नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday, 13 August 2015

31) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

कस स्मरणशक्तीचा...(लेख क्र . ३१)

कस स्मरणशक्तीचा
 
स्मरणशक्ती वाढवणे व तिचा योग्य वापर करून घेणे हा कौशल्याचा भाग आहे. ते स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी लागणारे आवश्यक कौशल्य आहे. स्पर्धापरीक्षांचा अभ्यासक्रम अवाढव्य असतो व शिवाय तो गतिमानही असतो. त्यात एकच एक विषय नसून अनेक विषयांची खिचडीच असते. अशावेळी इतके सगळे ज्ञान लक्षात कसे ठेवायचे, हा मूलभूत प्रश्न असतो. परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही व तुमचे ज्ञान हेच एकमेकांचे सोबती असता. अशात ऐनवेळी स्मरणशक्ती दगा दिला तर काय, हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. अभ्यास करतानाच हे सर्व लक्षात राहील की नाही ही भीती सतावते.

अभ्यास : बौद्धिक व्यायाम

अभ्यास ही प्रक्रिया समजून घेता आली, तर समस्येच्या सोडवणुकीकडे जाता येईल. जसे आपण जिममध्ये शरीराचा व्यायाम करतो, तसाच अभ्यास हा एक बौद्धिक व्यायाम आहे. जिममध्ये आपण एकाच प्रकारचा व्यायाम करत नाही. त्याच प्रकारे अभ्यास करतानाही वाचन, चर्चा, लेक्चर ऐकणे अशा विविध प्रकारे हा व्यायाम केला, तर फळ मिळते. व्यायाम मध्येच सोडला, तर केलेला व्यायामही वाया जातो. तसा अभ्यासही मध्येच सोडून चालत नाही. शारीरिक व्यायाम जसा शरीर सदृढ ठेवतो, तसे चर्चा, वादविवाद यातून बुद्धी तरतरीत राहते. त्यामुळे पूर्णपणे एकट्याने अभ्यास करू नये.

एकाग्रता : एक तपश्चर्या

एखादी गोष्ट स्मरणात राहत नाही, यामागचे कारण काही वेळा अगदी साधे असते. ते म्हणजे, ती गोष्ट नीट समजलेलीच नसते. ती वाचण्यात किंवा ऐकण्यात चूक झालेली असते. अशा वेळी स्मरणशक्तीला दोष देण्यात काही अर्थ नाही. जी गोष्ट मुळात आतच घेतलेली नाही, ती स्मरणशक्ती बाहेर कुठून काढून दाखवणार? त्यामुळे मुळात आपले शरीर सदृढ ठेवले पाहिजे. विश्वनाथन आनंदसारखे बुद्धिबळ खेळाडू खूप चांगली शारीरिक क्षमता जोपासतात, ज्यामुळे त्यांना बुद्धिबळाच्या पटावर लक्ष केंद्रीत करता येते. एकाग्रता वाढवण्यासाठी चालणे, जॉगिंग व योगासने असा व्यायाम करणे गरजेचे आहे. काहींची अशी तक्रार असते की, त्यात वेळ जातो व तितका अभ्यासाचा वेळ कमी होतो. पण १६ तास अभ्यास करून आठ तासांइतकेच लक्षात रहात असेल, तर काय उपयोग? आठ तास एकाग्रतेने अभ्यास करून तितके लक्षात राहिले, तरी पुरेसे आहे. दररोज एक तास तरी रक्ताभिसरण होणे आवश्यक आहे. तरच दिवसभर उत्साह वाटतो व ऊर्जा टिकून राहते. ज्या शरीराच्या बळावर ही कठीण परीक्षा व पुढे मोठमोठ्या कामगिऱ्या पार पाडायच्या, त्या शरीराची जोपासना करायलाच हवी. ही एक गुंतवणूक आहे, असे समजा.

लक्षात का राहात नाही?

