नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

28) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

मिनी परेडच्या शेवटाकडे...(लेख क्र . २८)

मिनी परेडच्या शेवटाकडे
मानसशास्त्र

यावर्षीच्या निकालात पहिल्या शंभरापैकी एकाचा मानसशास्त्र हा वैकल्पिक विषय होता. मानसशास्त्र हा विषय आपले आयुष्य व्यापणारा आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माणसाची मानसिकता कशी बदलत जाते हे येथे अभ्यासता येते. हॅलोसिनेशन होते म्हणजे काय होते, केमिकल लोचा कसा होतो हे मानसशास्त्र पद्धतशीरपणे उलगडून दाखवते; हा मानव्यविद्याशाखेतील वैद्यकीय विषय आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याचा वेगाने विकास होत आहे. अभ्यासक्रम खूप मोठा वा छोटा नाही. एकदा विषयाचे सूत्र समजले की अभ्यासाला गती येते.

नेहमीप्रमाणे पहिला पेपर हा सिद्धांत्त व सज्ञांचा व दुसरा पेपर हा उपयोजन अशीच विभागणी आहे. पहिल्या पेपरचा अभ्यास करून पाया पक्का झाला की दुसरा पेपर कमी वेळात संपवता येतो. उत्तरे वरवरची न वाटता, वैज्ञानिक पद्धतीने व त्या प्रकारच्या भाषेत मांडावी लागतात, माणसाची मानसिक घडण जैविक आहे की सामाजिक यासारखे महत्त्वाचे वाद व त्यातील प्रतिवाद जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. ज्या थोड्या वैकल्पिक विषयांमध्ये 'स्वतःच्या भाषेत' उत्तर लिहिण्याला आयोग महत्त्व देतो त्यापैकी एक मानसशास्त्र आहे. उत्तरे देताना बातम्या, चित्रपट यातील उदाहरणे नावीन्यपूर्ण पद्धतीने जोडून घेता येतात. हा विषय मेडिकलचे पदवीधर आवडीने घेतात. इतरांनीही काही प्रमाणात हा विषय घेऊन यश प्राप्त केले आहे.

तत्त्वज्ञान

मानव्यविदयाशाखेतील एक लोकप्रिय व भरभरून गुण देणारा विषय म्हणजे तत्त्वज्ञान. यावर्षीच्या यादीत अंतिम शंभर जणांपैकी पाच जणांचा हा वैकल्पिक विषय होता. भारतीय संस्कृती व विचारांचा मोठा भाग तत्त्वज्ञानाने व्यापला आहे. पाश्चात्यांनी प्राचीन युगात मोठे मंथन केले उदा. 'प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॅाटल, किंवा आधुनिक युगात हेगेल, मुरे, रसेल यांनी चर्चा पुढे नेली. हा सर्व अभ्यास पेपर एक मध्ये आहे. पेपर दोन मध्ये सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान उदा. मार्क्सवाद, मानवतावाद तसेच धार्मिक तत्त्वज्ञान उदा. धर्म आणि नैतिकता, धार्मिक अनेकतावाद यांचा अभ्यास करायचा आहे.

अभ्यासक्रम तुलनेने छोटा आहे. विचारांच्या विस्तारापेक्षा खोलीला महत्त्व या विषयात जास्त आहे. त्यामुळे 'चिंतन' असेल तर विषय हाताळणे सोपे जाते. हा विषय पूर्णपणे मराठीतही तयार करता येतो हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. हा विषय एकीकडे अभ्यासक्रम व रेडीमेड विचार देतोच पण त्याचवेळी उमेदवारांना स्वतःची अशी विचारपद्धती विकसित करून मांडण्याची संधीही देतो. स्वतःचे मत मांडणे इथे निर्णायक ठरते.

हा विषय लोकप्रिय असला तरी मार्गदर्शन उपलब्ध नसताना तो घेणे अडचणीचे ठरू शकते. सगळ्याच क्लिष्ट संकल्पना वाचून कळत नाहीत. अशा वेळी जर मार्गदर्शन असेल तर अमूर्त संकल्पनाही लवकर स्पष्ट होतात. हा विषय बाहेरून

आकर्षक वाटला तरी तत्त्वज्ञानाच्या खोल विवरात उतरणे कधीकधी कंटाळवाणे ठरू शकते. त्यामुळे खरोखरच तत्त्वज्ञानाची आवड असेल तर घेतलेला बरा.

उरलसुरलं

आतापर्यंत आपण काही लोकप्रिय पर्याय बघितले. त्यापलीकडेही काही वैकल्पिक विषय आहेत. उदा. कॉमर्स. कॉमर्समध्ये पहिला पेपर हा सैद्धांतिक आहे तर दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल आहे. हा विषयही चांगले यश देतो. जसे आपल्याकडे संपदा मेहताचे उदाहरण आहे. पण नुसत्या बी.कॉमच्या शिदोरीवर हा विषय घेणे अडचणीचे ठरू शकते कारण बहुसंख्य स्पर्धक हे चार्टड अकाऊटंट असतात. मेडिकल सायन्स हाही एक यशदायी वैकल्पिक विषय आहे. या वर्षीच्या निकालात महाराष्ट्रातून तारूल भावसार हिने हा विषय घेऊन यश मिळवले आहे. विशेष म्हणजे ती होमिओपॅथीची पदवीधर असूनही तिने हा विषय घेऊन यश मिळवले आहे. आपल्याकडे श्रीकर परदेशी यांचे उदाहरण तर आहेच. त्यांचाही मेडिकल सायन्स हा वैकल्पिक विषय होता.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित असे शुद्ध विज्ञानाचे विषय घेऊनही यश मिळवणारे उमेदवारही आहेत. गणित विषय घेऊन तर पहिल्या शंभरात चौघांनी बाजी मारली आहे. हे विषय एकतर खूप गुण देतात नाहीतर कधीकधी एकदम बेरीज खाली आणतात. पाली साहित्य हाही एक लोकप्रिय विषय होता. पण मागे झालेल्या बदलांमध्ये आयोगाने तो कुठलेही कारण न देता काढून टाकला आहे.

'वैकल्पिक'चे महत्त्व अबाधित

जेव्हा दोनऐवजी एकच वैकल्पिक विषय ठेवला व त्याचवेळी सामान्य अध्ययनाचे टॉपिक व गुण वाढवले तेव्हा असे वाटले होते की वैकल्पिक विषयाचे महत्त्व आता कमी होईल. पण तसे झालेले नाही. सामान्य अध्ययनात सर्वांना जवळपास सारखेच गुण पडत आहेत. अशावेळी वैकल्पिक विषयांचे गुण निर्णायक भूमिका निभावताना दिसतात. अनेकांना सरासरी ५०० पैकी २०० गुण आहेत तर काहींनी वैकल्पिक विषयात ३५०पर्यंत स्कोअर नेला आहे. दीडशे मार्कांचा फरक निर्णायक ठरतो. तेव्हा वैकल्पिक विषयांचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे या निष्कर्षाला यावे लागते.



- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- स्पर्धा परीक्षा आणि माध्यमाची निवड

No comments:

Post a Comment