36) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...
उत्तरांची रणभूमी...(लेख क्र . ३६)
जगात प्रश्न विचारणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे व उत्तर ही सर्वात कठीण असे म्हटले जाते. प्रश्नाच्या गरजेनुसार उत्तर देणे ही तर त्याहून आव्हानात्मक गोष्ट. हे आव्हान कसे उचलता येईल ते आपण बघू.
प्रश्नांची गुंतागुंत
प्रश्नपत्रिका हातात मिळाली, की ती आधी संपूर्ण चाळणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न जागच्या जागी आहेत, की नाही ही नोंद घेतल्यानंतर प्रश्नांच्या गुणांची बेरीज त्या पेपरच्या गुणांशी जुळते की नाही हे बघायला हवे. किती गुणांचे, किती प्रश्न, किती शब्दांसाठी लिहावे लागतील याचे गणित मांडायचे. हा आराखडा निश्चित झाला, की प्रत्यक्ष प्रश्नांकडे वळायचे. हल्ली प्रश्नांचे दोन किंवा तीन भाग केलेले असतात. अशावेळी प्रश्न क्रमांक १मधील एक भाग व दुसऱ्या प्रश्नातील दुसरा भाग असे चालत नाही. तेव्हा प्रश्न निवडताना कोणत्या प्रश्नातून आपण चांगले प्रदर्शन करू, गुणांची बेगमी करू शकू, याचा अंदाज घ्यायला हवा. त्या प्रश्नांखाली खूण करून ठेवायची, कारण ते आपण निवडले आहेत. प्रश्न निवडताना एकाच प्रकारचे न निवडता वैविध्य ठेवता आले तर चांगले. त्यातून तुमच्या अभ्यासातील जास्तीत जास्त भाग तुम्हाला परीक्षकापुढे तपासणीसाठी ठेवता येतो.
प्ले अॅट फ्रंटफूट
काही प्रश्न नेहमीचे असतात व काही प्रश्न एकदम नवीन प्रकारचे. बहुसंख्य उमेदवार पहिल्या प्रकारचे प्रश्न निवडतात. त्यात धोका कमी असतो. पण अशा प्रश्नांतून उमेदवाराच्या क्षमतेचा कस लागत नाही व परीक्षक अशा प्रश्नांना सरासरी किंवा त्याहून कमी गुण देतात. त्यामुळे धोका असला तरी आत्मविश्वास असेल तर नवीन प्रकारचे, आव्हानात्मक प्रश्न निवडायला हरकत नाही. स्पर्धापरीक्षेचा निर्णय घेऊन मोठा धोका आधीच स्वीकारला असल्यामुळे छोटे धोके घ्यायला घाबरायचे कारण नाही. असे नावीन्यपूर्ण प्रश्न फसू शकतात, हा धोका मान्य केला, तरी उत्तर जर चांगले उतरले, तर सरासरीपेक्षा जास्त गुण मिळण्याची शक्यता असते. स्पर्धापरीक्षांमध्ये बहुसंख्य उमेदवार सरासरी गुणांमध्ये अडकतात. पण सरासरीपेक्षा जास्त गुण मिळवल्याशिवाय पदप्राप्ती होऊ शकत नाही. असे प्रश्न जरी चुकले तरी तुमच्या हिंमतीला दाद देऊन परीक्षक अगदीच कमी गुण देत नाहीत, असा अनुभव आहे.
प्रश्न काळजीपूर्वक वाचा
प्रश्नाचे वाचन शांतपणे व काळजीपूर्वक केले पाहिजे. कारण अशी शेकडो उदाहरणे घडली आहेत, की प्रश्न घाईघाईने वाचल्यामुळे वेगळाच अर्थ ध्वनित झाला व उत्तर येत असूनही चुकले. प्रश्नात जर दोन किंवा तीन भाग पडत असतील, तर तेही लगेच खूण करून नोंदवले पाहिजे. उदा. 'गरिबीच्या मोजमापसंबंधी निर्माण झालेली समस्या सांगून जागतिकीकरणामुळे गरिबीवर काय परिणाम झाला आहे ते लिहा.' या प्रश्नामध्ये सरळसरळ दोन भाग आहेत. एक गरिबीच्या मोजमापासंबंधीचा वाद व दुसरा म्हणजे जागतिकीकरण व गरिबी यांचा आंतरसंबंध. त्यामुळे समजा जर हा प्रश्न २० गुणांचा असेल, तर यातील प्रत्येक भागाला दहा गुण समजून तसे लिहिले पाहिजे. तेवढा वेळ व जागा त्यासाठी द्यावी लागेल. नेहमीच अशी समान विभागणी नसते. उदा. 'आजीविका कार्यक्रमाची उद्दिष्टे सांगून त्यातून अर्थव्यवस्थेतील कोणत्या सुप्त क्षमतांचा पर्याय वापर करून घेता येईल याची चर्चा करा. या अभियानाची कालचौकट स्पष्ट करा'. इथे १५ गुणांसाठी आजीविका कार्यक्रम लिहून मग उरलेल्या पाच गुणांसाठी कालचौकट लिहिता येईल. थोडक्यात प्रश्नाच्या कोणत्या भागावर किती भारांक (weigtage) आहे, ते ओळखता आले पाहिजे. प्रश्नात आलेल्या एखाद्या शब्दाने मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित होता कामा नये. जसे आपण घेतलेल्या पहिल्या प्रश्नात जागतिकीकरण शब्द आला आहे. जागतिकीकरण हा संपूर्ण विषयच आहे, ज्याला अनेक आयाम आहेत. पण इथे आपल्याला जागतिकीकरणाचा पैलू मांडायचा आहे. जर उत्तर भरकटत गेले, तर गुण मिळत नाहीतच, शिवाय परीक्षकावर चुकीचा प्रभाव (bad impression) पडतो. हे सगळे जमवून आणण्यासाठी एक युक्ती म्हणजे प्रश्नपत्रिकेतच प्रश्नातील जे महत्त्वाचे शब्द (key words) असतील, त्याखाली लगेच अधोरेखित करायचे व उत्तर लिहिताना प्रश्नाचे पाडलेले भाग व अधोरेखित केलेले शब्द यांच्यावर वारंवार नजर टाकायची. ज्यामुळे उत्तर भरकटत जाण्याचा धोका कमी होतो. ही सर्व काळजी जे उमेदवार घेत नाहीत, त्यांची समान तक्रार असते की खूप चांगली उत्तरे देऊनही कमीच गुण मिळाले. आमचा काय दोष! पण मुद्दा म्हणजे लिहिलेली उत्तरे विचारलेल्या प्रश्नांची होती का? का प्रश्न वेगळा व उत्तर वेगळेच होते.
अचूक उत्तर कसे ओळखायचे?
अचूक उत्तर कुठले हे बघण्यासाठी आपल्याला आधी प्रश्न म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. प्रश्न हा एक विशिष्ट समस्या, चर्चा व माहिती यांना बाहेर काढण्यासाठी दिलेला लीड असतो. म्हणजेच कारपेटची गुंडाळी उलगडावी तसे प्रश्नातून उत्तर उलगडत गेले पाहिजे किंवा कारपेट परत गुंडाळले तर प्रश्नच तयार झाला पाहिजे. याचाच अर्थ अचूक उत्तर ते, जे वाचल्यावर आपल्या मनात तो प्रश्न उभा राहतो. जर एखाद्याला प्रश्न न सांगता उत्तर वाचायला दिले व त्याने तो प्रश्न अचूक ओळखला, तर ते अचूक उत्तर. अशाप्रकारे प्रश्न व उत्तर यांचा जैविक संबंध असला तर गुण मिळतातच.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment