नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday, 6 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

मुख्य परीक्षेचे अंतरंग .....( लेख क्र . १२ )

मुख्य परीक्षेचे अंतरंग

अभ्यास म्हणजे चार गोष्टींचे एकात्मिक रूप असते. वाचन, नोट्स, उजळणी व सराव.

संदर्भ साहित्य व पाठ्यपुस्तके

पहिला टप्पा म्हणजे वाचन. आज टीव्ही, कम्प्युटर, मोबाइल यांचा दबदबा असला, तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. अभ्यासाचे घटक व उपघटक यांच्या संदर्भात वाचन म्हणजे अभ्यासाचा पहिला टप्पा. अभ्यास साहित्य दोन प्रकारचे असते. एक संदर्भ साहित्य आणि दुसरे म्हणजे पाठ्यपुस्तके. संदर्भ साहित्य हे विस्तृत स्वरुपात उपलब्ध असते उदा. विश्वकोश. त्याचा उपयोग एखादी गोष्ट खोलात समजून घ्यायची असेल किंवा संकल्पना स्पष्ट करून घ्यायची असेल तर होतो. संदर्भ साहित्य खूप उपयोगी पडू शकते. संदर्भ साहित्य जितके दर्जेदार वापराल, तितका संकल्पनेतील गोंधळ कमी होईल. पण संदर्भ साहित्य वापरताना थोडी काळजी घ्यायला हवी. एकतर ते आपण ओळ अन्‍ ओळ वाचू शकत नाही, कारण ते प्रचंड असते. त्यामुळे त्याचा वापर आवश्यक तितकाच केला पाहिजे. दुसरे म्हणजे संदर्भ साहित्य आपल्या सर्वोत्तम अभ्यास वेळेव्यतिरिक्त (non prime time) वेळात वाचले पाहिजे.

पाठ्यपुस्तकातील गुंतवणूक

पाठ्यपुस्तके ही आपणासाठी सर्वात महत्त्वाची आहेत. हे खरे की, स्पर्धा परीक्षांच्या जगात विद्यापीठीय परीक्षांसारखी नेमलेली पाठ्यपुस्तके नसतात. लोकसेवा आयोग कधीच कोणत्या पुस्तकांची शिफारस करत नाही. तरी आता बाजारात विविध प्रकाशनांची अभ्यासक्रमानुसार तयार केलेली चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून घेता येईल. संदर्भ पुस्तके ग्रंथालयातून आणली तरी चालतील. पाठ्यपुस्तके मात्र स्वतःची स्वत: घेतलेली बरी. कारण ती वारंवार अभ्यासावी लागतात. त्यावर अभ्यास करताना आपण अधोरेखित (underline) करतो. मोकळ्या जागेत टिपणे लिहितो. हे सर्व ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांवर करता येत नाही व करूही नका. त्यासाठी स्वतःची पुस्तके विकत घेतलेली बरी. जर ती सहज मिळत नसतील, तर इंटरनेटवरूनदेखील मागवता येतात. जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच तर लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरदेखील उपलब्ध आहेत. या पाठ्यपुस्तकांची नीट काळजी घ्या. पुस्तकांवरची गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक असते.

वाचन योग

वाचन करताना सुरुवातीलाच येणारी अडचण म्हणजे काहीच समजत नाही. एक एक ओळ लावून वाचता वाचता वेळ खूप जातो. मग प्रश्न पडतो की, कुठे तडजोड करायची? संकल्पना आत्मसात करीत बसलो, तर वेळ कमी पडतो व वेग गाठायला गेलो तर संकल्पना अर्धवट राहतात, असा हा तिढा आहे. अर्थात सुवर्णमध्य गाठला पाहिजे. दोन्ही महत्त्वाचे आहे हे ओळखून अभ्यास केला पाहिजे. तरीही त्यातल्या त्यात वेग जास्त महत्त्वाचा आहे. किती वेळात अभ्यास साहित्याचा फडशा पाडायचा आहे, हे एकदा ठरवले की, आपोआप आकलनशक्तीही वाढत जाते. थोडक्यात थोडे ताणल्याशिवाय काम होत नाही. वाचनाचे वेळापत्रक आखताना आपला दिवसातील सर्वोत्तम वेळ (prime time) कोणता हे शोधून काढा. तो कोणाचा सकाळी ८ ते १० असू शकेल, तर कोणाचा मध्यरात्री १ते ३ असू शकेल. प्रत्येकाच्या शरीराचे जीवशास्त्रीय घड्याळ (biological clock) वेगवेगळे असते. त्यामुळे स्वत:चा सर्वोत्तम वेळ स्वत:च शोधून काढायला हवा. त्या वेळात अभ्यासाचा जो भाग समजायला कठीण वाटतो तो वाचा. या वेळात सर्वोत्तम एकाग्रता असते त्यामुळे अवघड गोष्टीही सोप्या होतात. आवडीचे विषय इतर वेळी (non prime time) करा. आवडीचे असल्याने आपोआप एकाग्रता वाढते व तेही होऊन जातात.

वाचन करताना एकाग्रता महत्त्वाची आहे. जर एकाग्रता सारखी ढळली, तर अमूर्त संकल्पना समजावून घेणे कठीण होऊन बसते. आज ही समस्या मोबाइल, व्हॉटसअॅप यामुळे वाढली आहे. जेव्हा मोबाइल नव्हते, तेव्हा एकदा वाचनालयात बसलेला विद्यार्थी संध्याकाळी घरी गेला की, मगच त्याला दिवसभरात काय झाले ते कळे. आता सेकंदा- सेकंदाला जगाशी संपर्क ठेवायच्या नादात अभ्यासाशी संपर्क तुटतो. तेव्हा अभ्यास करताना मोबाइल बंद ठेवा किंवा निदान सायलेंट मोडवर ठेवून बॅगेत ठेवून द्या. संपर्क ठेवणे ही गरज असली, तरी तिचे व्यसनात रुपांतर होता कामा नये. नाहीतर मग आता नवीन म्हण तयार झालीच आहे 'लवकर निजे, लवकर उठे, त्याच्याकडे इंटरनेट नसे'.

एकाग्रतेचे रहस्य

एकाग्रता प्राप्त होण्यासाठी मनोमन निश्चय करा की, मला हे एकच आयुष्य मिळाले आहे. त्यामुळे मी जे काही पाहीन, वाचेन, ऐकेन ते पूर्ण एकग्रतेनेच. याच निश्चयात अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. ते म्हणजे एक पुस्तक किती वेळा वाचायचे? दहा पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहावेळा वाचणे चांगले, असे म्हटले जाते. ते बरोबरही आहे. पण इथे थोडा फरक करावा लागेल. संदर्भ साहित्य एकदाच वाचा. पाठ्यपुस्तके एकाहून जास्त वेळा वाचायला हरकत नाही. पण म्हणजे ती दहावेळा वाचेन, असा निश्चय करायचा, असाही अर्थ होत नाही. शेवटी ज्ञान हे साध्य आहे व पुस्तके हे फक्त साधन आहेत, हे विसरून चालणार नाही.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- अभ्यासाची बाराखडी.

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

मुख्य परीक्षेची तयारी .....( लेख क्र . ११ )

मुख्य परीक्षेची तयारी
मागील काही लेखांमध्ये आपण पूर्वपरीक्षेच्या तयारीबाबत चर्चा केली. आता त्याहून जास्त महत्त्वाचा व निर्णायक टप्पा असलेल्या मुख्य परीक्षेची चर्चा करू. मुख्य परीक्षेच्या गुणांवर पद मिळणार की नाही हे ठरते. पूर्वपरीक्षेचे गुण पुढच्या टप्प्यात मोजले जात नाहीत. मुख्य परीक्षा व मुलाखत या दोघांची बेरीज घेऊन त्यावर रँक लावली जाते. मुलाखतीचा भारांक १२% हून जास्त नसतो. त्यामुळे यशामध्ये (किंवा अपयशामध्ये) ८८% वाटा मुख्य परीक्षेचा असतो. मुलाखतीमुळे रँक खालीवर होते; पण मुळात रँक मिळणार की नाही हे मुख्य परीक्षेच्या गुणांवरच ठरते.

नियोजनाचे महत्त्व

स्पर्धा परीक्षांचा आराखडा पूर्व, मुख्य व मुलाखत असा असला तरी अभ्यासाची सुरुवात पूर्वपरीक्षेच्या एक वर्ष आधी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमापासून करावी लागते. कारण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्वपरीक्षेच्या पाचपट तरी अधिक आहे. त्यात वैविध्यही बरेच असते. UPSC मध्ये तर मुख्य परीक्षा वर्णनात्मक (descriptive) म्हणजे उत्तरे लिहावी लागण्याच्या स्वरूपाची आहे. त्यामुळे समजा पुढील वर्षी म्हणजे ऑगस्ट २०१६मध्ये पूर्वपरीक्षा असेल तर जून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ मुख्य परीक्षेचा अभ्यास केलेला चांगला.

फक्त पूर्वपरीक्षाचा अभ्यास केला तर फारतर पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होता येईल. पण पूर्वपरीक्षा ते मुख्य परीक्षा यात फक्त तीन महिन्यांच्या कालावधी असतो. तितक्या वेळात मुख्य परीक्षेचे शिवधनुष्य पेलणे शक्य नाही. शिवाय मुख्य परीक्षेत पूर्वपरीक्षेतील घटकच विस्तृत स्वरूपात असतात, त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास सखोल केला तर पूर्वपरीक्षा जड जाणार नाही. पूर्वपरीक्षेच्या एक वर्ष आधीच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करून तो नऊ महिन्यात पूर्णत्वाला न्यायचा. पूर्वपरीक्षेनंतर नवीन अभ्यासाची वेळ यायला नको. तो वेळ उजळणी, प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव व एखादा अभ्यासघटक कच्चा राहिला असल्यास त्यावर मेहनत घेणे यावर सत्कारणी लावायचा.

आपण MPSC व UPSC यांच्या मुख्य परीक्षेची वेगवेगळी चर्चा करू म्हणजे स्पष्टता येईल. MPSC क्लास वन परीक्षेत पूर्व व मुख्य या दोन्ही परीक्षा पर्यायी प्रश्न स्वरूपाच्या असतात. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असे असते.

मुख्य परीक्षेचा आराखडा

राज्यसेवा मुख्य परीक्षेत पुढीलप्रमाणे विषय असतात.

१) अनिवार्य इंग्रजी (१०० गुणांसाठी)

२) अनिवार्य मराठी (१०० गुणांसाठी)

३ सामान्य अध्ययन पेपर - १ (इतिहास (६० गुण), भूगोल (६० गुण), कृषी (३० गुण) एकूण १५० गुण

४) सामान्य अध्ययन पेपर - २ (राज्यघटना व राजकीय पद्धती, कायदा) एकूण १५० गुण

५) सामान्य अध्ययन पेपर - ३ (मानवी संसाधन विकास व मानवी हक्क) एकूण १५० गुण

६) सामान्य अध्ययन पेपर - ४ (अर्थव्यवस्था (७५ गुण), विज्ञान व तंत्रज्ञान (७५ गुण) एकूण १५० गुण

अशाप्रकारे एकूण ८०० गुणांची मुख्य परीक्षा असते. मुलाखत १०० गुणांची असते व त्यांची बेरीज करून अंतिम यादी लागते. साधारण: ५०% आसपास गुण मिळाले तर पदप्राप्ती होते.

मुख्य परीक्षेच्या घटक व उपघटकाचा नीट अभ्यास केला तर तो राज्यसेवा पूर्व-मुख्य साठी, UPSC पूर्व व मुख्य साठी आणि PSI/STI/ASST च्या पूर्व-मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त ठरतो. म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सर्वांगीण तयारीमध्ये MPSCच्या सर्वच परीक्षांची तयारी होते. सुरुवात करताना शाळेतील क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केलेला चांगला. ५ ते १२वी इयत्तेची राज्य शासनाची भूगोल, इतिहास, विज्ञान, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र यांची पुस्तके अभ्यासावी.

NCERTची ८ वी ते १० वी इयत्तेची पुस्तके अभ्यासली तर उत्तम होईल. यानंतर प्रत्येक विषयाची दर्जेदार लेखक, प्रकाशनाची किमान दोन पुस्तके वाचणे आवश्यक आहे. या विषयांना पूरक म्हणून लोकराज्य, योजना, कुरूक्षेत्र, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व अर्थसंकल्प अशी शासनाची मासिके संदर्भासाठी वापरणे गरजेचे आहे.

प्रस्तावित बदल

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील संभावित बदल २०१६च्या परीक्षेपासून केला जाणे अपेक्षित आहे. मराठी व इंग्रजी अनिवार्य पेपर मध्ये परिवर्तन होणे अपेक्षित आहे. सध्याच्या मुख्य परीक्षेत हे दोनच पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे आहेत. त्यात निबंध, उताऱ्याचा सारांश, पत्रलेखन अशा प्रकारचे भाषिक कौशल्य तपासले जाते. पण, त्यातही काही विद्यार्थांची तक्रार असते की पेपर तपासणी आणि गुण वाटपात फरक पडतो. हे पेपर UPSCच्या मुख्य परीक्षेत फक्त पात्रतेसाठी असतात (qualifying). मग MPSCत ते अंतिम गुणांमध्ये का धरले जातात? अशीही काहींची तक्रार असते. आयोगाला या पेपर्सची तपासणी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयास करावे लागतात. या सगळ्या अडचणींना फाटा देत आयोगाने पुढच्यावर्षी पासून मराठी व इंग्रजी हे अनिवार्य विषयही पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाचे करण्याचे घोषित केले आहे. त्यात फक्त ४०% गुण पात्रतेसाठी मिळवणे आवश्यक असेल.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- मुख्य परीक्षेचे अंतरंग.

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

पूर्वपरीक्षेची अपूर्वाई .....( लेख क्र .१० )

पूर्वपरीक्षेची अपूर्वाई
स्पर्धा परीक्षांमधील तीन टप्पे म्हणजे 'पूर्व, मुख्य आणि मुलाखत'. यात सर्वात निसरडा टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षा. मुख्य परीक्षा व मुलाखतीचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो व तेथे मेहनतीच्या प्रमाणात थेट यश मिळते. पूर्वपरीक्षेचे तसे नाही. त्यामुळे मी उमेदवारांना नेहमी सांगतो की ज्यावर्षी पूर्वपरीक्षा पार होईल, त्यावर्षी मुख्य व मुलाखत जिंकून किल्ला सर करून टाका!
...

होमवर्क

पूर्वपरीक्षेची तयारी परीक्षेच्या किमान पाच महिने आधी सुरू केली पाहिजे. काहीजण म्हणतात की आयोगाने परीक्षेची जाहिरात प्रकाशित केली की आपण तयारीला लागू. पण, जाहिरात ते पूर्वपरीक्षा हा कालावधी आता फारतर तीन महिने असतो आणि तो तयारीला पुरेसा नसतो. जाहिरात तर येणारच असते. किंबहुना त्याचे वेळापत्रक आयोग वर्षाच्या सुरुवातीला घोषित करतो. मग थांबायचे कशासाठी?

कोणी नोकरी करून परीक्षा देत असेल तर त्यांनी शेवटचे काही दिवस तरी सुट्टी मिळेल याची काळजी आधीच घ्यावी. पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्यांनी किमान आठ ते दहा तास अभ्यास करावा व परीक्षा जवळ आल्यावर तो बारा ते चौदा तासांवर नेऊन ठेवावा किंवा तसा तो आपोआपच जाईल.

चालू घडामोडींचा सामना

स्पर्धापरीक्षांमध्ये चालू घडामोडींवर आधारित प्रश्न भरपूर असतात. या घडामोडी सारख्या बदलतात व त्या लक्षात ठेवायला कठीण वाटतात. शिवाय पूर्व, मुख्य व मुलाखती अशा प्रत्येक टप्प्याच्या वेळी चालू घडामोडींचा नव्याने अभ्यास करावा लागतो. त्यामुळे एरवी रोजच्या पेपरमधून घडामोडींच्या संपर्कात राहा आणि नोंदी बाजूला काढून ठेवा. शेवटच्या महिन्यात चालू घडामोडींना जास्त महत्त्व द्या. विशेषतः शेवटचे दहा दिवस. कारण चालू घडामोडी अल्पकालिन स्मरणशक्तीत ठेवलेल्या चांगल्या. काही गोष्टी तर इतक्या तथात्मक असतात जसे फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेते व उपविजेते की त्या परीक्षेच्या दिवसापर्यंत आठवल्या तरी खूप झाले. नंतर नाही लक्षात राहिल्या तरी फरक पडत नाही.

सरावाचे महत्त्व


पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी प्रश्न सोडवायची तयारी भरपूर करावी लागते. कारण आपण अभ्यास करतो तसेच्या तसे प्रश्न परीक्षेत येत नाहीत; तर, थोडे फिरवून येतात. अशावेळी गोंधळायला होते व उत्तर येत असतानाही चुका होतात. थोडक्यात पर्यायी प्रश्न सोडवणे हा एक कौशल्याचा भाग आहे व ते कौशल्य सरावाने साध्य करता येते. आपण सायकल चालवायला शिकतो त्यासारखेच हे एक आहे. यासाठी बाजारामध्ये विविध प्रकाशनांच्या क्वेश्चन बँक मिळतात. त्यातही सरावासाठी भरपूर प्रश्न मिळतात. त्यापैकी किती प्रश्न सोडवायचे? त्यावर 'जास्तीत जास्त' हे उत्तर. मी 'पूर्वपरीक्षेच्या आधी ५० ते ६० हजार प्रश्न सोडवीन', असे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवायला काहीच हरकत नाही. आकडा जास्त वाटला तरी एकदा हात बसला तर प्रश्न भराभर सुटू लागतात. कुठले ग्रह सुलटे फिरतात व कुठले ग्रह उलटे हे एक-दोनदा चुकले की पुढच्यावेळी आपोआप लक्षात राहते. शेवटचा महिना तर नवीन अभ्यास थांबवून अशा प्रकारचे प्रश्नसंच सोडवण्यावरच भर द्यायचा. त्यातूनही खूप नवीन माहिती मिळते व ज्ञानप्राप्ती होते.



- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- मुख्य परीक्षेची तयारी

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

पूर्वपरीक्षेची २०-२० मॅच.....( लेख क्र . ८)

पूर्वपरीक्षेची २०-२० मॅच
काल आपण पूर्वपरीक्षा देताना घ्यायची काळजी बघत होतो. ही पर्यायी प्रश्नांची परीक्षा असल्याने टिच्चून खेळ करावा लागतो.

प्रश्नांचा चक्रव्यूह

प्रश्न सोडवताना नकारात्मक गुणांचा सामना करून हा चक्रव्यूह कसा भेदायचा ते आज बघू. सामान्य अध्ययनात १०० प्रश्न असतात, त्यांचे हातात पेपर मिळाल्यामिळाल्या अ, ब, क, ड अशा चार गटात ढोबळ मानाने विभाजन करता येईल. 'अ' म्हणजे असे प्रश्न ज्यांची उत्तरे तुम्हाला हमखास माहिती आहेत. ते प्रश्न आधी सोडवायचे व स्कोअर बघायचा, ही तुमची बेसलाइन. ही जितकी वरची असेल तितके तुम्ही सेफ. समजा पहिल्याच फटक्यात ६५ प्रश्न अचूक जमताहेत तर प्रश्नच संपला, पुढे बघूच नका. पेपर देऊन टाका आणि घरी या. पण वास्तवात असे काही होत नाही. 'अ' ४० च्या आसपास अडकतो. मग आता 'ब'कडे वळायचे. असे प्रश्न की ज्यात आपण दोन पैकी एक उत्तर आहे हे माहीत आहे. पण ते कोणते या द्विधा परिस्थितीत आहोत. आता धोका पत्करणे भाग पडते. अशा प्रश्नात धोका ५०:५० असतो. म्हणजे जर आपण शक्यता (Probability) काढली तर दोनपैकी एक बरोबर येऊ शकतो. चुकलेल्या प्रश्नाला नकारात्मक १/३ आहेत. म्हणजेच धोका घ्यायला काही हरकत नाही.

