नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

39) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

सीसॅटचे विश्लेषण...(लेख क्र . ३९)

सीसॅटचे विश्लेषण
 
येत्या यूपीएससीची पूर्वपरीक्षेत सीसॅट भाग - २ ची सरंचना कशी आहे ते खालील लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

'संघ लोक सेवा आयोगाने' सन २०११ला नागरी सेवा पूर्वपरीक्षेत 'सामान्य अध्ययन - २' म्हणजेच 'सीसॅट' हा पेपर समाविष्ट केला. त्यानंतर सन २०१३मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याही 'राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये' सीसॅटचा पॅटर्न अंतर्भूत करण्यात आला. वरील दोनही पूर्वपरीक्षांमध्ये हा पेपर एकूण २०० मार्कांचा असून, यात ८० प्रश्न विचारले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला २.५ मार्क असतात. 'सीसॅट' हा पेपर एकूण ७ विभागांमध्ये विभागलेला आहे.

> आकलन (Comprehension)

> संभाषण कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal Skills including communication skills)

> तर्कशास्त्रीय युक्तिवाद व पृथक्करण क्षमता (Logical Reasoning and analytical Ability)

> निर्णयक्षमता आणि समस्या निराकरण (Decision making and problem solving)

> सामान्य मानसिक क्षमता (General mental ability)

> मुलभूत गणित आणि आलेखाचे पृथक्करण (Basic Numeracy and Data Interpretation)

> मराठी (केवळ राज्यसेवेसाठी) आणि इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये. (Marathi MPSC only) and English comprehension skills)


या पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे एक तृतियांश म्हणजेच (०.८३) मार्क वगळण्यात येतात. परंतु, निर्णयक्षमता आणि समस्या निराकरणांवरील चुकीच्या उत्तरांसाठी मार्क वजा करण्यात येत नाहीत.

२०१५च्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी सीसॅट हा पेपर पात्रताफेरी गाठण्यासाठी मर्यादीत करण्यात आला आहे. म्हणजेच या पेपरमध्ये आता विद्यार्थ्यांना किमान ३३ टक्के म्हणजेच ६६ मार्क मिळवावे लागणार आहेत. परंतु, मार्कवत्ता यादी ठरविताना 'सीसॅट' पेपरमध्ये मिळालेले मार्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच 'इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये' विभाग क्रमांक - ७ वरील प्रश्नसुद्धा वगळण्यात आले आहेत. नागरीसेवा पूर्वपरीक्षेत सीसॅटचा पेपर हा 'मध्यम' काठीण्यपातळीचा असतो. त्यामुळे पात्रता मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थांनी विशिष्ट मर्यादेपर्यंत सराव करावा. दररोज किमान एक ते दीड तास 'सीसॅट'च्या प्रश्नांचा सराव केल्यास आणि दर आठवड्याला किमान सराव पेपर सोडवल्यास पात्रता गाठणे फारसे कठीण जाणार नाही.

राज्यसेवा परीक्षेच्या 'सीसॅट' पेपरमध्ये मिळवलेले मार्क हे मार्कवत्ता यादी ठरवण्यासाठी ग्राह्य धरले जातात. त्यामुळे या पेपरला राज्यसेवा पूर्वपरीक्षेची 'सामान्य अध्ययन - १' इतकेच महत्त्व आहे. राज्यसेवा परीक्षेमधील सीसॅटची काठीण्यपातळी ही नागरीसेवा परीक्षेमधीलच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीसॅटवर अधिक भर देणे आवश्यक आहे. राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी दररोज दोन तास सीसॅटच्या सराव आणि दर आठवड्याला एक पेपर सोडवल्यास सीसॅटच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळू शकतील.

सीसॅटची तयारी सुरू करण्याआधी विद्यार्थ्यांनी गतवर्षींच्या प्रश्नपत्रिकांचे विभागनिहाय विश्लेषण करणे आवश्यक आहे. नागरीसेवा पूर्वपरीक्षेच्या 'सीसॅट' पेपरमध्ये 'आकलन' आणि 'इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये' यावर ८० पैकी जवळपास ३० ते ४० (४०% ते ५०%) प्रश्न विचारले जातात. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तर ८०पैकी जवळपास ५० (६२.५%) प्रश्न हे आकलन व मराठी आणि इंग्रजी आकलन कौशल्ये या विभागाशी निगडीत असतात.

सन २०११ ते २०१५मधील नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि सन २०१३ ते २०१५मधील राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांच्यातील सामान्यअध्ययन म्हणजेच सीसॅट या पेपरचे विभागनिहाय विश्लेषण हे खाली दिलेले आहे. कंसातील आकडे हे राज्यसेवेचे आहेत.

शास्त्रीय संगीतामध्ये रियाज केला जातो. तसा सीसॅट हा रियाजचा पेपर आहे. न चुकता न कंटाळता रोज थोडा वेळ अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे केवळ वाचन नाही. हा विषय स्वतः पेन घेऊन सोडवून पाहिल्याशिवाय आत्मसात होत नाही. सुरुवात सोप्या प्रश्नांपासून करून हळूहळू काठीण्यपातळी वाढवत न्यायची. महत्त्वाची सूत्रे, तोडगे, युक्त्या एका वेगळ्या कागदावर काढून ठेवायच्या. सराव करताना हा कागद जवळ बाळगायचा (परीक्षेला बरोबर घेऊन जाऊ नका)


 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                      

38) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

प्रश्नांची दिशानिश्चिती...(लेख क्र . ३८)

प्रश्नांची दिशानिश्चिती
मुख्य परीक्षेतील प्रश्न हे नुसतेच गुंतागुंतीचे नसतात, तर त्यांना विशिष्ट दिशा दिलेली असते. ती दिशा ओळखून त्या दिशेने उत्तर यावे लागते. ही दिशा प्रश्नाच्या शेपटीत दडलेली असते. एकाच विधानावर शेपूट वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. उदा. चर्चा करा व विवेचन करा. या दोन्ही गोष्टी एकच वाटल्या तरी त्या तशा नाहीत. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे आणि त्यामुळे उत्तराचे प्रसरण वेगवेगळे झाले पाहिजे. प्रश्नातून माहिती विचारली आहे की, विश्लेषण हेही जाणून घेतले पाहिजे.


वर्णन करा (Describe) - प्रश्नातील विधान मान्य करून ते उलगडत नेणे इतकेच अपेक्षित असते.

स्पष्ट करा (Explain) - येथे संकल्पनात्मक विवेचनाची जास्त अपेक्षा आहे. तथ्यांचा वापर कमी असायला हवा.

विश्लेषण करा (Analyse) - प्रश्नाला अनेक अंगांनी भिडून त्याच्या विविध पैलूंची एकमेकांशी व संदर्भाशी तुलना घडवून आणणे अपेक्षित आहे.

पाहणी करा (Assess) - एखादा निरीक्षक ज्याप्रमाणे गोदामाची पाहणी करून महत्त्वाच्या बाबी नोंदवेल जसे किती माल आहे, कोणत्या स्थितीत आहे, त्याप्रमाणे तटस्थप्रमाणे पाहणी करायची.

मूल्यमापन करा (Evaluate) - प्रत्येक कृतीमागे काही एक मूल्यव्यवस्था असते. त्या मूल्याच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने कृती घडते. प्रत्यक्षात त्या मूल्यांमध्ये व कृतीमध्ये 'दरी' निर्माण होते. या दरीची खोली, लांबी, रूंदी मोजून मांडणे म्हणजे मूल्यमापन.

टीकात्मक मूल्यमापन (Critically evaluate) - मूल्यमापनाचेच हे पुढचे पाऊल आहे. ही विचार व कृती यात दरी का पडली याची कारणमीमांसा करणे यात अपेक्षित आहे.

परीक्षण करा (Examine)
- एखादी व्यक्ती/घटना/चळवळ त्यांचे हेतू साध्य करण्यात यशस्वी झाली का? झाल्यास कोणत्या कारणांनी व न झाल्यास कुठल्या कारणांनी हे मांडणे अपेक्षित आहे.

वैशिष्ट्ये सांगा (Give Characteristics) - प्रश्नातील संदर्भाच्या मुख्य पैलूचा उलगडा करणे यात अपेक्षित आहे.

चर्चा करा (Discus) - प्रश्नात दिलेल्या संदर्भाच्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडायच्या व सोडून द्यायचे. निष्कर्ष द्यायची गरज नाही. तुलनात्मक विश्लेषणाचीही गरज नाही.

स्पष्टीकरण द्या (Elaborate)
- प्रश्नातील विधानाशी सहमत होत ज्या विधानाचे मागचे व पुढचे दुवे जोडून दाखवणे.

महत्त्वाचे पैलू (Salient Features) - प्रश्नातील विधानाचे पैलू क्रमवार मांडणे.

दाखवून द्या (bring out)
- प्रश्नातील विधानाचे महत्त्वपूर्ण पैलू जोरकसपणे मांडणे

प्रकाश टाका (highlight) - नावाप्रमाणे प्रश्नात दिलेल्या भागावर प्रकाश टाकून तो भाग उजळून टाका.

चित्र रेखाटा (sketch) - चित्रकार जसा मोजक्या रेषांमध्ये एखादी गोष्ट जिवंत करतो त्याप्रमाणे वाक्याच्या रेषांनी सत्य प्रतिबिंबित करणे अपेक्षित आहे.

मागोवा घ्या (trace) - एखाद्या गोष्टीचा कालक्रमाने होणारा विकास दाखवत जाणे व तो सध्याच्या वास्तवाला आणून भिडवणे.

विशेष दाखवा (significance) - विषयाचे महत्त्व तुलनात्मक पद्धतीने दाखवून देणे.

उदाहरणासह लिहा (elucidate)
- म्हटल्याप्रमाणे उदाहरणे पुरावे म्हणून देऊन स्पष्टीकरण देणे.

समीक्षा करा (critise) - इथे काहींना असे वाटते की, नकारात्मक अर्थच दाखवून द्यायचा आहे. पण तसा अर्थ नाही. समीक्षा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे रहस्य उलगडून दाखवणे, मर्मावर बोट ठेवणे.

तुलना करा (Compair) - प्रश्नात दिलेल्या दोन बाबींची मुद्देसूद तुलना करणे अपेक्षित आहे. सगळेच मुद्दे यायला हवे असे नाही, पण महत्त्वाचे मुद्दे क्रमवार यायला हवे.

व्याख्या करा (define) - एखाद्या घटनेतील गुंतागुंत सोडवून तिचे स्पष्ट व शास्त्रीय विवेचन म्हणजे व्याख्या करणे.

आढावा घ्या (account for) - जमाखर्चाचा एखादा अहवाल मांडावा त्याप्रमाणे तथ्ये व त्यांची कारणमीमांसा यांचा उलगडा अपेक्षित आहे.

तुम्हाला मान्य आहे का? (do you agree) इथे 'तुम्हाला' असे म्हटले असले, तरी ते खरोखर व्यक्तिगत तुम्हाला नसून, तुमच्यासारख्या प्रश्नाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून आलेल्याला मान्य आहे का असे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या विषयावर जे प्रमाणित मत आहे ते मांडणे कधीही चांगले. या प्रश्नामध्ये प्रश्नातील विधानाच्या विरुद्ध जायची मुभा आहे.

मत मांडा (comment) - या प्रकारचे प्रश्न आता परीक्षेत वाढले आहेत. यातून आयोग कुंपणावर बसू न देता बाजू घेणे भाग पाडतो. अशावेळी बाजू घ्यायची व ती लढवायची. अगदी प्रश्नातील विधानाच्या विरुद्ध जावे लागले तरी बेहत्तर. आयोग लढाऊ वृत्तीला गुण देतो त्यामुळे आपण मांडलेली बाजू बरोबर की, चूक याचे टेंशन घ्यायची गरज नाही. अशा प्रशनांमध्ये बहुतेक वेळा अशी कोणतीही निर्णायक बरोबर बाजू नसतेच.

आपण एवढी क्रियापदे पाहिली. पण, हल्ली परीक्षेत कधीकधी काहीच दिशा देत नाहीत. नुसतेच विधान असते. ते कोणाचे, कोणत्या संदर्भात व त्याचे काय करायचे याबद्दल काहीच दिलेले नसते. अशावेळी खरी कसोटी लागते. स्वतःच वरीलपैकी कोणती दिशा त्या विधानाला देणे योग्य ठरेल हे ठरवून त्याप्रमाणे उत्तर लिहावे लागते. प्रश्नातील विधान सर्वमान्य असेल, तर स्पष्ट करा, विवेचन करा अशा प्रकारे दिशा देता येईल. पण, प्रश्नातील विधान खोडसाळ वाटले तर मत मांडा, टीकात्मक समीक्षा या पद्धतीने त्या विधानांची चिरफाड करायला काही हरकत नाही.

हे सर्व सरावाने जमते. एकंदरीत ही सर्व चर्चा म्हणजे काठावर बसून पोहण्याची चर्चा करण्यासारखे आहे. पाण्यात पडल्याशिवाय जसे पोहणे शिकता येत नाही, तसे नुसती चर्चा करून हे सर्व बारकावे आत्मसात होणार नाहीत. त्यासाठी लिहूनच बघितले पाहिजे.

 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- सीसॅटचे विश्लेषण

37) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

उत्तरायण...(लेख क्र . ३७)

उत्तरायण

प्रश्न व उत्तरे यातील जैवसंबंधाची आपण चर्चा केली. हा संबंध जितक्या अलगदपणे उलगडेल तितकी यशाची शक्यता वाढते. उत्तरांच्या मांडणीतील या काही टिप्स.

डाव आणि पेच

परीक्षेतील प्रश्न एकेकाळी सरळ व साधे असत. तो काळ गेला. आता प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ओळीच्यामध्ये वाचून डोकवावे लागते. (Reading between the lines) शब्दांपलीकडचा अर्थ ध्यानात घ्यावा लागतो. मुळात प्रश्न काय आहे, हे कधीकधी लगेच समजत नाही. एखादे विधान दिले जाते. ते कोणी केले, कोणत्या संदर्भात केले हेही सांगितले जात नाही. त्यामुळे त्या विधानाचा संदर्भ ओळखणे ही सर्वात निर्णायक बाब ठरते. त्या खालोखाल जर जमले तर ते विधान कोणी केले हे ओळखता येणे. पण पूर्ण खात्री असेल तरच विधान कोणाचे आहे, ते उत्तरात लिहावे, एरवी त्याची खास गरज नाही. पण विधानाचा अचूक संदर्भ ओळखणे महत्त्वाचे आहे. निव्वळ संदर्भ न लागल्याने प्रश्न सोडून देणारे उमेदवार आहेत. त्याहून वाईट म्हणजे संदर्भ चुकीचा लागला, तर लेखणी झिजवून, वेळ देऊन आपण उत्तर लिहितो, ते सगळेच वाया जाते. कधीकधी प्रश्नातील एखाद्या शब्दातून आपल्याला हिंट मिळते. त्यासाठी नेहमीच इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांत प्रश्न बघायचा. कधीकधी त्यातून संदर्भाचा उलगडा होतो.

आंधळी कोशिंबीर

असे फिरवून प्रश्न विचारण्यात एक फायदा आहे, की त्यामुळे परीक्षार्थी सखोल अभ्यास करून आले आहेत की, वरवरचा अभ्यास केला आहे, हे समजते. ज्यांचा अभ्यास तकलादू आहे, त्यांना प्रश्नांचाच थांग लागत नाही. ते उत्तरात आंधळी कोशिंबीर खेळतात. पण ते सहज पकडले जातात. कारण लेखी उत्तरांमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या ओळीमध्येच उमेदवाराची चलाखी पकडता येते. लेखी परीक्षेत फसवाफसवी करता येत नाही. त्यामुळे पूर्वपरीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेचा अदमास जास्त चांगल्याप्रकारे बांधता येतो व प्रयत्नांना थेट फळ मिळते.

संयमाची आवश्यकता

काहींना आपले गुण दाखवायची (उधळायची) सवय असते. प्रश्न कोणताही असो, त्यांना हवे ते त्या प्रकारे उत्तर लिहितात. हे उमेदवार 'अपने मन के बादशहा' असतात. त्यांची तक्रार असते, की त्यांचे सगळे ज्ञान परीक्षेत तपासलेच जात नाही. आता तत्त्वतः हे खरेच आहे. परीक्षेतील प्रश्नातून अभ्यासातील फार तर पाच टक्केच ज्ञान तपासले जाते. परीक्षा हा एक प्रकारचा सॅम्पल सर्व्हेच असतो. पण म्हणून हवे तसे लिहून चालणार नाही. शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने परीक्षक उमेदवाराची तयारी जोखतो. परीक्षकाच्या क्षमतांवर शंका घेण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. परीक्षा निकोप आहे व त्यातून आपल्याला आपल्या मेहनत व कुवतीनुसार न्याय मिळेल, अशी श्रद्धा असल्याशिवाय स्पर्धापरीक्षा देऊ नये किंवा परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यामध्ये अशा प्रकारची श्रद्धा ढासळू लागली, तर सरळ स्पर्धापरीक्षांना रामराम ठोकावा. एकदा व्यवस्थेवर अविश्वास निर्माण झाला, तर प्रयत्न बोथट होतात, १००% योगदान देता येत नाही. मग उमेदवार व आयोग दोघांमधील संबंध कटू बनतात. ही कटुता टाळायची असेल, तर आयोगाच्या क्षमतेबद्दल नकारात्मक बोलणे, लिहिणे किंवा विचार करणे टाळावे. कारण या सगळ्याची परिणती अपयशाचे खापर परीक्षापद्धतीवर फोडण्यात होते. अपयश आले तरी ते स्वीकारता आले पाहिजे. कोणावर खापर फोडून उपयोग नाही.

एकाच लांबीची उत्तरे हवी

उत्तरांना जर न्याय दिला नाही, उत्तरांनाही प्रश्न पडू लागतात. उत्तरांना न्याय द्यायचा म्हणजे शक्यतो एकाच लांबीची उत्तरे हवी. खाडाखोड टाळावी. उत्तराची सरंचना तयार न करता थेट उत्तरे लिहायला गेले की ही समस्या होते. उत्तर थोडे अंतर डौलदारपणे जाऊन डेड एंड आल्यामुळे थांबते. मग रस्ता बदलून पुन्हा सुरुवात करावी लागते. यात वेळ तर जातोच, शिवाय परीक्षकावर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळेच संरचना तयार करूनच उत्तरे लिहावी व खाडाखोड करायची वेळ आलीच, तर व्हाइटनरचा वापर करावा. शेवटीशेवटी वेग वाढवावा लागतो. तेव्हाही अक्षर फार बिघडता कामा नये. सरावासाठी मुद्दामहून कमी वेळात काही उत्तरे लिहून बघावी. पेनाचे टोक व बोट यात योग्य अंतर ठेवावे (दीड सेंटीमीटर) लिहून लिहून हात दुखतो, तेव्हा दोन प्रश्नांच्या मधल्या काळात विचार करताना पंजा पसरवून बोटांना थोडी विश्रांती द्यावी.

चांगली उत्तरे लिहिता येणे ही एक प्रकारची आराधनाच आहे. ती जर जमली तर यशाच्या महामार्गावरून सुसाट निघालाच म्हणून समजा.
 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- प्रश्नांची दिशानिश्चिती

36) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

उत्तरांची रणभूमी...(लेख क्र . ३६)

उत्तरांची रणभूमी
 
जगात प्रश्न विचारणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे व उत्तर ही सर्वात कठीण असे म्हटले जाते. प्रश्नाच्या गरजेनुसार उत्तर देणे ही तर त्याहून आव्हानात्मक गोष्ट. हे आव्हान कसे उचलता येईल ते आपण बघू.

