34) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...
लिखाणाचा सराव...(लेख क्र . ३४)
स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर लिहावे लागते. शाळेनंतर लिखाण करायचा सराव राहिलेला नसतो. कधी कधी तर फक्त सही करण्यापुरते पेन उघडले जाते. अशा परिस्थितीत आपला अभ्यास आयोगासमोर मांडता आला नाही, तर आयोगाला कसे कळणार, की समोरचा उमेदवार पद देण्यास लायक आहे?
लेखनाचा हा प्रश्न 'एमपीएससी'च्या परीक्षेत आता उद्भवत नाही; कारण ती परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची झाली आहे; पण यूपीएससी परीक्षेत लेखन कौशल्ये निर्णायक ठरतात. मागे आपण नोट्स कशा काढाव्यात, याची चर्चा करताना काही आवश्यक मुद्दे आधीच पाहिले होते, जसे नोट्स काढणे हा एक लेखन सरावाचा भाग आहे, लेखन शैली विकसित झाली पाहिजे, बिनरेघांच्या कागदावर सराव करायला हवा, अक्षर सुरवातीपासून शेवटपर्यंत सारखेच हवे इत्यादी. आपण आज इतर काही पैलूंची चर्चा करू.
कौशल्याचे पैलू
लेखन या कौशल्याचा पहिला पैलू म्हणजे भाषेवर पकड असली पाहिजे. तुमचे जे कोणते माध्यम आहे, मराठी किंवा इंग्रजी, यात प्रवाही व प्रभावी लेखन करता आले पाहिजे. विशेषतः तुम्ही इंग्रजीत लिहित असाल, तर परीक्षकाला कुठेही जाणवता कामा नये, की उमेदवाराचे दहावीपर्यंचे शिक्षण राज्यभाषेमध्ये झाले आहे. बोली भाषा व लेखी भाषा यात फरक असतो. बोली भाषा प्रमाणित नसते. तिच्यापासून एकाच वेळी अनेक अर्थ निघतात. लेखी भाषा प्रमाणित असते व ती अचूक अर्थापर्यंत पोहचवते. तेव्हा लेखी भाषेचा सराव केला पाहिजे. थोडक्यात, भाषेवर काम करावे लागते. नवीन शब्द शिकणे व ते प्रयत्नपूर्वक लिखाणात वापरणे याला पर्याय नाही.
सराव
लेखन चांगले करायचे असेल, तर एक चांगली युक्ती, म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात एखाद्या विषयावर स्वतःचे चिंतन लिहून काढणे. हा सराव असेल, तर आपोआपच नवीन विषयावरसुद्धा लेखणी झरू लागते. अशा प्रकारची तयारी नसेल, तर परीक्षेत पहिली पाच मिनिटे उत्तर कसे संघटित करायचे याचा विचार करण्यातच जातात. असा प्रत्येक प्रश्नांच्या सुरवातीला वेळ वाया जाऊ लागला, तर पेपर वेळेत पूर्ण होणेच शक्य नाही. आपले उत्तर नेहमी सलग, संघटित व प्रमाणबद्ध असले पाहिजे. सुरुवात, मध्य व शेवट हे प्रश्नाशी संबंधित व एकमेकांशी योग्य रितीने जोडलेले पाहिजे. हे सर्व साध्य करायचे असेल, तर प्रत्येक उत्तर लिहायच्या आधी उत्तराचा थोडक्यात आराखडा तयार करता आला पाहिजे. उत्तराशी संबंधित मुद्दे काढून त्यांना क्रमांक द्यायचे व त्या क्रमाने ते उत्तरात आणायचे. ही सर्व चर्चा वाचायला सोपी वाटू शकेल; पण ही कसरत करणे अनेकांना कठीण ते अशक्य वाटते. ते थेट उत्तराला भिडतात, हातघाईची लढाई करून प्रश्नाचा भेद करायचा प्रयत्न करतात; पण त्याचा काही उपयोग नाही. उत्तरात आवश्यक ते सर्व मुद्दे येऊनही पुरेसे गुण मिळत नाहीत; कारण ते मुद्दे क्रमाने आलेले नसतात.
महत्वाचा मुद्दा मध्ये, कमी महत्त्वाचा मुद्दा सुरवातीला, असा सगळा गडबडगुंडा होतो; पण आराखडा तयार करण्याइतका वेळ परीक्षेत असतो का? तर उत्तर आहे, की असतो. चांगला बॅट्समन जसा धावा चोरतो, तसा वेळ चोरून आराखडा तयार करायलाच हवा. हे सरावाने जमते.
कमी शब्द, जास्त आशय
कमीत शब्दांत जास्त अर्थ पोहचवणे ही एक कला आहे. तिची आराधना करून त्या कलेला प्रसन्न करून घेतले पाहिजे. विद्यापीठीय स्तरावर काही वेळा जास्त लिहिल्यावरच गुण मिळतात. स्पर्धा परीक्षांमध्ये वायफळ लिहिले, तर गुण कमी होण्याचीच शक्यता जास्त असते. शब्दांची, कल्पनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे.
उत्तरे मुद्द्यांमध्ये लिहावीत, की उताऱ्यांमध्ये, हा एक उमेदवारांना पडणारा सनातन प्रश्न आहे. वेळ कमी असल्याने मुद्द्यांमध्ये लिहिण्याकडे ओढा असतो. त्यात जास्त मुद्दे मांडता येतात, असाही दावा असतो. विशेषतः जी तांत्रिक विषयांची पदवी घेऊन आलेली मुले आहेत, त्यांचा मुद्देपद्धतीवर जोर असतो. या प्रश्नाची सोडवणूक करणे सोपे आहे. या प्रकारचे निर्णय आधीच घ्यायचे कारण नाही. प्रश्नाचे स्वरूप पाहून हा निर्णय घेतला पाहिजे. कारणे द्या, मुद्देसूद मांडा असे प्रश्नात म्हटले असेल, तर मुद्देपद्धती योग्य. चर्चा करा, टीकात्मक समीक्षा करा, असे प्रश्नात म्हटले असेल, तर उताराच्या स्वरूपात मांडणी केलेली चांगली. सगळेच मुद्द्यांमध्ये किंवा सगळे उताऱ्याच्या स्वरूपात मांडणे चुकीचे ठरेल.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment