापरीक्षा आणि संधी ( लेख क्र . ३ )

स्पर्धापरीक्षा आणि संधी
 
स्पर्धापरीक्षा आणि संधी
फोटो शेअर करा
गेल्या दोन भागात आपण स्पर्धापरीक्षांविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. आजच्या भागातही तुमच्या मनातील इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया...

मुलींना संधी आहे का?

सरकारी सेवेत मुलींसाठी खासगी क्षेत्रापेक्षाही चांगली संधी आहे. कारण, सुरक्षित काम, पुरेशा सुट्ट्या व बदलीसाठी भरपूर पर्याय मिळतात. एमपीएससी परीक्षेत मुलींना ३३ टक्के आरक्षण आहे. मात्र, पुरेशा संख्येने मुली स्पर्धापरीक्षांसाठी बसत नसल्याने यशाची संधी जास्त आहे. इतर परीक्षांमध्ये मुलींसाठी वेगळे आरक्षण नसले तरी समान संधी नक्कीच आहे.

मराठी मुलांवर अन्याय होतो?
स्पर्धापरीक्षांचे पारदर्शक रूप बघता एखाद्या प्रांतातील मुलांवर अन्याय होतो किंवा कोणावर कृपा केली जाते, असे म्हणणे कठीण आहे. मागे काही रेल्वेच्या परीक्षांमध्ये सर्वांपर्यंत माहिती पुरेशा प्रमाणात पोहोचली नव्हती. पण, तोही मुद्दा आता सोडवला गेला आहे. आता इंटरनेटच्या मदतीने सर्व माहिती मिळवता येते. महाराष्ट्रात इतर प्रांतातील अधिकारी काम करताना दिसतात, तसेच मराठी मुलेही दुसऱ्या प्रांतात (परप्रांतात नाही) काम करत असतात. आपल्या देशाला घट्ट बांधून ठेवणारी ही व्यवस्था आहे. तेव्हा मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रथम पुरेशा प्रमाणात मराठी मुलांनी या परीक्षांकडे वळले पाहिजे.

मराठीत संदर्भ साहित्य उपलब्ध नाही?

अशी स्थिती काही वर्षापूर्वीपर्यंत होती, पण आता नाही. आता मराठीत पुरेसे, भरपूर व दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध होते आहे. अगदी विश्वकोशही (संकेतस्थळावर) मराठीत उपलब्ध आहे.

आयपीएससाठी उत्तम शारीरिक क्षमता हवी?

हा गैरसमज आहे. पोलिस सब-इन्स्पेक्टर पदासाठी शारीरिक चाचणी असते. पण, पोलिस उपअधीक्षक किंवा आय.पी.एस बनायचे असेल तर अशी कुठली चाचणी नाही. फक्त बेताची उंची व चष्मा खूप जास्त नको अशा अटी आहेत. चांगले शरीर कमावले तर मुलाखत घेणारे आपल्याला आय.पी.एस.मध्ये टाकतील असे अनेकांना वाटते. किंवा आपण परकीय भाषा शिकलो तर आपला परराष्ट्र सेवेसाठी विचार केला जाईल, असे काहींना वाटते. मात्र, यातील काहीच खरे नाही. मुख्य परीक्षा व मुलाखत या दोघांची बेरीज करून रँक व उमेदवारांनी दिलेला अग्रक्रम यानुसार पदांचे वाटप होते. त्यामुळे आयोगही ठरवून एखाद्याला एखादे विशिष्ट पद वाटू शकत नाही. उमेदवारांनाही सुरुवातीला फक्त यश मिळाल्याचे कळते, पद कोणते मिळाले ते नंतर कळते.

पदवीनंतर अभ्यासाला सुरुवात करू की आधी?

Earlier you start, early you will reach. त्यामुळे जितक्या लवकर तयारी सुरू करणार तितके चांगले. अजित जोशी सध्या हरयाणात जिल्हाधिकारी आहे. त्याने शाळेत असतानाच स्पर्धापरीक्षांचा विचार सुरू केला होता. इतक्या आधीही सुरुवात करता येते.

आता पदवीच्या आधी काय काम करायचे? तर थोडा व्यापक दृष्टीकोन ठेवून व्यक्तिमत्त्व विकसनाकडे लक्ष द्यायचे. एकतर पेपर वाचनाला सुरुवात करायची. आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सजग व्हायचे. वक्तृत्व, निबंधलेखन, वादसभा, नाटके यात भाग घ्यायचा, ट्रेकिंग करायचे. टीव्हीवर 'बिग फाइट'सारखे चांगले कार्यक्रम बघायचे. ग्रंथालयाचे सदस्यत्व घेऊन ग्रंथांतून जग समजून घ्यायचे. आपले विचार लिहून बघायचा प्रयत्न करायचा. व्याख्यानमालांवर लक्ष ठेवून चांगले विषय असतील तर त्यांना हजेरी लावायची. सगळ्याच गोष्टींमध्ये भरपूर रस घ्यायचा. या सर्व गोष्टी करायला पदवीपूर्व काळात वेळ असतो. पदवीनंतर या परीक्षांचा विचार केल्यावर स्पर्धेची मानसिकता व दृष्टीकोन विकसित व्हायला जो वेळ लागतो. तो आधीच तयारी सुरू केली तर वाचवता येतो.

प्रत्येक स्पर्धापरीक्षा वेगळी असल्याने त्यांचा वेगळा अभ्यास असतो.

आता बहुतेक स्पर्धापरीक्षांचे रूप सारखे होत चालले आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक परीक्षांची तयारी करता येते. फक्त प्रत्येकात जे वेगळे आहे त्याची वेगळी फाइल बनवायची व त्या परीक्षेच्या आधी त्या फायलीची उजळणी करायची.



  - भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)



सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                       ...........पुढच्या भागातः- स्पर्धापरीक्षेच्या प्रांगणात उतरताना  

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

लॉग-इन : स्पर्धा परीक्षांचे ( लेख क्र . २ )

लॉग-इन : स्पर्धा परीक्षांचे
यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक सरकारी नोकऱ्यांची उत्तम संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहे. पण या संधी नेमक्या कशा मिळवाव्यात याविषयी हजारो विद्यार्थी अजूनही अंधारात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारी नोकऱ्यांचे हे शिवधनुष्य यशस्वीपणे कसे पेलावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आजपासून 'यशाचा मटामार्ग' या शैक्षणिक उपक्रमांतर्गत लेखमाला सुरू करीत आहे. सोमवार ते शुक्रवार प्रसिद्ध होणाऱ्या या लेखमालेत यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, विषयांचा अभ्यास कसा करावा, परीक्षांच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन या क्षेत्रातील तज्ज्ञ करणार आहेत.


यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांबाबत आजही अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग नेमका कसा प्राप्त करावा, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची नेमकी पद्धती काय असते, ती कशी द्यायची, त्याचे वेगवेगळे टप्पे कोणते, यांसारख्या अनेक प्रश्नांचा आढावा घेऊ या.

सर्वांची लहानपणीची स्वप्ने वेगळीच असतात. पण जसे आपण मोठे होतो, तशी क्षितिजे विस्तारत जातात. लहानपणीची स्वप्ने छोटी असतात, मोठेपणीची मोठी. अशीच एक स्वप्नवत संधी म्हणजे तरुणपणीच उच्चपदस्थ सरकारी अधिकारी म्हणून काम करणे. तुम्ही जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, इन्कम टॅक्स आयुक्त, अबकारी आयुक्त अशा पदांबद्दल ऐकले असेलच. किमान तुम्ही सुती कपडे, फॉर्मल पँट व ट्राऊजर घातलेला एखादा अधिकारी मोटारीतून ऐटबाजपणे उतरताना बघितलाच असेल. निदान त्यांचा दबदबा तर कानी नक्कीच आला असेल.

अनेकदा पदवीपूर्वी स्वप्रतिमा व स्वप्ने याबद्दल चित्र स्पष्ट नसते. किंबहुना अनेकदा शैक्षणिक महत्त्वाकांक्षा हळुहळू जागी होते. पण तोपर्यंत काही क्षेत्रे आधीच मागे पडलेली असतात. अशावेळी पुढे गेलेल्यांना गाठण्याची संधी म्हणजे स्पर्धा परीक्षा. रॉकेट लाँचिंगच्या स्थानकावरून जसे रॉकेट अवकाशाकडे उसळी घेते, तशी मोठी झेप यातून घेता येते. सरकारी क्लास वन व सुपर क्लास वन अशा प्रकारची पदे त्यातून मिळतात. एक स्थिर व तरीही आव्हानात्मक करिअर तुमच्यापुढे उभे राहते. सरकारी काम करताना लोकांसाठी थेट व परिणामकारक बदल घडवून आणता येतात. समाजात किर्ती व आदर प्राप्त होतो. या सदरातून सरकारी सेवांच्या स्वप्नवत करिअरची माहिती आपण घेणार आहोत. करिअर हे एक दीर्घकालीन उद्दीष्ट असते व तिथे ठरवून पोहचावे लागते.

मंझिले अपनी जगह है।

रास्ते अपनी जगह।

ध्येय निश्चित केल्यास वाटचाल करणे सोपे आहे. आयएसएस, आयपीएस, परराष्ट्र सेवा, राजस्व सेवा अशा सरकारी सेवेत काम करणे म्हणजे थेट देशसेवाच! मात्र मग स्वप्न व वास्तव यातील दरी कशी ओलांडायची? ती ओलांडता आली नाही तर? अनेक प्रश्न तरुण-तरुणींसमोर उभे राहतात. आपण प्रमुख प्रश्न व त्यांची उत्तरे शोधून पाहू. ज्यांना पदवीपरीक्षेत खूप गुण मिळतात, त्यांनाच या परीक्षा देता येतात का? नाही. पास क्लासचे गुण असले किंवा अगदी ATKT करत पदवी झाली असेल तरी चालते. अशाप्रकारची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी यशस्वीही झाले आहेत. बदलापूरचा संजय सुतार सरासरी शैक्षणिक गुणवत्ता असलेला होता. बीएससी नापास झाल्यामुळे तर त्याचे वर्ष वाया गेले होते. पण संजय आता भारतीय परराष्ट्र सेवेत महत्त्वाच्या पदावर काम करीत आहे.

दुसऱ्या विद्यापीठाची पदवी चालते का?

होय. अगदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालते.

मराठी भाषेतून या परीक्षा देता येतात का?

हो आयएएसची परीक्षा मराठीतूनही देता येते. महाराष्ट्रातून मराठीतून परीक्षा देऊन उच्चपद प्राप्त करणाऱ्यांची मोठी परंपराच आहे. जसे भूषण गगराणी, विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, नुकताच आयपीएस झालेला प्रतीक ठुबे. बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यासाठी इंग्रजीचा सराव करावा लागतो, पण तो फारसा कठीण नसतो.

महाराष्ट्राबाहेर काम करावे लागते का?

जर परराष्ट्र सेवेत असाल तर देशाबाहेरही काम करावे लागते. एक यशस्वी विद्यार्थी नितीन येवला अफगाणिस्तानात काम करत आहे. खरोखर ते तितके कठीण नसते. सरकार सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर काम करण्याचा मुद्दा प्रामुख्याने प्रशासकीय सेवा (आयएएस), पोलिस सेवा (आयपीएस) व परराष्ट्र सेवा (आयएफएस) यांना लागू होतो. बाकी सर्व सेवांची नेमणूक आपल्याच राज्यात होते. त्यामुळे या मुद्द्याचा बाऊ करण्याचे कारण नाही.

निवड होण्यासाठी लाच द्यावी लागते का?

हा एक अगदी सामान्य गैरसमज आहे. या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अशा तटस्थ व पारदर्शक पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांकडून घेतल्या जातात. त्यांची व्यावसायिकता व सचोटी वादातीत असते. गेल्या अनेक वर्षांचा निकाल पाहिल्यास इतक्या सामान्य घरातील मुले यशस्वी झालेली दिसतील की, हा गैरसमज तिथेच गळून पडेल. नितीन जावळे आयएएस होण्यापूर्वी घाटकोपरला झोपडपट्टीसारख्या ठिकाणी एका खोलीत रहायचा. मी स्वत: त्याच्या घरी गेलेलो आहे.

अभ्यास खूप कठीण असतो का?

अभ्यास कठीण असे म्हणता येणार नाही, पण विषयांमध्ये विविधता असते. प्रश्न विचारताना चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काहींना या परीक्षा अनाकलनीय व कठीण वाटतात. पण प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केल्यास कठीण काहीच नाही. उलट या परीक्षांच्या अभ्यासातून जितके शिकायला मिळते ते इतर कोणत्याही कोर्समधून मिळत नाही. अगदी एमबीए, सीए, लॉ अशा कोर्सेसपेक्षाही या परीक्षांतून जास्त शिकायला मिळते. यातून व्यक्तिमत्वाची जी जडणघडण होते, ती अतुलनीय असते.

परीक्षेत यश मिळतेच याची खात्री काय?

जर मनापासून अभ्यास केला असेल तर पदप्राप्ती होईलच असे आपण म्हणू शकतो. पण धोका तर असतोच. पण धोका कुठे नसतो? 'If you fail to take a risk, then that itself is a biggest risk'.

तुमचे इतर मित्रमैत्रिणी काट्याकुट्यातून पायवाटेने फिरत असताना, या स्पर्धा परीक्षा तुम्हाला मात्र एक्स्प्रेस वेवर आणून सोडतात. तर मग तयार आहात या भन्नाट प्रवासासाठी? आहे धमक हे शिवधनुष्य पेलण्याची? असेल तर यापुढे आपण या सदरातून या परीक्षांचे तंत्र व मंत्र उलगडत नेऊ. जर लॉगइन केले असेल तर हा परीक्षांचा चक्रव्यूह भेदायचा पासवर्ड तुम्हाला एकेका लेखातून मिळत जाईल. म्हणतात ना...

मंझिले उन्ही को मिलती है

जिनके कदमों में जान होती है।

पंखोसे सें नही,

हौसलोंसे उडान होती है।


- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                       ...........पुढच्या भागातः- स्पर्धा परीक्षा आणि संधी  

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

समज-गैरसमजांचा व्हायरस ( लेख क्र . १)

समज-गैरसमजांचा व्हायरसस्पर्धापरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण काल केला. हे प्रश्नोपनिषद आपण आज चालू ठेवू. स्पर्धापरीक्षा देऊ बघणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या पालकांना अनेक समज-गैरसमजांचा सामना करावा लागतो. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या क्षेत्रातील करिअरविषयी अनेक चुकीच्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतात. अशाच काही चुकीच्या कल्पनांमुळे अनेकजण स्पर्धापरीक्षांच्या वाटेलाच येत नाहीत. 'हा नाद खुळा!' असे त्यांना वाटते. हा व्हायरस डिलिट करण्याचा अॅण्टी-व्हायरस आपण टाकूया...

खूप वर्षे अभ्यास करावा लागतो

- आपल्याकडे स्पर्धापरीक्षांचे वातावरण आता कुठे तयार होते आहे. जे उत्तरेत व दक्षिणेत पूर्वीच तयार झाले आहे. त्यामुळे अनेकांना या परीक्षांबद्दल उशिरा माहिती मिळते. त्यामुळे त्यांची सुरुवातही उशिरा होते. आपला एक उमेदवार रोहिदास दोरकुळकर याला एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहितीच वयाच्या तिसाव्या वर्षी मिळाली. तरीही त्यानंतर त्याने जिद्दीने अभ्यास करून मुख्याधिकारी हे पद मिळवले व तो त्या पदावर काम करतो आहे.

त्यामुळे पद मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामागे हे एक कारण असते. इतरही कारणे असतात. काहींनी उमेदवारांच्या मनात असे भरवून दिले असते की परीक्षा उत्तीर्ण व्हायला अनेक वर्षे लागतात. मग काहींचा पंचवार्षिक योजना पद्धतीने कारभार चालतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे खरे असले तरी अशा पायऱ्या बनवत जायचे नाही.

शाळा-कॉलेजमध्ये अभ्यास ठरलेल्या स्वरूपाचा असतो, तर स्पर्धापरीक्षांमध्ये अभ्यास हा गतिमान असतो. एकच एक पुस्तक वाचून सगळा अभ्यास होत नाही. पण, याची दुसरी बाजू अशी की काही विद्यार्थी पसरटपणे काहीही वाचत बसतात. त्यांना कोणीतरी सांगितले असते की, 'स्पर्धापरीक्षेत सूर्याच्या अधिपत्याखाली असलेले सर्वकाही विचारतात'. माझी एक स्टुडंट मुलगी सुरुवातीला जवाहरलाल नेहरूंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचत बसली होती. कारण कोणीतरी तिला सांगितले की तिथून सुरुवात कर.

प्रत्यक्षात स्पर्धापरीक्षांचा अभ्यासक्रम हा पुरेसा स्पष्ट करून दिला आहे व त्या त्या विषयानुसार वाचण्यासाठी संदर्भग्रंथही उपलब्ध आहेत. मग असे असताना फोकस नसताना केलेला अभ्यास आणि नेम न धरता केलेला गोळीबार यांचा काहीच उपयोग होत नाही.

काहीजण (व जणी) आपण या मोठ्या परीक्षा देत आहोत या कल्पनेच्या प्रेमात पडलेले असतात. जसे काही परीक्षा देणे हेच करिअर. खरेतर परीक्षा फक्त साधन असून, अधिकारी बनून देशसेवा करणे हे साध्य आहे. साधनांचे साध्यात रूपांतर करून काहीच साध्य होत नाही.

काहीजण कोणतेही मार्गदर्शन न घेता 'एकला चलो रे' म्हणत एकटेच भटकत निघतात. ते बऱ्याचदा भरकटतात हे वेगळे सांगायला नको. आयुष्यात एखादी छोटी गोष्ट साध्य करण्यासाठीही अनेकांची मदत लागते; तर मग एवढी मोठी झेप कुणाच्या मदतीशिवाय कशी शक्य होईल? थोडक्यात मार्गदर्शन, अभ्यासगट, अभ्यास साहित्य या सर्वांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे.

अभ्यास (search) आणि संशोधन (research) यांच्यातील सीमारेषाही ओळखता आली पाहिजे. स्पर्धापरीक्षांमध्ये आधीच उपलब्ध माहितीचा अभ्यास करून त्याचा सारांश आत्मसात करायचा असतो, नवीन शोध लावायचा नसतो. मुळात एका वर्षाच्या मर्यादित कालावधीत ते शक्यही नसते. ही लक्ष्मणरेषा एकदा आखता आली आणि काटेकोरपणे पाळता आली तर यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे थांबण्याची गरज नाही.

सरकारी नोकरांचीच मुले पास होतात


- ज्यांच्या घरी कोणी ना कोणी सरकारी नोकरीत आहे त्यांना या परीक्षेची माहिती लवकर मिळते. त्यांनी या नोकरीतले आव्हान ओळखले असल्याने ते प्रेरित झालेले असतात. त्यामुळे सरकारी नोकरांची मुलेच जास्त प्रमाणात पदप्राप्ती करतात असे काहींना वाटते. पण, खरोखरच असं काही नाही. घरातून अशी कोणतीही पार्श्वभूमी नसणारे अनेकजण नेमाने पद पटकवतात, तर अशी ही उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर आहेत की आय.ए.एस/आय.पी.एस. अधिकाऱ्यांची मुले खूप प्रयत्न करूनही पद प्राप्त करू शकली नाहीत.


- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                       ...........पुढच्या भागात :- लॉग-इन : स्पर्धा परीक्षांचे

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

स्पर्धापरीक्षांचे प्रांगण ! ( लेख क्र . ४ )

 

स्पर्धापरीक्षांचे प्रांगण!

मुळात या परीक्षांचा हेतू प्रशासकीय कार्यासाठी चांगल्या लोकांची निवड करणे हा आहे. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नव्हे, ती जनतेत विखुरली असते. स्पर्धापरीक्षांद्वारे सामान्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. अगदी प्राचीन मौर्य साम्राज्यात अशा प्रकारे परीक्षा घेऊन अधिकारी निवडत. चीनमध्ये तर शतकानुशतके अशी परीक्षा देऊन सामान्यांनी असामान्य कामगिरी केली. चीनमधील अशा प्रशासकांना 'मॅडरीन' असे म्हणतात. आपल्याकडे आपण 'नोकरशाही' (Bureaucracy) असे म्हणतो.

या परीक्षांमुळे गुणवत्तेला वाव मिळतो व सरकारलाही चांगले कर्मचारी मिळतात. चांगल्या प्रशासकांचे महत्त्व सरकारच्या बाबतीत अधिक आहे कारण, सरकारी कामकाज गुंतागुंतीचे असते. भारतासारख्या देशात जिथे गरिबी ठाण मांडून बसली आहे, तिथे प्रशासनाचे योग्य निर्णय वरदान ठरतात तर चुकीचे शाप. खासगी क्षेत्रातील व्यवस्थापकांनी चुकीचे निर्णय घेतले तर कंपनीचे फक्त आर्थिक नुकसान होते, सरकारी नोकरशाहीच्या चुकांच्या फटका संपूर्ण देशाला बसतो. अशा प्रकारे भारताचे भवितव्य घडवण्याची ऐतिहासिक संधी या परीक्षेतून मिळते.

'रंग दे बसंती' सिनेमामध्ये मोठा उद्बोधक प्रसंग आहे. तरुणांचा एक गट भ्रष्ट मंत्र्याला मारून रेडिओवरून लोकांसमोर आपले म्हणणे मांडतो. एक श्रोता तिरकसपणे प्रश्न विचारतो 'आपकी लिस्ट पर कौन कौन है?' तेव्हा तो तरुण उत्तर देतो की, 'हमारी ऐसी कोई लिस्ट नही है!' मग आता पुढे काय काय करणार, यावर तो उत्तर देतो, 'आता आम्ही प्रशासनात जाऊ. आय.ए.एस., आय.पी.एस. बनू व देशाच्या उद्धारासाठी प्रयत्न करू. ब्रिटिश काळात देशांसाठी प्राण देणाऱ्यांची गरज होती. आज जगणाऱ्यांची गरज आहे.'

भारतासारख्या खंडप्राय देशाच्या प्रशासनासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरशाहीची गरज भासते. भारतासारख्या विकसनशील देशात नोकरशाहीने स्थिती 'जैसे थे' न ठेवता विकास घडवून आणणे आवश्यक असते. थोडक्यात भारतातील प्रशासनाने विकासाचे साधन म्हणून काम करणे अपेक्षित असते.

ब्रिटिश काळात नोकरशाही ब्रिटिशांची एजंट होती. ती विकासाच्या योजनांना, लोकसहभागाला हाणून पाडे. अशा नकारात्मक भूमिकेमुळेच सुभाषचंद्र बोस यांनी आय.सी.एस.चा राजीनामा दिला तर अरविंद घोष रूजूच झाले नाहीत. अशी ही बदनाम सेवा बंद करायची काहीची मागणी होती. पण, सरदार पटेल मध्ये पडले. ते म्हणाले, या सेवा नसतील तर हा अवाढव्य देश चालवणार कोण? आपण त्यांचा दृष्टीकोन व कार्यशैली सुधारून घेऊन पण, त्यांना बरोबर घेऊनच जाऊ. पटेलांचा हा आग्रह मान्य झाला व जुन्या आय.सी.एस.चे रूपांतर आय.ए.एस.मध्ये झाले. आय.सी.एस.चे जनक लॉर्ड कॉर्नवालीस यांना मानले जात असले तरी नव्या रूपातल्या आय.ए.एस.चे जनकत्व सरदार पटेलांकडे जाते.

पटेलांनी नोकरशहांची स्वातंत्र्यानंतर बैठक घेतली. पटेल त्यांच्यासमोर मोजकेच बोलले. पटेल म्हणाले, 'ज्या गोष्टीने मला आजवर अपरंपार आनंद दिला ती गोष्ट मी आज तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. ती म्हणजे देशसेवा. ही भेट दोन्ही हातांनी भरभरून घ्या. ती कशी घ्यायची हे आपण लवकर बघू. ही एक विशिष्ट संधी आहे. ती चुकवता कामा नये.



- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                       ...........पुढच्या भागातःस्पर्धापरीक्षांच्या आराखड्या विषयी