ढोबळमानाने दोन पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवता येतात. पहिली सोपी व आपल्याकडील लोकप्रिय पद्धत म्हणजे तथ्ये (facts) आली की, जशीच्या तशी स्वीकारायची. पाठच करून टाकायची. ही पद्धत वापरून अभ्यास झटपट संपवता येतो. सवयीने पाठांतराची क्षमताही वाढत जाते. ही पद्धत म्हणजे मनाच्या विशाल पटावर हजारो बिंदू तयार करून ठेवणे व ते गरजेपणे वापरणे. या पद्धतीचे तोटे जास्त आहेत. ही पद्धत जेव्हा अभ्यासक्रम तुलनेने छोटा असतो (दहावी, बारावी) तेव्हा जास्त परिणामकारक ठरते. पण स्पर्धा परीक्षेसारख्या विशाल अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात ही पद्धत कुचकामी ठरते. एकतर लाखो बिंदू मनाच्या पटावर सुटेसुटे तयार करून सांभाळणे, ही गोष्ट अजिबात सोपी नाही. दुसरे म्हणजे, यात 'योग्यवेळी हवा तो बिंदू सापडला नाही तर काय?' असा प्रश्न उभा राहतो. ही पद्धत वापरणाऱ्यांना ओळखणे सोपे असते. या उमेदवारांची कॉमन तक्रार असते- परीक्षेत 'ब्लँक' झालो. बाहेर आल्यावर सगळे आठवले व डोक्याला हात लावला.

स्मरणात ठेवायची युक्ती

वरील पद्धतीपेक्षा चांगली पद्धत म्हणजे, तथ्यांच्या सर्व बिंदूंना विश्लेषणाच्या धाग्यांनी जोडणे. या पद्धतीत कुठलेही तथ्य जाणून घेताना ते तसेच्या तसे न स्वीकारता त्याच्या मागचे व पुढचे दुवे जोडून घ्यायचे. एखाद्या महत्त्वाच्या घटनेमागे अनेक दुवे असू शकतात. या दुव्यांनी त्या तथ्याला ओवून घ्यायचे. ही एक प्रकारची वृक्षासारखी संरचना तयार होईल. ऐन परीक्षेत 'ब्लँक' होण्याची वेळ येत नाही. पुन्हा हे माहितीचे जंगल घनदाट असल्याने हे वृक्ष एकमेकांत मिसळलेले असतात. विज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र या सगळ्याच विषयांचे दुवे एकमेकांशी जोडलेले आहेत. मग तर काम अजूनच सोपे होते. कोणत्याही एका फांदीवरून दुसऱ्या वृक्षावर उडी मारता येते. हे वृक्ष म्हणजे माहितीचे जंगल व आपण त्यावरून लीलया याहू करत जाणारे टारझनच जणू. ही पद्धत एकदा जमली की, माहितीचा विशाल साठा योग्य प्रकारे साठवता येतो व हवा तेव्हा वापरताही येतो.

यादों की बारात

वरील पद्धत वापरण्यासाठी पूर्वअट म्हणजे प्रश्न विचारणे. एखादी गोष्ट का घडली, तेव्हाच का घडली व तिच्यामुळे काय परिणाम झाले, हे जाणून घेणे गरजेचे आहे. यात थोडा वेळ गेला, तरी त्यामुळे गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. अगदी तथ्ये लक्षात राहिली, तरी सारांश तर लक्षात राहतोच.

स्मरणशक्तीच्या बाबतीत एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सगळ्यांकडे ती सारखीच असते. पण वापरायची सवय नसल्यास ती झोपी जाते. विषयामध्ये आवड निर्माण झाली की, गोष्टी सोप्या होतात. तेव्हा अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे. एरवी 'ढ' म्हटले जाणारे विद्यार्थी जर भेंड्या खेळायला लागले, तर कोणाला हार जात नाहीत. याचा अर्थ त्यांच्याकडेही इतरांइतकीच क्षमता असते, फक्त त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झालेली नसते इतकेच.

माहितीचे कमी महत्त्वाची आणि जास्त महत्त्वाची असे वर्गीकरण करणेही सोयीचे ठरते. कमी महत्त्वाची अल्पकालीन स्मरणात ठेवल्यास जास्त महत्त्वाची माहिती त्याहून अधिक काळ टिकवून ठेवणे सोपे जाते.

शेवटी स्मरणशक्तीचा आणि इच्छाशक्तीचाही जवळचा संबंध आहे. 'करोगे याद तो हर याद बात आयेगी' हे खरेच आहे. त्याप्रमाणे जाणीवपूर्वक प्रयत्न करायला काय हरकत आहे?







- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- अवांतर वाचन हवेच!

No comments:

Post a Comment