प्रश्नांची गुंतागुंत

प्रश्नपत्रिका हातात मिळाली, की ती आधी संपूर्ण चाळणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न जागच्या जागी आहेत, की नाही ही नोंद घेतल्यानंतर प्रश्नांच्या गुणांची बेरीज त्या पेपरच्या गुणांशी जुळते की नाही हे बघायला हवे. किती गुणांचे, किती प्रश्न, किती शब्दांसाठी लिहावे लागतील याचे गणित मांडायचे. हा आराखडा निश्चित झाला, की प्रत्यक्ष प्रश्नांकडे वळायचे. हल्ली प्रश्नांचे दोन किंवा तीन भाग केलेले असतात. अशावेळी प्रश्न क्रमांक १मधील एक भाग व दुसऱ्या प्रश्नातील दुसरा भाग असे चालत नाही. तेव्हा प्रश्न निवडताना कोणत्या प्रश्नातून आपण चांगले प्रदर्शन करू, गुणांची बेगमी करू शकू, याचा अंदाज घ्यायला हवा. त्या प्रश्नांखाली खूण करून ठेवायची, कारण ते आपण निवडले आहेत. प्रश्न निवडताना एकाच प्रकारचे न निवडता वैविध्य ठेवता आले तर चांगले. त्यातून तुमच्या अभ्यासातील जास्तीत जास्त भाग तुम्हाला परीक्षकापुढे तपासणीसाठी ठेवता येतो.

प्ले अॅट फ्रंटफूट

काही प्रश्न नेहमीचे असतात व काही प्रश्न एकदम नवीन प्रकारचे. बहुसंख्य उमेदवार पहिल्या प्रकारचे प्रश्न निवडतात. त्यात धोका कमी असतो. पण अशा प्रश्नांतून उमेदवाराच्या क्षमतेचा कस लागत नाही व परीक्षक अशा प्रश्नांना सरासरी किंवा त्याहून कमी गुण देतात. त्यामुळे धोका असला तरी आत्मविश्वास असेल तर नवीन प्रकारचे, आव्हानात्मक प्रश्न निवडायला हरकत नाही. स्पर्धापरीक्षेचा निर्णय घेऊन मोठा धोका आधीच स्वीकारला असल्यामुळे छोटे धोके घ्यायला घाबरायचे कारण नाही. असे नावीन्यपूर्ण प्रश्न फसू शकतात, हा धोका मान्य केला, तरी उत्तर जर चांगले उतरले, तर सरासरीपेक्षा जास्त गुण मिळण्याची शक्यता असते. स्पर्धापरीक्षांमध्ये बहुसंख्य उमेदवार सरासरी गुणांमध्ये अडकतात. पण सरासरीपेक्षा जास्त गुण मिळवल्याशिवाय पदप्राप्ती होऊ शकत नाही. असे प्रश्न जरी चुकले तरी तुमच्या हिंमतीला दाद देऊन परीक्षक अगदीच कमी गुण देत नाहीत, असा अनुभव आहे.

प्रश्न काळजीपूर्वक वाचा

प्रश्नाचे वाचन शांतपणे व काळजीपूर्वक केले पाहिजे. कारण अशी शेकडो उदाहरणे घडली आहेत, की प्रश्न घाईघाईने वाचल्यामुळे वेगळाच अर्थ ध्वनित झाला व उत्तर येत असूनही चुकले. प्रश्नात जर दोन किंवा तीन भाग पडत असतील, तर तेही लगेच खूण करून नोंदवले पाहिजे. उदा. 'गरिबीच्या मोजमापसंबंधी निर्माण झालेली समस्या सांगून जागतिकीकरणामुळे गरिबीवर काय परिणाम झाला आहे ते लिहा.' या प्रश्नामध्ये सरळसरळ दोन भाग आहेत. एक गरिबीच्या मोजमापासंबंधीचा वाद व दुसरा म्हणजे जागतिकीकरण व गरिबी यांचा आंतरसंबंध. त्यामुळे समजा जर हा प्रश्न २० गुणांचा असेल, तर यातील प्रत्येक भागाला दहा गुण समजून तसे लिहिले पाहिजे. तेवढा वेळ व जागा त्यासाठी द्यावी लागेल. नेहमीच अशी समान विभागणी नसते. उदा. 'आजीविका कार्यक्रमाची उद्दिष्टे सांगून त्यातून अर्थव्यवस्थेतील कोणत्या सुप्त क्षमतांचा पर्याय वापर करून घेता येईल याची चर्चा करा. या अभियानाची कालचौकट स्पष्ट करा'. इथे १५ गुणांसाठी आजीविका कार्यक्रम लिहून मग उरलेल्या पाच गुणांसाठी कालचौकट लिहिता येईल. थोडक्यात प्रश्नाच्या कोणत्या भागावर किती भारांक (weigtage) आहे, ते ओळखता आले पाहिजे. प्रश्नात आलेल्या एखाद्या शब्दाने मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित होता कामा नये. जसे आपण घेतलेल्या पहिल्या प्रश्नात जागतिकीकरण शब्द आला आहे. जागतिकीकरण हा संपूर्ण विषयच आहे, ज्याला अनेक आयाम आहेत. पण इथे आपल्याला जागतिकीकरणाचा पैलू मांडायचा आहे. जर उत्तर भरकटत गेले, तर गुण मिळत नाहीतच, शिवाय परीक्षकावर चुकीचा प्रभाव (bad impression) पडतो. हे सगळे जमवून आणण्यासाठी एक युक्ती म्हणजे प्रश्नपत्रिकेतच प्रश्नातील जे महत्त्वाचे शब्द (key words) असतील, त्याखाली लगेच अधोरेखित करायचे व उत्तर लिहिताना प्रश्नाचे पाडलेले भाग व अधोरेखित केलेले शब्द यांच्यावर वारंवार नजर टाकायची. ज्यामुळे उत्तर भरकटत जाण्याचा धोका कमी होतो. ही सर्व काळजी जे उमेदवार घेत नाहीत, त्यांची समान तक्रार असते की खूप चांगली उत्तरे देऊनही कमीच गुण मिळाले. आमचा काय दोष! पण मुद्दा म्हणजे लिहिलेली उत्तरे विचारलेल्या प्रश्नांची होती का? का प्रश्न वेगळा व उत्तर वेगळेच होते.

अचूक उत्तर कसे ओळखायचे?

अचूक उत्तर कुठले हे बघण्यासाठी आपल्याला आधी प्रश्न म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. प्रश्न हा एक विशिष्ट समस्या, चर्चा व माहिती यांना बाहेर काढण्यासाठी दिलेला लीड असतो. म्हणजेच कारपेटची गुंडाळी उलगडावी तसे प्रश्नातून उत्तर उलगडत गेले पाहिजे किंवा कारपेट परत गुंडाळले तर प्रश्नच तयार झाला पाहिजे. याचाच अर्थ अचूक उत्तर ते, जे वाचल्यावर आपल्या मनात तो प्रश्न उभा राहतो. जर एखाद्याला प्रश्न न सांगता उत्तर वाचायला दिले व त्याने तो प्रश्न अचूक ओळखला, तर ते अचूक उत्तर. अशाप्रकारे प्रश्न व उत्तर यांचा जैविक संबंध असला तर गुण मिळतातच.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- उत्तरायण

35) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

परीक्षेतील उत्तरपद्धती...(लेख क्र . ३५)

परीक्षेतील उत्तरपद्धती

लेखनाचा सराव करताना जे मुद्दे समोर येतात, त्याची आपण गेल्या भागात चर्चा सुरू केली. आज आपण शब्द, गुण व वेळ याचे त्रैराशिक कसे सोडवता येईल याचा विचार करू.

उत्तरातील प्रस्तावना

विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये प्रत्येक उत्तरात प्रस्तावना अपेक्षित असते. पण स्पर्धा परीक्षांमध्ये मुळात जागा व वेळेची टंचाई असल्याने प्रस्तावना लिहिणे अपेक्षित नाही. फार मोठे प्रश्न असतील (३० गुणांचे) तर दोन-तीन ओळींत प्रस्तावना लिहिता येईल. तीही विषयाला पुरक असायला हवी. प्रस्तावनेतून विषयाच्या दिशेकडे कूच केली पाहिजे. थोडक्यात प्रस्तावनेमुळे उत्तराच्या प्रमाणबद्धतेला बाधा येता कामा नये.

शब्द व गुण यांचे द्वंद्व

परीक्षेत सध्या १०, १२, २० गुणांचे प्रश्न आहेत व वैकल्पिक २०/३० गुणांचे प्रश्न आहेत. पण याहून कमी वा जास्त गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. एकदा मुख्य परीक्षेत 'भारत-चीन संबंध' या मुद्द्याचा प्रश्न चक्क तीन गुणांसाठी आला. हा असा विषय आहे की त्यावर तीन पाने सहज लिहिता येतील. पण तीन गुण म्हणजे अगदीच चार ओळी. काही उमेदवारांना इतक्या कमी शब्दांत काय लिहायचे हेच कळेना व त्यांनी चक्क उत्तरच लिहिले नाही. तर अशा प्रकारची माघार अपेक्षित नाही. कोणत्या प्रश्नासाठी किती गुण ठरवायचे याचा अधिकार आयोगाला आहे. आपण आपले 'आलीया प्रश्नांशी असावे सादर.'

जे साधे ते सुंदर

उत्तरे लिहिताना मोठमोठी पल्लेदार वाक्ये, कठीण वाक्यरचना टाळली पाहिजे. सोपी छोटी वाक्ये लिहावी. One is writing to express and not to impress. तेव्हा जर तुमच्या लिखाणात नावीन्य असेल, ओज व प्रवाह असेल, शब्दांची निवड अचूक असेल, तर आपोआपच हे लिखाण सुंदर असेल. जे सोपे असते, ते सुंदरही असतेच. सोपे लिहिणे जमण्यासाठी विषयावर पकड लागते व ती शैली सरावाने तयार होत जाते.

अक्षरलेखन

अक्षर सुवाच्य व नीटनेटके असावे. अगदी मोत्यासारखे नसले तरी वाचताच येणार नाही, इतके वाईट नसावे. खूप छोटे अक्षर काढल्यास परीक्षकाला वाचायला त्रास होतो. तेव्हा अक्षर मध्यम आकाराचे असावे. परीक्षेत किती जागेत उत्तर लिहायचे, याची जागा ठरवून दिलेली असते. त्या जागेतच लिहायला हवे. संपूर्ण उत्तरपत्रिका आता प्रश्न व तपासणीच्या जागेसह छापलेली असते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कोठेही लिहिता येते. पुरवण्या जोडायची वेळ येत नाही. पुरवण्या नीट न जोडल्यामुळे हरवल्याची प्रकरणे मागे घडत असत. पण आता तशी संभावना नाही. पण तोटा म्हणजे सुरुवातीला चांगले अक्षर काढून परीक्षकाला प्रभावित करण्याची जुनी युक्ती आता चालत नाही. संपूर्ण पेपरात अक्षराचा दर्जा समान ठेवावा लागतो

मुद्दे अधोरेखित करा

आपण जेव्हा उत्तर लिहितो, तेव्हा आपल्याला संपूर्ण उत्तराचा एकेक शब्द आठवत असते. पण तशीच अपेक्षा परीक्षकाकडून करता येणार नाही. हजारो पेपर तपासणारा परीक्षक प्रत्येक शब्द काटेकोरपणे वाचून तुमच्या गुतांगुतीच्या उत्तरातून अर्थ काढून गुण देईल ही अपेक्षा धरणेच व्यर्थ आहे. त्यामुळे जर परीक्षकाला प्रश्न पडला, की नक्की सगळे मुद्दे उत्तरात आले की नाही? तर त्याला पुन्हा सगळे उत्तर वाचून बघावे लागेल; जे शक्य नाही. निव्वळ एवढ्या कारणांवरून निष्कारण एक-दोन गुण कमी मिळू शकतात. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे उत्तर लिहितानाच किंवा उत्तर लिहून झाल्यावर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे, यात एक/दोन मिनिटे जात असली तरी त्यातून मिळणारा गुणांचा लीड निर्णायक ठरू शकतो.

टिक टिक वाजते डोक्यात

ऐन परीक्षेत वेळ पाळण्याचे मोठे आव्हान असते. परीक्षेत लिहिण्याच्या नादात वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. त्यामुळे लिहिण्याच्या गुंगीत आपल्याजवळील घड्याळ बघितल्यावर खूप वेळ गेल्याचे कळते व धक्का बसतो. मग येणारी उत्तरेही घाईघाईने सोडवावी लागतात. उत्तराची संरचना, क्रम, अक्षर व व्याकरण या सर्वांचा बोऱ्या वाजतो. यावर एकच उपाय म्हणजे मन कठोर करणे व हातातले घड्याळ काढून समोर ठेवणे. प्रत्येक प्रश्नांच्या गुणांनुसार वेळ ठरवायचा व तितक्याच वेळात कटाक्षाने उत्तर संपवायचे व संपले नाही तर तसेच सोडून पुढे सरकणे. पेपर पूर्ण करायचाच. फक्त न येणारी उत्तरे सुटली पाहिजे, इतर कुठलीही नाहीत.

नो चिटींग

असे होऊ शकते की पेपर कठीण असतो व आपाल्याला फारसे काही येत नसते किंवा कधीकधी पेपर खूपच सोपा वाटू लागतो. या दोन्ही बाबतीत उत्तरे लिहिताना वाहवत जाण्याचा संभव असतो. लिहिता लिहिता उमेदवार अशा गोष्टी लिहू लागतो, की त्याबद्दल त्याला स्वतःला खात्री नसते. एक प्रकारचा सत्य-असत्य, कल्पना-वास्तव यांचा हा खेळ असतो. पण सावधान! हा खेळ धोकादायक ठरू शकतो. परीक्षक हे अभ्यासू व अनुभवी असतात. ते अशाप्रकारचे खेळ लगेच ओळखतात. अशावेळी सर्वोत्तम धोरण म्हणजे नो चीटिंग. जे येत आहे व जितके येत आहे, ते चांगल्या प्रकारे मांडून लिहायचे. लोणकढी थापा पेरायच्या नाहीत.

उत्तरकथा

महत्त्वाचे मुद्दे आधी येऊ द्या. उत्तरातील वादविवादाचा क्रम चढता किंवा उतरता असू द्या. मोठमोठ्या व्यक्तींचे कोट्स, वाक्यप्रचार यांची अतिरेक करण्याची गरज नाही. तुम्ही काय म्हणता ते महत्त्वाचे आहे. प्रत्येक उत्तरात तुमच्याकडे काही खास माहिती, विशेष मुद्दा असेल तर अर्वजून उठून दिसेल असा मांडा. शेवटी इतर स्पधर्कांपेक्षा तुमचे उत्तर वेगळे असले पाहिजे. (differentiation) एकाच उत्तरात परस्परविरोधी माहिती वा मांडणी करू नका. उत्तरपत्रिकेतील चौकटीच्या बाहेर शब्द जाता कामा नये. ज्या ठिकाणी उत्तरे न लिहिल्यामुळे जागा रिकामी राहते त्या ठिकाणी रेघा ओढून ठेवणे गरजेचे आहे.

शेवटी महत्त्वाचे म्हणजे पेपर सोपा आहे, की कठीण याचा मनस्थितीवर परिणाम होऊ न देणे, पेपर मध्येच सोडून बाहेर न पडणे. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणाऱ्या लढाऊ बॅट्समनप्रमाणे शेवटच्या प्रश्नापर्यंत लढाई दिली पाहिजे.






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- उत्तरांची रणभूमी

34) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

लिखाणाचा सराव...(लेख क्र . ३४)

लिखाणाचा सराव

स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर लिहावे लागते. शाळेनंतर लिखाण करायचा सराव राहिलेला नसतो. कधी कधी तर फक्त सही करण्यापुरते पेन उघडले जाते. अशा परिस्थितीत आपला अभ्यास आयोगासमोर मांडता आला नाही, तर आयोगाला कसे कळणार, की समोरचा उमेदवार पद देण्यास लायक आहे?

लेखनाचा हा प्रश्न 'एमपीएससी'च्या परीक्षेत आता उद्भवत नाही; कारण ती परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची झाली आहे; पण यूपीएससी परीक्षेत लेखन कौशल्ये निर्णायक ठरतात. मागे आपण नोट्स कशा काढाव्यात, याची चर्चा करताना काही आवश्यक मुद्दे आधीच पाहिले होते, जसे नोट्स काढणे हा एक लेखन सरावाचा भाग आहे, लेखन शैली विकसित झाली पाहिजे, बिनरेघांच्या कागदावर सराव करायला हवा, अक्षर सुरवातीपासून शेवटपर्यंत सारखेच हवे इत्यादी. आपण आज इतर काही पैलूंची चर्चा करू.

कौशल्याचे पैलू

लेखन या कौशल्याचा पहिला पैलू म्हणजे भाषेवर पकड असली पाहिजे. तुमचे जे कोणते माध्यम आहे, मराठी किंवा इंग्रजी, यात प्रवाही व प्रभावी लेखन करता आले पाहिजे. विशेषतः तुम्ही इंग्रजीत लिहित असाल, तर परीक्षकाला कुठेही जाणवता कामा नये, की उमेदवाराचे दहावीपर्यंचे शिक्षण राज्यभाषेमध्ये झाले आहे. बोली भाषा व लेखी भाषा यात फरक असतो. बोली भाषा प्रमाणित नसते. तिच्यापासून एकाच वेळी अनेक अर्थ निघतात. लेखी भाषा प्रमाणित असते व ती अचूक अर्थापर्यंत पोहचवते. तेव्हा लेखी भाषेचा सराव केला पाहिजे. थोडक्यात, भाषेवर काम करावे लागते. नवीन शब्द शिकणे व ते प्रयत्नपूर्वक लिखाणात वापरणे याला पर्याय नाही.

सराव

लेखन चांगले करायचे असेल, तर एक चांगली युक्ती, म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात एखाद्या विषयावर स्वतःचे चिंतन लिहून काढणे. हा सराव असेल, तर आपोआपच नवीन विषयावरसुद्धा लेखणी झरू लागते. अशा प्रकारची तयारी नसेल, तर परीक्षेत पहिली पाच मिनिटे उत्तर कसे संघटित करायचे याचा विचार करण्यातच जातात. असा प्रत्येक प्रश्नांच्या सुरवातीला वेळ वाया जाऊ लागला, तर पेपर वेळेत पूर्ण होणेच शक्य नाही. आपले उत्तर नेहमी सलग, संघटित व प्रमाणबद्ध असले पाहिजे. सुरुवात, मध्य व शेवट हे प्रश्नाशी संबंधित व एकमेकांशी योग्य रितीने जोडलेले पाहिजे. हे सर्व साध्य करायचे असेल, तर प्रत्येक उत्तर लिहायच्या आधी उत्तराचा थोडक्यात आराखडा तयार करता आला पाहिजे. उत्तराशी संबंधित मुद्दे काढून त्यांना क्रमांक द्यायचे व त्या क्रमाने ते उत्तरात आणायचे. ही सर्व चर्चा वाचायला सोपी वाटू शकेल; पण ही कसरत करणे अनेकांना कठीण ते अशक्य वाटते. ते थेट उत्तराला भिडतात, हातघाईची लढाई करून प्रश्नाचा भेद करायचा प्रयत्न करतात; पण त्याचा काही उपयोग नाही. उत्तरात आवश्यक ते सर्व मुद्दे येऊनही पुरेसे गुण मिळत नाहीत; कारण ते मुद्दे क्रमाने आलेले नसतात.

महत्वाचा मुद्दा मध्ये, कमी महत्त्वाचा मुद्दा सुरवातीला, असा सगळा गडबडगुंडा होतो; पण आराखडा तयार करण्याइतका वेळ परीक्षेत असतो का? तर उत्तर आहे, की असतो. चांगला बॅट्समन जसा धावा चोरतो, तसा वेळ चोरून आराखडा तयार करायलाच हवा. हे सरावाने जमते.

कमी शब्द, जास्त आशय

कमीत शब्दांत जास्त अर्थ पोहचवणे ही एक कला आहे. तिची आराधना करून त्या कलेला प्रसन्न करून घेतले पाहिजे. विद्यापीठीय स्तरावर काही वेळा जास्त लिहिल्यावरच गुण मिळतात. स्पर्धा परीक्षांमध्ये वायफळ लिहिले, तर गुण कमी होण्याचीच शक्यता जास्त असते. शब्दांची, कल्पनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे.

उत्तरे मुद्द्यांमध्ये लिहावीत, की उताऱ्यांमध्ये, हा एक उमेदवारांना पडणारा सनातन प्रश्न आहे. वेळ कमी असल्याने मुद्द्यांमध्ये लिहिण्याकडे ओढा असतो. त्यात जास्त मुद्दे मांडता येतात, असाही दावा असतो. विशेषतः जी तांत्रिक विषयांची पदवी घेऊन आलेली मुले आहेत, त्यांचा मुद्देपद्धतीवर जोर असतो. या प्रश्नाची सोडवणूक करणे सोपे आहे. या प्रकारचे निर्णय आधीच घ्यायचे कारण नाही. प्रश्नाचे स्वरूप पाहून हा निर्णय घेतला पाहिजे. कारणे द्या, मुद्देसूद मांडा असे प्रश्नात म्हटले असेल, तर मुद्देपद्धती योग्य. चर्चा करा, टीकात्मक समीक्षा करा, असे प्रश्नात म्हटले असेल, तर उताराच्या स्वरूपात मांडणी केलेली चांगली. सगळेच मुद्द्यांमध्ये किंवा सगळे उताऱ्याच्या स्वरूपात मांडणे चुकीचे ठरेल.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- परीक्षेतील उत्तरपद्धती

33) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

अवांतर वाचनाची दिशा...(लेख क्र . ३३)

अवांतर वाचनाची दिशा

काल आपण अवांतर वाचनाचे महत्त्व व वाचनक्रिया याबद्दल चर्चा केली. आज आपण वाचनक्रिया संपवून मग अवांतर वाचनाची दिशा कोणती असावी, याची चर्चा करू.

वाचनक्रिया

वाचताना मोठ्याने वाचू नये किंवा पुटपुटू नये. त्यामुळे वेग कमी होतो (व इतरांना त्रास होतो) डोळ्यांच्या सहाय्याने वाचन करावे. एका नजरफेकीत वाचता येणारे शब्द व वाक्य यांची संख्या क्रमाक्रमाने वाढवत न्यावी. डोळे गरागरा फिरवू नयेत. अर्धा-पाऊण तास वाचन झाले की डोळ्यांना थोडी विश्रांती द्यावी. शक्यतो पुस्तके अर्धवट वाचू नये. अर्धवट ज्ञान धोकादायक असते. पुस्तकाची प्रस्तावना जरूर वाचावी. तिच्यामुळे त्या पुस्तकाबद्दल इतर काही पैलूंचे ज्ञान होते. एखादे पुस्तक निव्वळ चर्चेमध्ये आहे म्हणून वाचलेच पाहिजे असे नाही. प्रथम त्यांचे परीक्षण वृत्तपत्रातून वाचून घ्यावे, मगच अंतिम निर्णय घ्यावा.

वाचन हे साध्य व साधन

स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना वाचन हे साधन असते व पदप्राप्ती हे साध्य. पण अवांतर वाचनाला हा नियम लागू होत नाही. अवांतर वाचन हे साधनही आहे व साध्यही. त्या पुस्तकातून मिळणारा आनंद पूर्ण असतो व इतर कशात मिसळल्यावरच तो परिपूर्ण होतो असे नव्हे. काल म्हटल्याप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीचा वापर करून घेण्याचा दृष्टिकोन ठेवायची गरज नाही. वाचलेली प्रत्येक ओळ परीक्षेत वापरता आली नाही तरी चालेल, आपण व्यक्ती म्हणून त्या वाचनाने समृद्ध झालो तरी पुरेसे आहे. वाचनाला काही एक दिशा ठेवता येईल का ते आपण बघू.

प्रशासकीय अनुभव

स्पर्धापरीक्षा देऊन ज्या सेवांमध्ये आपल्याला जायचे आहे त्याबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती असायला हवी. त्या दृष्टीने प्रशासकीय अनुभव, प्रशासनातील प्रयोग यांच्याबद्दल वाचन करणे ही एक दिशा असू शकते. मराठीमध्ये माधव गोडबोले, लक्ष्मीकांत देशमुख, शेखर गायकवाड, चंद्रकांत दळवी, लीना मेहंदळे, ज्ञानेश्वर मुळे अशा अधिकाऱ्यांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. इंग्रजीत पी. सी. अलेक्झांडर, ज्युलिओ रिबेरो, पी. एन. धर, टी. एन. शेषन यांनी आपले अनुभव मांडले आहेत. या अनुभवातून प्रशासनातील आव्हाने, समस्या व त्यावरील उपायांची दिशा यांची माहिती मिळते.

चरित्र व आत्मचरित्र

आज प्रकाशन व्यवसाय संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन्ही बाजूंनी विस्तारला आहे. अनेक चरित्रे व आत्मचरित्रे छापली जातात. एकेकाचे चरित्र म्हणजे त्या काळाचा आरसा असतो. त्या व्यक्तीच्या निमित्ताने तो काळ समजून घेता येतो. बदलत्या वास्तवाची जाणीव निर्माण होते. उदा. धनंजय कीर यांनी मराठी व इंग्रजीत लिहिलेली चरित्रे आपल्या डोळ्यांसमोर काळाचा संपूर्ण पट उभा करतात.

विज्ञानाची आराधना

काही विद्यार्थ्यांना विज्ञान कठीण विषय वाटतो. पण जर तो सोपा करून सांगणारे लेखक असतील त्याच्यासारखा इंटरेस्टिंग विषय नाही. मराठीत हे काम जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे, मोहन आपटे, निरंजन घाटे यांनी नेटाने केले आहे. इंग्रजीतही या प्रकारची (सायन्स फिक्शन) पुस्तके बरीच आहेत. या पुस्तकांमधून विज्ञानाचे नियम कथा माध्यमातून समजतात. विज्ञानातील शक्यता व त्याची दिशा यांचे ज्ञान होते. अर्थात या पुस्तकांचे वाचन फक्त विज्ञान घटकाची गोडी वाढवण्यापुरते उपयोगी ठरते. बाकी प्रत्यक्ष अभ्यास चुकत नाहीच.

अर्थकारण समजून घेताना

आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थकारण. त्याला पूरक वाचन करता येईल. अर्थकारणातील संकल्पना नुसत्या वाचून समजत नाहीत, पण त्यांना उदाहरणांची जोड दिली तर मात्र लगेच समजतात, असा अनुभव आहे. असे काही चांगले प्रयत्न म्हणजे अच्युत गोडबोले यांचे 'अर्थात', विनायक गोविलकर यांचे 'अर्थजिज्ञासा', अरुण केळकरांचे 'अर्थसूत्र'ही आहेत. काही लेखक नवे जग निर्माण करण्याची आशा धरतात. अशा लेखकांच्या लेखनातून आपल्या विचारांना चालना मिळते.

प्रेरणादायी पुस्तके

कधीकधी आपल्याला निराश वाटू लागते. असे वाटते की सगळे निरर्थक आहे, कशातच काही अर्थ नाही. अशी अवस्था झाल्यावर अभ्यासच होत नाही. अशा वेळी जर आपण प्रेरणा देणारी, जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारी पुस्तके वाचली तर नव्याने हुरूप येतो, उत्साह वाढतो. अशा प्रकारची पुस्तके आता बाजारात खूप येतात. त्यापैकी पाऊलो काऊलो, रॉबिन शर्मा, शिव खेरा या लेखकांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. आधीच्या यशस्वी उमेदवारांचे अनुभवही अशीच प्रेरणा देतात, संगीता धायगुडे यांचे 'हुमान', रमेश घोलप यांचे 'इथे थांबणे नाही', राजेश पाटील यांचे 'ताई, मी कलेक्टर व्हयनू', ज्ञानेश्वर मुळे यांचे 'माती पंख व आकाश' ही काही गाजलेली पुस्तके आहेत.

वाचू आनंदे

अशाप्रकारे अवांतर वाचन जर सातत्याने व विशिष्ट दिशा ठरवून केले तर स्पर्धा परीक्षेच्या विविध टप्प्यांवर त्याचा फायदा होतो. मात्र अवांतर वाचन हे पूरक म्हणूनच ठेवावे. त्याला मुख्य अभ्यासाची जागा व वेळ देऊ नये. नुसत्या अवांतर वाचनाने कोणतेही पद मिळणार नाही. ही काळजी एकदा घेतली की ग्रंथ तुमचा सखा बनून तुमची आयुष्यभर सोबत करतील याची खात्री बाळगा.(उत्तरार्ध)





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- लिखाणाचा सराव

32) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

अवांतर वाचन हवेच!...(लेख क्र . ३२)

अवांतर वाचन हवेच!

स्पर्धापरीक्षांमधील यश म्हणजे अभ्यास व तंत्र यांची सांगड घालून मिळवलेला विजय असतो. तंत्र म्हणजे परीक्षापद्धतीवर तसेच त्यातील तपशीलावरची पकड. पण अभ्यासाची दिशाच योग्य नसेल, तर केवळ तंत्राने यश मिळू शकत नाही.

ज्ञान विरुद्ध परीक्षा

ज्ञान मिळवत बसायचे की परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवायचे असे द्वंद्व नेहमीच निर्माण होते. पण हे खरे नाही. दोन्ही एकाच वेळी करून मिळवलेले यश खरे यश आहे. ज्ञानाशिवाय पद मिळाले, तर जीवनाची परीक्षा नापास होण्याचा संभव आहे. यश मिळवताना एकास एक असा काही फॉर्म्युला नसतो. मी एवढे करीन व त्यातून एवढे यश मला मिळाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण इतकी संकुचित वृत्ती ठेवून चालत नाही. 'जिदंगी कोई सौदा नही'. त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम द्या, तुम्हाला त्याहून जास्त नक्कीच परत मिळेल. नमनाला हे घडाभर तेल ओतण्याचे कारण म्हणजे अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून देणे हे आहे. या वाचनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. त्यातून जीवनाची समज वाढते व त्याचा परीक्षेतही फायदा होतो.

अवांतर वाचन म्हणजे काय?

अवांतर वाचन करताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काहीही वाचून चालणार नाही. अशी पुस्तके वाचली पाहिजेत, जी आपल्या ध्येयाला पूरक आहेत. अशी पुस्तके जी थेट पाठ्यपुस्तके नाहीत, पण स्पर्धापरीक्षेच्या परिघातील आहेत. अशी पुस्तके ज्यातून आपल्याला मोठे विचार, प्रसंग, महान व्यक्ती व त्यांचे चरित्र यांची ओळख होईल. या सर्वांतून आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतीलच, पण या सर्व माहितीचा वापर आपण निबंध लिहिताना व मुलाखतीत करू शकतो. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचे 'अग्निपंख' हे आत्मचरित्र फक्त त्यांचे व्यक्तीचित्र नाही तर भारताच्या सरंक्षण व अवकाश क्षेत्रातील यशाची रोमांचक गाथा आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांचे 'माझेही एक स्वप्न होते' ही नुसती 'अमूल'ची यशोगाथा नसून, सहकार क्षेत्राची क्षमता दाखवणारा ऐवज आहे.

'आम्हा घरी धन,

शब्दाचीच रत्ने'

अवांतर वाचन सातत्याने करायला हवे. सगळीच पुस्तके विकत घ्यायची गरज नाही. एखादे ग्रंथालय लावून तिथून आणली तरी चालतील. साधारणतः पंधरा दिवसांत एक पुस्तक झाले पाहिजे या गतीने वाचायचे. चांगली पुस्तके वाचावी असे म्हणतात. पण चांगली म्हणजे काय? 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात एक प्रसंग आहे. मुन्नाभाई हा गांधीजींवरील पुस्तके वाचायला जातो. तेथील मोठीमोठी पुस्तके पाहून तो घाबरतो. मग तो तेथील सर्वात छोटे पुस्तक घेऊन सुरुवात करतो. तेच बरोबर आहे. तुम्हाला जे पचेल, पटेल व समजेल ते चांगले पुस्तक. हळुहळू आपला चोखंदळपणा वाढत जाईलच. त्यामुळे अगदी यादी करून तिच पुस्तके वाचली पाहिजेत, असे काही नाही. हळुहळू वाचनात वैविध्यही आणले पाहिजे. कथा कादंबऱ्या, कविता, नाटके हे सर्वच वाचून बघितले पाहिजे. मराठीमध्ये उत्तम इंग्रजी पुस्तकांचे दर्जेदार अनुवाद उपलब्ध आहेत, तेही वाचता येतील. इंग्रजी भाषेत तर ज्ञानभांडार आहे. पण सुरुवात अगदी चेतन भगतने केली तरी चालेल.

अवांतर वाचन कधी?

मागे एकदा आपण अभ्यासाच्या सर्वोत्तम वेळेची (Prime time) चर्चा केली होती. अवांतर वाचन नॉनप्राइम टाइमप्रसंगी केलेले चांगले. या पुस्तकांच्या आपण नोट्स काढत नाही किंवा फार काटेकोरपणे वाचत नाही. तेव्हा प्रवासात किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे वाचन करायला हरकत नाही. ऐन परीक्षेच्या काळात हे वाचन थांबवले तरी चालेल. ही पुस्तके अगदी वेळ लावून वाचायची गरज नाही. छोटी पुस्तके लवकर होतील, पुस्तक मोठे असेल तर वेळ लागेल.

वाचनक्रिया

अभ्यासाचे वाचताना किंवा अवांतर वाचन करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. जिथे तुम्ही वाचन कराल ती जागा शांत, स्वच्छ असली पाहिजे. तिथे पुरेसा प्रकाश पाहिजे. खुर्च्या व टेबल नीट बसता येईल अशा प्रकारचे हवे. झोपून वाचू नये व पुस्तके डोक्याखाली घेऊन झोपू नये. थेट पुस्तकातून किंवा किंडलवर वाचावे, कम्प्युटरवर संपूर्ण पुस्तक वाचायचा अट्टहास करू नये. पुस्तक पुरेशा अंतरावर ठेवून वाचावे. पुस्तके स्वतःची असो वा ग्रंथालयाची, ती नीट हाताळावीत. वाचून झालेल्या पानावर परत जाण्यासाठी कागद दुमडू नये, तर बुकमार्कच्या वापर करावा. ग्रंथालयाच्या पुस्तकावर अधोरेखित करू नये किंवा शेरे मारू नयेत. पाने तर अजिबात फाडू नयेत. पुस्तकाला नेहमी प्लास्टिकचे कव्हर घालावे, स्वतःच्या व शक्य असेल ग्रंथालयाच्याही. पुस्तक जर ग्रंथालयातून आणले असेल वा मित्राचे असेल तर वेळच्या वेळी परत करावे. 


पुस्तके जरूर एकमेकांमध्ये शेअर करावीत. ज्ञान लपवून ठेवल्याने कमी होते व वाटल्याने वाढते. उद्या आपण अवांतर वाचनाची दिशा व गती याची चर्चा करू.
 






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- अवांतर वाचनाची दिशा

31) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

कस स्मरणशक्तीचा...(लेख क्र . ३१)

कस स्मरणशक्तीचा
 
स्मरणशक्ती वाढवणे व तिचा योग्य वापर करून घेणे हा कौशल्याचा भाग आहे. ते स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी लागणारे आवश्यक कौशल्य आहे. स्पर्धापरीक्षांचा अभ्यासक्रम अवाढव्य असतो व शिवाय तो गतिमानही असतो. त्यात एकच एक विषय नसून अनेक विषयांची खिचडीच असते. अशावेळी इतके सगळे ज्ञान लक्षात कसे ठेवायचे, हा मूलभूत प्रश्न असतो. परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही व तुमचे ज्ञान हेच एकमेकांचे सोबती असता. अशात ऐनवेळी स्मरणशक्ती दगा दिला तर काय, हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. अभ्यास करतानाच हे सर्व लक्षात राहील की नाही ही भीती सतावते.

अभ्यास : बौद्धिक व्यायाम

अभ्यास ही प्रक्रिया समजून घेता आली, तर समस्येच्या सोडवणुकीकडे जाता येईल. जसे आपण जिममध्ये शरीराचा व्यायाम करतो, तसाच अभ्यास हा एक बौद्धिक व्यायाम आहे. जिममध्ये आपण एकाच प्रकारचा व्यायाम करत नाही. त्याच प्रकारे अभ्यास करतानाही वाचन, चर्चा, लेक्चर ऐकणे अशा विविध प्रकारे हा व्यायाम केला, तर फळ मिळते. व्यायाम मध्येच सोडला, तर केलेला व्यायामही वाया जातो. तसा अभ्यासही मध्येच सोडून चालत नाही. शारीरिक व्यायाम जसा शरीर सदृढ ठेवतो, तसे चर्चा, वादविवाद यातून बुद्धी तरतरीत राहते. त्यामुळे पूर्णपणे एकट्याने अभ्यास करू नये.

एकाग्रता : एक तपश्चर्या

एखादी गोष्ट स्मरणात राहत नाही, यामागचे कारण काही वेळा अगदी साधे असते. ते म्हणजे, ती गोष्ट नीट समजलेलीच नसते. ती वाचण्यात किंवा ऐकण्यात चूक झालेली असते. अशा वेळी स्मरणशक्तीला दोष देण्यात काही अर्थ नाही. जी गोष्ट मुळात आतच घेतलेली नाही, ती स्मरणशक्ती बाहेर कुठून काढून दाखवणार? त्यामुळे मुळात आपले शरीर सदृढ ठेवले पाहिजे. विश्वनाथन आनंदसारखे बुद्धिबळ खेळाडू खूप चांगली शारीरिक क्षमता जोपासतात, ज्यामुळे त्यांना बुद्धिबळाच्या पटावर लक्ष केंद्रीत करता येते. एकाग्रता वाढवण्यासाठी चालणे, जॉगिंग व योगासने असा व्यायाम करणे गरजेचे आहे. काहींची अशी तक्रार असते की, त्यात वेळ जातो व तितका अभ्यासाचा वेळ कमी होतो. पण १६ तास अभ्यास करून आठ तासांइतकेच लक्षात रहात असेल, तर काय उपयोग? आठ तास एकाग्रतेने अभ्यास करून तितके लक्षात राहिले, तरी पुरेसे आहे. दररोज एक तास तरी रक्ताभिसरण होणे आवश्यक आहे. तरच दिवसभर उत्साह वाटतो व ऊर्जा टिकून राहते. ज्या शरीराच्या बळावर ही कठीण परीक्षा व पुढे मोठमोठ्या कामगिऱ्या पार पाडायच्या, त्या शरीराची जोपासना करायलाच हवी. ही एक गुंतवणूक आहे, असे समजा.

लक्षात का राहात नाही?

ढोबळमानाने दोन पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवता येतात. पहिली सोपी व आपल्याकडील लोकप्रिय पद्धत म्हणजे तथ्ये (facts) आली की, जशीच्या तशी स्वीकारायची. पाठच करून टाकायची. ही पद्धत वापरून अभ्यास झटपट संपवता येतो. सवयीने पाठांतराची क्षमताही वाढत जाते. ही पद्धत म्हणजे मनाच्या विशाल पटावर हजारो बिंदू तयार करून ठेवणे व ते गरजेपणे वापरणे. या पद्धतीचे तोटे जास्त आहेत. ही पद्धत जेव्हा अभ्यासक्रम तुलनेने छोटा असतो (दहावी, बारावी) तेव्हा जास्त परिणामकारक ठरते. पण स्पर्धा परीक्षेसारख्या विशाल अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात ही पद्धत कुचकामी ठरते. एकतर लाखो बिंदू मनाच्या पटावर सुटेसुटे तयार करून सांभाळणे, ही गोष्ट अजिबात सोपी नाही. दुसरे म्हणजे, यात 'योग्यवेळी हवा तो बिंदू सापडला नाही तर काय?' असा प्रश्न उभा राहतो. ही पद्धत वापरणाऱ्यांना ओळखणे सोपे असते. या उमेदवारांची कॉमन तक्रार असते- परीक्षेत 'ब्लँक' झालो. बाहेर आल्यावर सगळे आठवले व डोक्याला हात लावला.

स्मरणात ठेवायची युक्ती

वरील पद्धतीपेक्षा चांगली पद्धत म्हणजे, तथ्यांच्या सर्व बिंदूंना विश्लेषणाच्या धाग्यांनी जोडणे. या पद्धतीत कुठलेही तथ्य जाणून घेताना ते तसेच्या तसे न स्वीकारता त्याच्या मागचे व पुढचे दुवे जोडून घ्यायचे. एखाद्या महत्त्वाच्या घटनेमागे अनेक दुवे असू शकतात. या दुव्यांनी त्या तथ्याला ओवून घ्यायचे. ही एक प्रकारची वृक्षासारखी संरचना तयार होईल. ऐन परीक्षेत 'ब्लँक' होण्याची वेळ येत नाही. पुन्हा हे माहितीचे जंगल घनदाट असल्याने हे वृक्ष एकमेकांत मिसळलेले असतात. विज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र या सगळ्याच विषयांचे दुवे एकमेकांशी जोडलेले आहेत. मग तर काम अजूनच सोपे होते. कोणत्याही एका फांदीवरून दुसऱ्या वृक्षावर उडी मारता येते. हे वृक्ष म्हणजे माहितीचे जंगल व आपण त्यावरून लीलया याहू करत जाणारे टारझनच जणू. ही पद्धत एकदा जमली की, माहितीचा विशाल साठा योग्य प्रकारे साठवता येतो व हवा तेव्हा वापरताही येतो.

यादों की बारात

वरील पद्धत वापरण्यासाठी पूर्वअट म्हणजे प्रश्न विचारणे. एखादी गोष्ट का घडली, तेव्हाच का घडली व तिच्यामुळे काय परिणाम झाले, हे जाणून घेणे गरजेचे आहे. यात थोडा वेळ गेला, तरी त्यामुळे गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. अगदी तथ्ये लक्षात राहिली, तरी सारांश तर लक्षात राहतोच.

स्मरणशक्तीच्या बाबतीत एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळ्यांकडे ती सारखीच असते. पण वापरायची सवय नसल्यास ती झोपी जाते. विषयामध्ये आवड निर्माण झाली की, गोष्टी सोप्या होतात. तेव्हा अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे. एरवी 'ढ' म्हटले जाणारे विद्यार्थी जर भेंड्या खेळायला लागले, तर कोणाला हार जात नाहीत. याचा अर्थ त्यांच्याकडेही इतरांइतकीच क्षमता असते, फक्त त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झालेली नसते इतकेच.

माहितीचे कमी महत्त्वाची आणि जास्त महत्त्वाची असे वर्गीकरण करणेही सोयीचे ठरते. कमी महत्त्वाची अल्पकालीन स्मरणात ठेवल्यास जास्त महत्त्वाची माहिती त्याहून अधिक काळ टिकवून ठेवणे सोपे जाते.

शेवटी स्मरणशक्तीचा आणि इच्छाशक्तीचाही जवळचा संबंध आहे. 'करोगे याद तो हर याद बात आयेगी' हे खरेच आहे. त्याप्रमाणे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला काय हरकत आहे?







- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- अवांतर वाचन हवेच!

30) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

तिळा तिळा दार उघड...(लेख क्र . ३०)

 
निर्णयाचे महत्त्व

माध्यमाचा निर्णय हा खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. एकदा माध्यम निवडले की सर्व पेपर त्याच माध्यमात लिहावे लागतात. एक विषय इंग्रजीत व दुसरा पेपर मराठीत असे चालत नाही. हे माध्यम पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरतानाच सांगावे लागते व नंतर बदलता येत नाही. माध्यम ठरवले की त्यानुसार पुढचे निर्णय घेता येतात; जसे अभ्याससाहित्य, मार्गदर्शन, अभ्यासगट इत्यादी. थोडक्यात माध्यमाचा प्रश्न तळ्यात मळ्यात ठेवून चालणार नाही. काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय तयारीला वेग येऊ शकत नाही.

विचारभाषा की ज्ञानभाषा

थोडा हा पेच विचारभाषा की ज्ञानभाषा असा आहे. आपली मातृभाषा मराठी असल्याने आपण विचार मराठीत करतो व तसेच अभिव्यक्तीही मराठीत चांगली होऊ शकते. (मराठी माध्यमात शिक्षण घेतले असेल तर. इंग्रजी माध्यमातून येणाऱ्यांचे प्रश्न तर अजूनच गंभीर असतात. विचारप्रक्रिया मराठीतून व अभिव्यक्ती इंग्रजीतून.) दुसरीकडे जगाची ज्ञानभाषा इंग्रजी आहे. इंग्रजीत शब्दसंपदा जास्त आहे. प्रत्येक भावनेला एक शब्द उपलब्ध आहे. त्यामुळे जे इंग्रजीत एका वाक्यात प्रभावीपणे मांडता येते तेच मांडायला मराठीत दोन वाक्ये लिहावी लागतात. मराठीत ढिगाने जोडाक्षरे आहेत. तशी ती इंग्रजीत नाहीत. इंग्रजीला धावती लिपी आहे तशी मराठीला नाही.

भाषिक कौशल्य

एखाद्याला वाटते की आपण इंग्रजी माध्यमात शिकलो म्हणून आपल्याला इंग्रजी चांगले येते किंवा असेच मराठी माध्यमात शिकलेल्याला मराठीबद्दल वाटत असेल तर ते पूर्णपणे खरे नाही. आपण वापरत असलेली इंग्रजी व मराठी ही बोलीरूपाकडे झुकलेली असते. तिच्यात अचूकता कमी असते व अघळपघळपणा जास्त असतो. म्हणजेच तुम्ही कोणतेही माध्यम घ्या, ती भाषा तुम्हाला नव्याने शिकावी लागते. तिचे ज्ञानभाषा हे रूप आत्मसात करावे लागते. इंग्रजी हे माध्यम घेतलेत तर नुसती अभिव्यक्ती नव्हे, तर विचारप्रक्रिया इंग्रजीत आणता आली पाहिजे. तरच उत्तरे प्रवाही व अर्थगर्भ असतील.

मराठी चांगले नाही म्हणून इंग्रजी, किंवा इंग्रजी चांगले नाही म्हणून मराठी माध्यम घेणे इतका हा वरवरचा निर्णय असू नये. मराठीतून परीक्षा देणाऱ्यांनाही पुरेसे इंग्रजी येत असतेच किंवा आले पाहिजे. निव्वळ इंग्रजी समजत नाही म्हणून एखादे संदर्भसाहित्य जे केवळ इंग्रजीत आहे, ते वाचता आले नाही असे होऊ नये. एकदा एका कार्यक्रमात प्रतीक ठुबेला (ज्याने मराठीत परीक्षा दिली) प्रश्न विचारण्यात आला की तू अभ्यास कशातून केलास. मराठीतून की इंग्रजीतून? तो उत्तरला की फारसे आठवत नाही. बरोबरच आहे, तुम्ही ज्ञान कशातूनही ग्रहण करा, फारसा फरक पडत नाही. इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांनी मराठी व मराठी माध्यमांच्या उमेदवारांनी इंग्रजी अभ्याससाहित्य अभ्यासायला काहीच हरकत नाही.

निबंधाची कसोटी

मुख्य परीक्षेत २५० गुणांचा निबंध आहे. वैकल्पिक विषयाप्रमाणेच निबंधाचे गुण बेरीज कमीजास्त करण्यात निर्णायक भूमिका निभावतात. हा निबंध लिहिणे मोठे आव्हानात्मक असते. कारण, तो एकतर खूप प्रभावी होऊ शकतो किंवा पूर्ण फसू शकतो. अशावेळी भाषिक कौशल्य व पकड महत्त्वाची भूमिका निभावते. मांडणी व सादरीकरण प्रभावी असेल तर विषयाच्या त्रुटी भरून काढता येतात. त्यामुळे माध्यम निवडीसाठी निबंधाची कसोटी लावून बघावी. एखादा विषय घेऊन तो मराठीत लिहून बघावा व नंतर दुसरा एखादा विषय घेऊन त्यावर इंग्रजीत निबंध लिहावा. नंतर तो वाचून बघावा. कधीकधी चित्र तात्काळ स्पष्ट होते की कोणती अभिव्यक्ती प्रभावी आहे. पण, जर समतोल असेल तर ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत व त्यांचे मत घ्यावे.

वैकल्पिक विषयाची कसोटी

तुमचा वैकल्पिक विषय कोणता आहे हाही एक निर्णयावर प्रभाव टाकणारा घटक आहे. जर तुमच्या वैकल्पिक विषय भौतिकशास्त्र, जीवशास्त्र अशा शुद्ध विज्ञानांपैकी असेल तर इंग्रजीकडे निर्णय झुकतो. कारण हे विषय इंग्रजीतून मांडणे सोपे जाते. पण, जर तुमचे वैकल्पिक विषय मानव्यविद्या शाखेतील उदा. इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन अशापैकी असतील तर मराठीकडे काटा झुकतो. कारण, या विषयांचे साहित्य मराठीतही उपलब्ध आहे व स्वतःच्या भाषेत अभिव्यक्ती चांगली करता येऊ शकते.

निशाण धरून मराठी

मराठीतून लिहायला जास्त वेळ लागतो हे खरे असले तरी सातत्याने लेखनाचा सराव करून या अडचणीवर मात करता येते. मराठीची शब्दसंपदा वाढवून उत्तरे जास्त दर्जेदार करता येतात. कठीण मराठी शब्दांचा इंग्रजीत कंसामध्ये प्रतिशब्द लिहायचा पर्याय आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे परीक्षकापर्यंत अचूक अर्थ पाहोचतो आहे की नाही ही भीती रहात नाही. मराठी माध्यम असेल तर वाचन वेगाने होते व आकलनही चांगले होते. असा हा माध्यमाचा जमाखर्च आहे. मात्र, माध्यमाचा निर्णय व्यक्तिगत असला पाहिजे. सर्व बाजू जाणून घेऊन मनाने निर्णय घेणे आवश्यक आहे. शेवटी भाषा हे माध्यम आहे व ज्ञान हे साध्य हे विसरून चालणार नाही.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- कस स्मरणशक्तीचा

29) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

स्पर्धा परीक्षा आणि माध्यमाची निवड...(लेख क्र . २९)

स्पर्धा परीक्षा आणि माध्यमाची निवड

एमपीएससी

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हा प्रश्न पडत नाही; कारण ही पूर्ण पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाची परीक्षा आहे. पूर्व व मुख्य असे दोन्ही टप्पे फक्त पर्यायी आहेत. मराठी व इंग्रजी भाषेत पेपर असतो व योग्य उत्तरावर काळे करायचे असते. त्यामुळे मराठी किंवा इंग्रजीत अभ्यास करूनही चालते. मुलाखत तोंडी असते. थोडक्यात राज्यसेवा परीक्षेत हा प्रश्न गंभीर रहात नाही. अर्थात तिथेही परीक्षेचा अभ्यास मराठीत करायचा की इंग्रजीत हा प्रश्न आहेच. राज्यसेवेच्या स्पर्धा परीक्षेचे चांगले अभ्याससाहित्य मराठीतून आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडीसुद्धा मराठी वृत्तपत्रे व मासिकातून चांगल्याप्रकारे समजतात. त्यामुळे राज्यसेवा स्पर्धा परीक्षा इंग्रजीतून देणाऱ्यांना राज्य शासनाची इंग्रजी माध्यमाची शालेय पुस्तके व काही मूठभर इंग्रजीतील पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. ते पुरेसे नसते. या सर्वामुळे राज्यसेवेचा संपूर्ण अभ्यास इंग्रजीतून करणे जवळजवळ अशक्य आहे. मराठीतून वाचावेच लागते.

यूपीएससीतील पेच

खरी बिकट वाट केंद्र लोकसेवा आयोगाची आहे. मुख्य परीक्षा लेखी असते. वरील समस्या येथे अगदी उलट आहे. यूपीएससीचे चांगले अभ्याससाहित्य इंग्रजी किंवा हिंदीत उपलब्ध आहे; मात्र तितक्या प्रमाणात ते मराठीत अद्याप उपलब्ध नाही. त्याचवेळी मराठीतून शिक्षण घेतलेले उमेदवार बहुतेककरून ही परीक्षा मराठीतून देण्यास इच्छुक असतात. पण, त्यांना पुरेसे अभ्याससाहित्य वेळेवर उपलब्ध झाले नाही तर त्यांची बरीचशी ऊर्जा ते जमवण्यातच खर्च होते. सुदैवाने आता राज्यसेवेसाठी विपुल व दर्जेदार अभ्याससाहित्य उपलब्ध होऊ लागले आहे. त्याचा वापर यूपीएससीचे विद्यार्थी करू शकतात; कारण बहुतेक अभ्यासक्रम सारखाच आहे. मराठी माध्यम घेणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवारांमध्ये जास्त आहे. साक्षरता वाढू लागली आहे व महत्त्वाकांक्षाही. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी मोठ्या संख्येने ही परीक्षा मराठीतून देतात.

भाषिक त्रिशंकू

महाराष्ट्र राज्यात आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्याचा फायदा म्हणजे आपले विद्यार्थी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषा जाणतात. तोटा म्हणजे यातील कोणत्याच भाषेवर त्यांची म्हणावी तशी पकड निर्माण होत नाही. Jack of all and master of none अशी ही स्थिती होते. परिणामी माध्यम निवडीचा प्रसंग हा 'पेचप्रसंग' बनतो. मराठीत लिहावे म्हटले तर मध्येच इंग्रजी शब्द अवतरतात व पूर्ण इंग्रजी लिहायचे म्हटले तर विचारप्रक्रिया मराठीतून चालू असल्यामुळे अचूक इंग्रजी शब्द व चपखल वाक्यप्रयोग साधता येत नाहीत. इंग्रजीत वाचून मराठीत लिहायचे म्हटले तर इंग्रजीतील कर्ता, कर्म, क्रियापदे मराठीपेक्षा वेगळ्या पद्धतीने चालतात व त्यामुळे मराठीतील वाक्यरचना इंग्रजीसारखी होऊ लागते. हिंदीत अभ्यास करणे हा एक मार्ग आहे व अनेक उमेदवार तो पत्करतातही. हिंदीत इंग्रजीच्या तोडीस तोड अभ्याससाहित्य उपलब्ध आहे. पण, इथेही एक पेच म्हणजे आपले हिंदी म्हणजे बॉलिवूड धाटणीचे. त्या धेडगुजरी हिंदीच्या बळावर शुद्ध हिंदी समजणे अवघड जाते व त्यापेक्षा इंग्रजीत वाचलेले बरे असे वाटू लागते.

भाषिक भुलभुलय्या

यूपीएससीसारख्या देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षेत अभिव्यक्ती ही वेगाने, अचूक व मोजक्या शब्दात करावी लागते. आय.ए.एस बनण्याची पुरेपूर क्षमता असूनही निव्वळ ही बाब न जमल्यामुळे मागे पडलेले अनेक उमेदवार माझ्या डोळ्यासमोर आहेत. अशाप्रकारे उत्तर किंवा दक्षिणेपेक्षा हा माध्यमाचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाचा आहे. उत्तर व दक्षिणेत राज्यांनी द्विभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यामुळे हा प्रश्न त्यांना तितकासा भेडसावत नाही. पण, त्यांच्याशी स्पर्धा असलेली मराठी मुले भाषिक समस्येची योग्य उकल न झाल्याने मागे पडतात.

काही समज, काही गैरसमज

काही उमेदवारांना उगाचच असे वाटत राहते की प्रादेशिक माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांना आयोग दुय्यम वागणूक देतो, गुण देताना हात आखडतो घेतो. पण, तसा काही अनुभव नाही. काहींना वाटते की इंग्रजी माध्यम घेऊ म्हणजे त्यानिमित्तने इंग्रजी सुधारेल. असा विचार करणे असंबंद्ध आहे. आपल्याला पद मिळवायचे आहे की इंग्रजी सुधारायचे आहे? इंग्रजी एरवीही सुधारता येईल. परीक्षेच्या प्रश्नांशी हा मुद्दा जोडून गुंतागुंत करायची गरज नाही. उलट काहींना असे वाटते की मराठीतून परीक्षा देऊ. कारण पेपर शेवटी तपासणीला राज्यातच येणार, आपला मराठीच माणूस पेपर तपासणार, तो नक्कीच भरभरून गुण वाटेल. शिवाय 'स्पर्धा'ही कमीच असेल. पण, असा विचार फार वरवरचा आहे. एकतर असा काही अनुभव नाही. आयोग किती गुण दिले पाहिजे याची काही अंतर्गत प्रमाणके निश्चित करतो, शिवाय गुणनियंत्रक असतोच. त्यामुळे असे काही होऊ शकत नाही. काही उमेदवार या प्रश्नाकडे 'नशिबाचा खेळ' असे बघतात. मागच्या दोन मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिल्या यावेळी मराठीतून देऊन बघू, असे ठरवतात. या प्रकारच्या माध्यम परिवर्तनाला कोणताही तार्किक आधार नाही. काही उमेदवारांनी असा पक्का समज करून घेतला असतो की मराठी माध्यमातून पद मिळते हे मान्य; पण फार वरचे पद मिळत नाही. पुन्हा हाही गैरसमजच आहे. दोन वर्षापूर्वीच प्रतीक ठुबे या विद्यार्थ्याने मराठीतून परीक्षा देऊन आय.पी.एस हे पद काढले आहे. सध्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग घोले यांनीही संपूर्ण परीक्षा मराठीतून देऊनच आय.ए.एस. मिळवले आहे. या पेचावर तोड म्हणून काही उमेदवार तर हिंदी माध्यम निवडतात. हे तर रोगापेक्षा उपाय भयंकर असे झाले. कारण, उत्तरेतल्या मुलांची हिंदी मातृभाषा असते व त्यात ते अगदी सहज अभिव्यक्त होतात. त्यांच्याशी त्यांच्या मैदानात स्पर्धा करणे आत्मघातकी ठरू शकते. मग करायचे तरी काय? हा दुस्तर घाट कसा पार करायचा ते उद्या बघू. निदान तर झाले आता उपचारांची चर्चा करू.



- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- तिळा तिळा दार उघड