नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday, 13 August 2015

21) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

मुख्य परीक्षेचा वाडा चिरेबंदी...(लेख क्र . २१)

 
यूपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची महिती आपण घेऊया. पूर्व परीक्षेचा आराखडा एसपीएससी व यूपीएससीमध्ये समान आहे. पण मुख्य परीक्षेची संरचना वेगवेगळी आहे. एकतर यूपीएससीची मुख्य परीक्षा वर्णनात्मक आहे. तिच्यात एक वैकल्पिक विषय (optional subject) घ्यावा लागतो.
विषय आणि गुणविभागणी

१. निबंध - २५० गुण

२. सामान्य अध्ययन -

१ (भारतीय संस्कृती व वारसा, जगाचा इतिहास व भूगोल आणि समाज) २५० गुण

३. सामान्य अध्ययन -

२ (प्रशासनाची परिणामकारकता, राज्यघटना, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आणि आंतरराष्ट्रीय संबंध) २५० गुण

४. सामान्य अध्ययन -

३ (तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन) २५० गुण

५. सामान्य अध्ययन -

४ (नैतिकता, आत्मनिष्ठा आणि विचारकल) २५० गुण

६. वैकल्पिक विषय -

पेपर १ - २५० गुण, पेपर २ - २५० गुण (एकूण ५०० गुण)

अशा प्रकारे एकूण १७५० गुणांची मुख्य परीक्षा असते. त्यातील १२५० गुणांचा अभ्यासक्रम सर्वांना समान असतो. फक्त ५०० गुणांचा वैकल्पिक विषय प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.


मराठी व इंग्रजी अनिवार्य

याशिवाय दोन अनिवार्य भाषा विषयांचे पेपर असतात. (१००गुण प्रत्येकी) ते म्हणजे एक इंग्रजी भाषा व दुसरी एखादी भारतीय भाषा उदा. मराठी. हे पेपर फक्त पात्रता (qualifying) स्वरूपाचे असतात. त्यातील प्रश्न हे दहावीच्या स्तरावरचे असतात. त्यात प्रत्येकी २५% गुण मिळाले की पुरेसे होते. पण ते पेपर आधी तपासतात व उमेदवार एखाद्या किंवा दोन्ही विषयात किमान पात्रतेचे गुण मिळवू शकला नाही, तर तो स्पर्धेतून बाद होतो. पूर्वी तर अशा उमेदवारांचे मुख्य परीक्षेचे इतर पेपरच तपासत नसत. त्यामुळे कोणत्या विषयात किती गुण मिळाले, हेही कळत नसे. यावर्षीपासून प्रथमच केंद्रीय लोकसेवा आयोगाने अशा उमेदवारांचे पेपर तपासून गुण जाहीर करण्याचे मान्य केले आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे निदान गुण तर कळतीलच व पुढच्या वर्षीच्या परीक्षेसाठी तयारी करता येईल.भाषा विषयक पेपरांमध्ये एक छोटा निबंध, उताऱ्याचा सारांश, उताऱ्यावरील प्रश्न, कवितेचा अर्थ आणि काही व्याकरण विषयक प्रश्न असतात. या प्रश्नांचा स्तर दहावीच्या स्तरावरचा असल्याने व फक्त २५% गुण मिळवायचे असल्याने हे पेपर तसे कठीण नसतात. पण हे छोटे मियाँ कधी कधी महागात पडतात.

मराठी माध्यमातून आलेल्या व मराठीतून परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांना इंग्रजीचा पेपर जड जातो. तर बरोबर उलटी स्थिती म्हणजे, इंग्रजी माध्यमातून आलेल्यांना मराठी/हिंदीचा पेपर जड जाऊ शकतो. विशेषतः लिहायची सवय नसल्याने हे होते. पण जुने पेपर सोडवले, थोडा सराव करून ठेवला, तर ते जमतात. या भाषा विषयक पेपरमागे यूपीएससीचा विशिष्ट उद्देश आहे. कोणत्याही माध्यमातून परीक्षा देणारा विद्यार्थी असला, तरी त्याला कामापुरते तरी इंग्रजी आले पाहिजे, हा इंग्रजी भाषा विषयक पेपर ठेवण्यामागे विचार आहे. दुसरीकडे, नागरी सेवांसाठी महत्त्वाची परीक्षा देणाऱ्यांना निदान एक तरी भारतीय भाषा आली पाहिजे, हा हेतू आहे. शेवटी तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रशासन न्यायचे असेल, तर त्या जनता जनार्दनाची भाषा आली पाहिजे. एक तरी भारतीय भाषा येत असेल, तर काम करताना त्या त्या राज्याची भाषा शिकणे फारसे कठीण जाणार नाही, असाही तर्क यामागे आहे. त्यामुळे आयोगाच्या उदात्त हेतूंना दाद देऊन ते पेपर अगदी गांभीर्याने द्यावे लागतात. कितीही सोपे वाटले, तरी पूर्ण तीन तास बसून ते पेपर सोडवायचे असतात. मग फारशी समस्या येत नाही.

मुख्य परीक्षेची टेस्ट मॅच

मुख्य परीक्षा व पूर्व परीक्षा यात फरक आहे. पूर्व परीक्षा २०-२० मॅच असेल, तर मुख्य परीक्षा टेस्ट मॅच असते. खेळण्याचा स्टॅमिना व टेंपरामेंट त्यासाठी लागते. आठवडाभर परीक्षा चालते. रोज सहा तास पेपर असतात. तीन तासानंतर दीड तास सुट्टी असते. दरदिवशी सहा तासांत साधारणतः १० हजार शब्द लिहावे लागतात. वेळ इतका कमी असतो की, लिहितानाच विचार करावा लागतो. तब्बल २७ तास मुख्य परीक्षा चालते व त्यात ४० हजार शब्द पेरून यशाचे पीक घ्यावे लागते. हा सगळाच प्रकार शारीरिक व मानसिक कसोटी पाहणारा असतो. म्हणनूच मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करावा लागतो. दीर्घ काळ एका ठिकाणी बसून पेपर लिहिण्याचा सराव, हात लिहिता असणे, लिखाणाची स्वतःची शैली विकसित झालेली असणे, परीक्षेचा दबाव पेलण्याइतकी मानसिक व शारीरिक क्षमता, चांगले अक्षर व त्यात सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.







- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- विषय निवडीचा यक्षप्रश्न

No comments:

Post a Comment