32) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...
अवांतर वाचन हवेच!...(लेख क्र . ३२)
स्पर्धापरीक्षांमधील यश म्हणजे अभ्यास व तंत्र यांची सांगड घालून मिळवलेला विजय असतो. तंत्र म्हणजे परीक्षापद्धतीवर तसेच त्यातील तपशीलावरची पकड. पण अभ्यासाची दिशाच योग्य नसेल, तर केवळ तंत्राने यश मिळू शकत नाही.
ज्ञान विरुद्ध परीक्षा
ज्ञान मिळवत बसायचे की परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवायचे असे द्वंद्व नेहमीच निर्माण होते. पण हे खरे नाही. दोन्ही एकाच वेळी करून मिळवलेले यश खरे यश आहे. ज्ञानाशिवाय पद मिळाले, तर जीवनाची परीक्षा नापास होण्याचा संभव आहे. यश मिळवताना एकास एक असा काही फॉर्म्युला नसतो. मी एवढे करीन व त्यातून एवढे यश मला मिळाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण इतकी संकुचित वृत्ती ठेवून चालत नाही. 'जिदंगी कोई सौदा नही'. त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम द्या, तुम्हाला त्याहून जास्त नक्कीच परत मिळेल. नमनाला हे घडाभर तेल ओतण्याचे कारण म्हणजे अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून देणे हे आहे. या वाचनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. त्यातून जीवनाची समज वाढते व त्याचा परीक्षेतही फायदा होतो.
अवांतर वाचन म्हणजे काय?
अवांतर वाचन करताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काहीही वाचून चालणार नाही. अशी पुस्तके वाचली पाहिजेत, जी आपल्या ध्येयाला पूरक आहेत. अशी पुस्तके जी थेट पाठ्यपुस्तके नाहीत, पण स्पर्धापरीक्षेच्या परिघातील आहेत. अशी पुस्तके ज्यातून आपल्याला मोठे विचार, प्रसंग, महान व्यक्ती व त्यांचे चरित्र यांची ओळख होईल. या सर्वांतून आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतीलच, पण या सर्व माहितीचा वापर आपण निबंध लिहिताना व मुलाखतीत करू शकतो. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचे 'अग्निपंख' हे आत्मचरित्र फक्त त्यांचे व्यक्तीचित्र नाही तर भारताच्या सरंक्षण व अवकाश क्षेत्रातील यशाची रोमांचक गाथा आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांचे 'माझेही एक स्वप्न होते' ही नुसती 'अमूल'ची यशोगाथा नसून, सहकार क्षेत्राची क्षमता दाखवणारा ऐवज आहे.
'आम्हा घरी धन,
शब्दाचीच रत्ने'
अवांतर वाचन सातत्याने करायला हवे. सगळीच पुस्तके विकत घ्यायची गरज नाही. एखादे ग्रंथालय लावून तिथून आणली तरी चालतील. साधारणतः पंधरा दिवसांत एक पुस्तक झाले पाहिजे या गतीने वाचायचे. चांगली पुस्तके वाचावी असे म्हणतात. पण चांगली म्हणजे काय? 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात एक प्रसंग आहे. मुन्नाभाई हा गांधीजींवरील पुस्तके वाचायला जातो. तेथील मोठीमोठी पुस्तके पाहून तो घाबरतो. मग तो तेथील सर्वात छोटे पुस्तक घेऊन सुरुवात करतो. तेच बरोबर आहे. तुम्हाला जे पचेल, पटेल व समजेल ते चांगले पुस्तक. हळुहळू आपला चोखंदळपणा वाढत जाईलच. त्यामुळे अगदी यादी करून तिच पुस्तके वाचली पाहिजेत, असे काही नाही. हळुहळू वाचनात वैविध्यही आणले पाहिजे. कथा कादंबऱ्या, कविता, नाटके हे सर्वच वाचून बघितले पाहिजे. मराठीमध्ये उत्तम इंग्रजी पुस्तकांचे दर्जेदार अनुवाद उपलब्ध आहेत, तेही वाचता येतील. इंग्रजी भाषेत तर ज्ञानभांडार आहे. पण सुरुवात अगदी चेतन भगतने केली तरी चालेल.
अवांतर वाचन कधी?
मागे एकदा आपण अभ्यासाच्या सर्वोत्तम वेळेची (Prime time) चर्चा केली होती. अवांतर वाचन नॉनप्राइम टाइमप्रसंगी केलेले चांगले. या पुस्तकांच्या आपण नोट्स काढत नाही किंवा फार काटेकोरपणे वाचत नाही. तेव्हा प्रवासात किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे वाचन करायला हरकत नाही. ऐन परीक्षेच्या काळात हे वाचन थांबवले तरी चालेल. ही पुस्तके अगदी वेळ लावून वाचायची गरज नाही. छोटी पुस्तके लवकर होतील, पुस्तक मोठे असेल तर वेळ लागेल.
वाचनक्रिया
अभ्यासाचे वाचताना किंवा अवांतर वाचन करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. जिथे तुम्ही वाचन कराल ती जागा शांत, स्वच्छ असली पाहिजे. तिथे पुरेसा प्रकाश पाहिजे. खुर्च्या व टेबल नीट बसता येईल अशा प्रकारचे हवे. झोपून वाचू नये व पुस्तके डोक्याखाली घेऊन झोपू नये. थेट पुस्तकातून किंवा किंडलवर वाचावे, कम्प्युटरवर संपूर्ण पुस्तक वाचायचा अट्टहास करू नये. पुस्तक पुरेशा अंतरावर ठेवून वाचावे. पुस्तके स्वतःची असो वा ग्रंथालयाची, ती नीट हाताळावीत. वाचून झालेल्या पानावर परत जाण्यासाठी कागद दुमडू नये, तर बुकमार्कच्या वापर करावा. ग्रंथालयाच्या पुस्तकावर अधोरेखित करू नये किंवा शेरे मारू नयेत. पाने तर अजिबात फाडू नयेत. पुस्तकाला नेहमी प्लास्टिकचे कव्हर घालावे, स्वतःच्या व शक्य असेल ग्रंथालयाच्याही. पुस्तक जर ग्रंथालयातून आणले असेल वा मित्राचे असेल तर वेळच्या वेळी परत करावे.
पुस्तके जरूर एकमेकांमध्ये शेअर करावीत. ज्ञान लपवून ठेवल्याने कमी होते व वाटल्याने वाढते. उद्या आपण अवांतर वाचनाची दिशा व गती याची चर्चा करू.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment