33) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...
अवांतर वाचनाची दिशा...(लेख क्र . ३३)
काल आपण अवांतर वाचनाचे महत्त्व व वाचनक्रिया याबद्दल चर्चा केली. आज आपण वाचनक्रिया संपवून मग अवांतर वाचनाची दिशा कोणती असावी, याची चर्चा करू.
वाचनक्रिया
वाचताना मोठ्याने वाचू नये किंवा पुटपुटू नये. त्यामुळे वेग कमी होतो (व इतरांना त्रास होतो) डोळ्यांच्या सहाय्याने वाचन करावे. एका नजरफेकीत वाचता येणारे शब्द व वाक्य यांची संख्या क्रमाक्रमाने वाढवत न्यावी. डोळे गरागरा फिरवू नयेत. अर्धा-पाऊण तास वाचन झाले की डोळ्यांना थोडी विश्रांती द्यावी. शक्यतो पुस्तके अर्धवट वाचू नये. अर्धवट ज्ञान धोकादायक असते. पुस्तकाची प्रस्तावना जरूर वाचावी. तिच्यामुळे त्या पुस्तकाबद्दल इतर काही पैलूंचे ज्ञान होते. एखादे पुस्तक निव्वळ चर्चेमध्ये आहे म्हणून वाचलेच पाहिजे असे नाही. प्रथम त्यांचे परीक्षण वृत्तपत्रातून वाचून घ्यावे, मगच अंतिम निर्णय घ्यावा.
वाचन हे साध्य व साधन
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना वाचन हे साधन असते व पदप्राप्ती हे साध्य. पण अवांतर वाचनाला हा नियम लागू होत नाही. अवांतर वाचन हे साधनही आहे व साध्यही. त्या पुस्तकातून मिळणारा आनंद पूर्ण असतो व इतर कशात मिसळल्यावरच तो परिपूर्ण होतो असे नव्हे. काल म्हटल्याप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीचा वापर करून घेण्याचा दृष्टिकोन ठेवायची गरज नाही. वाचलेली प्रत्येक ओळ परीक्षेत वापरता आली नाही तरी चालेल, आपण व्यक्ती म्हणून त्या वाचनाने समृद्ध झालो तरी पुरेसे आहे. वाचनाला काही एक दिशा ठेवता येईल का ते आपण बघू.
प्रशासकीय अनुभव
स्पर्धापरीक्षा देऊन ज्या सेवांमध्ये आपल्याला जायचे आहे त्याबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती असायला हवी. त्या दृष्टीने प्रशासकीय अनुभव, प्रशासनातील प्रयोग यांच्याबद्दल वाचन करणे ही एक दिशा असू शकते. मराठीमध्ये माधव गोडबोले, लक्ष्मीकांत देशमुख, शेखर गायकवाड, चंद्रकांत दळवी, लीना मेहंदळे, ज्ञानेश्वर मुळे अशा अधिकाऱ्यांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. इंग्रजीत पी. सी. अलेक्झांडर, ज्युलिओ रिबेरो, पी. एन. धर, टी. एन. शेषन यांनी आपले अनुभव मांडले आहेत. या अनुभवातून प्रशासनातील आव्हाने, समस्या व त्यावरील उपायांची दिशा यांची माहिती मिळते.
चरित्र व आत्मचरित्र
आज प्रकाशन व्यवसाय संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन्ही बाजूंनी विस्तारला आहे. अनेक चरित्रे व आत्मचरित्रे छापली जातात. एकेकाचे चरित्र म्हणजे त्या काळाचा आरसा असतो. त्या व्यक्तीच्या निमित्ताने तो काळ समजून घेता येतो. बदलत्या वास्तवाची जाणीव निर्माण होते. उदा. धनंजय कीर यांनी मराठी व इंग्रजीत लिहिलेली चरित्रे आपल्या डोळ्यांसमोर काळाचा संपूर्ण पट उभा करतात.
विज्ञानाची आराधना
काही विद्यार्थ्यांना विज्ञान कठीण विषय वाटतो. पण जर तो सोपा करून सांगणारे लेखक असतील त्याच्यासारखा इंटरेस्टिंग विषय नाही. मराठीत हे काम जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे, मोहन आपटे, निरंजन घाटे यांनी नेटाने केले आहे. इंग्रजीतही या प्रकारची (सायन्स फिक्शन) पुस्तके बरीच आहेत. या पुस्तकांमधून विज्ञानाचे नियम कथा माध्यमातून समजतात. विज्ञानातील शक्यता व त्याची दिशा यांचे ज्ञान होते. अर्थात या पुस्तकांचे वाचन फक्त विज्ञान घटकाची गोडी वाढवण्यापुरते उपयोगी ठरते. बाकी प्रत्यक्ष अभ्यास चुकत नाहीच.
अर्थकारण समजून घेताना
आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थकारण. त्याला पूरक वाचन करता येईल. अर्थकारणातील संकल्पना नुसत्या वाचून समजत नाहीत, पण त्यांना उदाहरणांची जोड दिली तर मात्र लगेच समजतात, असा अनुभव आहे. असे काही चांगले प्रयत्न म्हणजे अच्युत गोडबोले यांचे 'अर्थात', विनायक गोविलकर यांचे 'अर्थजिज्ञासा', अरुण केळकरांचे 'अर्थसूत्र'ही आहेत. काही लेखक नवे जग निर्माण करण्याची आशा धरतात. अशा लेखकांच्या लेखनातून आपल्या विचारांना चालना मिळते.
प्रेरणादायी पुस्तके
कधीकधी आपल्याला निराश वाटू लागते. असे वाटते की सगळे निरर्थक आहे, कशातच काही अर्थ नाही. अशी अवस्था झाल्यावर अभ्यासच होत नाही. अशा वेळी जर आपण प्रेरणा देणारी, जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारी पुस्तके वाचली तर नव्याने हुरूप येतो, उत्साह वाढतो. अशा प्रकारची पुस्तके आता बाजारात खूप येतात. त्यापैकी पाऊलो काऊलो, रॉबिन शर्मा, शिव खेरा या लेखकांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. आधीच्या यशस्वी उमेदवारांचे अनुभवही अशीच प्रेरणा देतात, संगीता धायगुडे यांचे 'हुमान', रमेश घोलप यांचे 'इथे थांबणे नाही', राजेश पाटील यांचे 'ताई, मी कलेक्टर व्हयनू', ज्ञानेश्वर मुळे यांचे 'माती पंख व आकाश' ही काही गाजलेली पुस्तके आहेत.
वाचू आनंदे
अशाप्रकारे अवांतर वाचन जर सातत्याने व विशिष्ट दिशा ठरवून केले तर स्पर्धा परीक्षेच्या विविध टप्प्यांवर त्याचा फायदा होतो. मात्र अवांतर वाचन हे पूरक म्हणूनच ठेवावे. त्याला मुख्य अभ्यासाची जागा व वेळ देऊ नये. नुसत्या अवांतर वाचनाने कोणतेही पद मिळणार नाही. ही काळजी एकदा घेतली की ग्रंथ तुमचा सखा बनून तुमची आयुष्यभर सोबत करतील याची खात्री बाळगा.(उत्तरार्ध)
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment