नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

30) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

तिळा तिळा दार उघड...(लेख क्र . ३०)

 
निर्णयाचे महत्त्व

माध्यमाचा निर्णय हा खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. एकदा माध्यम निवडले की सर्व पेपर त्याच माध्यमात लिहावे लागतात. एक विषय इंग्रजीत व दुसरा पेपर मराठीत असे चालत नाही. हे माध्यम पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरतानाच सांगावे लागते व नंतर बदलता येत नाही. माध्यम ठरवले की त्यानुसार पुढचे निर्णय घेता येतात; जसे अभ्याससाहित्य, मार्गदर्शन, अभ्यासगट इत्यादी. थोडक्यात माध्यमाचा प्रश्न तळ्यात मळ्यात ठेवून चालणार नाही. काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय तयारीला वेग येऊ शकत नाही.

विचारभाषा की ज्ञानभाषा

थोडा हा पेच विचारभाषा की ज्ञानभाषा असा आहे. आपली मातृभाषा मराठी असल्याने आपण विचार मराठीत करतो व तसेच अभिव्यक्तीही मराठीत चांगली होऊ शकते. (मराठी माध्यमात शिक्षण घेतले असेल तर. इंग्रजी माध्यमातून येणाऱ्यांचे प्रश्न तर अजूनच गंभीर असतात. विचारप्रक्रिया मराठीतून व अभिव्यक्ती इंग्रजीतून.) दुसरीकडे जगाची ज्ञानभाषा इंग्रजी आहे. इंग्रजीत शब्दसंपदा जास्त आहे. प्रत्येक भावनेला एक शब्द उपलब्ध आहे. त्यामुळे जे इंग्रजीत एका वाक्यात प्रभावीपणे मांडता येते तेच मांडायला मराठीत दोन वाक्ये लिहावी लागतात. मराठीत ढिगाने जोडाक्षरे आहेत. तशी ती इंग्रजीत नाहीत. इंग्रजीला धावती लिपी आहे तशी मराठीला नाही.

भाषिक कौशल्य

एखाद्याला वाटते की आपण इंग्रजी माध्यमात शिकलो म्हणून आपल्याला इंग्रजी चांगले येते किंवा असेच मराठी माध्यमात शिकलेल्याला मराठीबद्दल वाटत असेल तर ते पूर्णपणे खरे नाही. आपण वापरत असलेली इंग्रजी व मराठी ही बोलीरूपाकडे झुकलेली असते. तिच्यात अचूकता कमी असते व अघळपघळपणा जास्त असतो. म्हणजेच तुम्ही कोणतेही माध्यम घ्या, ती भाषा तुम्हाला नव्याने शिकावी लागते. तिचे ज्ञानभाषा हे रूप आत्मसात करावे लागते. इंग्रजी हे माध्यम घेतलेत तर नुसती अभिव्यक्ती नव्हे, तर विचारप्रक्रिया इंग्रजीत आणता आली पाहिजे. तरच उत्तरे प्रवाही व अर्थगर्भ असतील.

मराठी चांगले नाही म्हणून इंग्रजी, किंवा इंग्रजी चांगले नाही म्हणून मराठी माध्यम घेणे इतका हा वरवरचा निर्णय असू नये. मराठीतून परीक्षा देणाऱ्यांनाही पुरेसे इंग्रजी येत असतेच किंवा आले पाहिजे. निव्वळ इंग्रजी समजत नाही म्हणून एखादे संदर्भसाहित्य जे केवळ इंग्रजीत आहे, ते वाचता आले नाही असे होऊ नये. एकदा एका कार्यक्रमात प्रतीक ठुबेला (ज्याने मराठीत परीक्षा दिली) प्रश्न विचारण्यात आला की तू अभ्यास कशातून केलास. मराठीतून की इंग्रजीतून? तो उत्तरला की फारसे आठवत नाही. बरोबरच आहे, तुम्ही ज्ञान कशातूनही ग्रहण करा, फारसा फरक पडत नाही. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांनी मराठी व मराठी माध्यमांच्या उमेदवारांनी इंग्रजी अभ्याससाहित्य अभ्यासायला काहीच हरकत नाही.

निबंधाची कसोटी

मुख्य परीक्षेत २५० गुणांचा निबंध आहे. वैकल्पिक विषयाप्रमाणेच निबंधाचे गुण बेरीज कमीजास्त करण्यात निर्णायक भूमिका निभावतात. हा निबंध लिहिणे मोठे आव्हानात्मक असते. कारण, तो एकतर खूप प्रभावी होऊ शकतो किंवा पूर्ण फसू शकतो. अशावेळी भाषिक कौशल्य व पकड महत्त्वाची भूमिका निभावते. मांडणी व सादरीकरण प्रभावी असेल तर विषयाच्या त्रुटी भरून काढता येतात. त्यामुळे माध्यम निवडीसाठी निबंधाची कसोटी लावून बघावी. एखादा विषय घेऊन तो मराठीत लिहून बघावा व नंतर दुसरा एखादा विषय घेऊन त्यावर इंग्रजीत निबंध लिहावा. नंतर तो वाचून बघावा. कधीकधी चित्र तात्काळ स्पष्ट होते की कोणती अभिव्यक्ती प्रभावी आहे. पण, जर समतोल असेल तर ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत व त्यांचे मत घ्यावे.

वैकल्पिक विषयाची कसोटी

तुमचा वैकल्पिक विषय कोणता आहे हाही एक निर्णयावर प्रभाव टाकणारा घटक आहे. जर तुमच्या वैकल्पिक विषय भौतिकशास्त्र, जीवशास्त्र अशा शुद्ध विज्ञानांपैकी असेल तर इंग्रजीकडे निर्णय झुकतो. कारण हे विषय इंग्रजीतून मांडणे सोपे जाते. पण, जर तुमचे वैकल्पिक विषय मानव्यविद्या शाखेतील उदा. इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन अशापैकी असतील तर मराठीकडे काटा झुकतो. कारण, या विषयांचे साहित्य मराठीतही उपलब्ध आहे व स्वतःच्या भाषेत अभिव्यक्ती चांगली करता येऊ शकते.

निशाण धरून मराठी

मराठीतून लिहायला जास्त वेळ लागतो हे खरे असले तरी सातत्याने लेखनाचा सराव करून या अडचणीवर मात करता येते. मराठीची शब्दसंपदा वाढवून उत्तरे जास्त दर्जेदार करता येतात. कठीण मराठी शब्दांचा इंग्रजीत कंसामध्ये प्रतिशब्द लिहायचा पर्याय आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे परीक्षकापर्यंत अचूक अर्थ पाहोचतो आहे की नाही ही भीती रहात नाही. मराठी माध्यम असेल तर वाचन वेगाने होते व आकलनही चांगले होते. असा हा माध्यमाचा जमाखर्च आहे. मात्र, माध्यमाचा निर्णय व्यक्तिगत असला पाहिजे. सर्व बाजू जाणून घेऊन मनाने निर्णय घेणे आवश्यक आहे. शेवटी भाषा हे माध्यम आहे व ज्ञान हे साध्य हे विसरून चालणार नाही.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- कस स्मरणशक्तीचा

No comments:

Post a Comment