या 'ब' प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एकदा एक उत्तर बरोबर वाटते तर दुसऱ्यांदा दुसरे. त्यामुळे गोंधळ उडतो, जितके जास्त विचार तितका गोंधळ वाढत जातो. अशावेळी एक 'अंदरकी बात'म्हणजे प्रश्न बघितल्यावर तुम्हाला जे उत्तर वाटले ते लगेच नोंदवून ठेवले पाहिजे व बऱ्याचदा तेच उत्तर असते. कारण शेवटी 'आतला आवाज' नावाची काही गोष्ट असते. आता पुन्हा स्कोअर बघायचा. समजा तुम्ही 'अ' मधूनच ४० प्रश्न सोडवले आहेत आणि ५५ ला कटऑफ लागेल असा तुमचा अंदाज आहे. म्हणजे तुम्हाला अजुन १५ प्रश्न बरोबर सोडवले पाहिजेत. याचाच अर्थ 'ब' या प्रकारचे ३० प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार. कारण बरोबर येण्याची शक्यता ५०:५० आहे. हे 'ब' प्रकारचे प्रश्नच यश अपयशामध्ये निर्णायक भूमिका निभावतात. ते सोडवताना आपले एकूण विषयाचे आकलन, अनुभव व अंदाज बांधण्याची शक्ती पणाला लागते.

लेट्स प्ले ऑन

'ब' प्रकारचे प्रश्नही सोडवून झाल्यावर जर स्कोअर पुरेसा येत नसेल तर मग आता 'क' व 'ड' कडे भाग आहे. एरवी जर 'ब' नेच काम झाले तर पेपर देऊन बाहेर पडायचे.

'क' प्रकारचे प्रश्न असे म्हणूयात की यात चार पर्यायांपैकी एक पर्याय असू शकत नाही, हे तुम्हाला नक्की माहिती आहे. पण इतर तीन पर्यायांत उत्तर कोणते आहे हे तुम्हाला माहीत नाही. इथे आता उत्तर बरोबर येण्याची शक्यता (Probability) आणखी मंदावते. १/३ फक्त असते. म्हणजे तीन मधील एक बरोबर येणार दोन चुकणार. नकारात्मक गुणाचा नियम तीन चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे गुण कापले जाणार असा आहे. असे असेल तर धोका पत्करायला हरकत नाही असा अर्थ होतो. म्हणजे तीन प्रश्न बरोबर हवे असतील तर नऊ प्रश्न सोडवणे भाग आहे. शक्यतो 'क' पर्यंत येण्याची वेळ न येवो.

'ड' तर असे प्रश्न आहेत की जे बघून आपल्याला आपण दुसऱ्याच कोणत्या तरी परिक्षेच्या हॉलमध्ये येऊन बसलो आहोत असे वाटेल. त्यांच्याकडे बघून काहीच क्लिक होत नाही. अशा बॉलवर जर खेळायला गेलात तर आऊट व्हायची शक्यता खूप असते. प्रत्येक परीक्षेत अशा प्रकारचे काही प्रश्न (१०० पैकी १५ तरी) असतातच असतात. अशा प्रश्नांना हात लावायचा नाही. अशा बाऊन्सरना आदर दाखवून सोडून द्यायचे. पण जर स्कोअर फारच कमी येत असेल तर मात्र निकराची लढाई करत त्यांचाही सामना करायचाच.

सारांश

आता कोणी म्हणेल की पूर्वपरीक्षेसारख्या दोन तासांच्या परीक्षेत एवढे वर्गीकरण करणे त्यानुसार मोजमाप करून प्रश्न सोडवणे शक्य आहे का? तेवढा वेळ तरी असतो का? उत्तर असे आहे की, हे सवयीने जमते. हे सर्व केले नाही तर जुगार खेळणे व पूर्व परीक्षेतील प्रश्न सोडवत जाणे यात फारसा फरक उरणार नाही. त्यामुळे जर आपण पुरेशा सराव चाचण्या दिल्या असतील, व त्यावेळी हे तंत्र घोटवले असेल तर प्रत्यक्ष परीक्षेत ते तितकेसे कठीण जात नाही.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- पूर्वपरीक्षेची तयारी.

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

स्पर्धेची चौकट .....( लेख क्र . ७ )

स्पर्धेची चौकट
'स्पर्धेची चौकट' असे शीर्षक असले तरी प्रत्यक्षात स्पर्धापरीक्षांमध्ये तीन कोनांचा त्रिकोण असतो. तो म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत. आपण यूपीएससीची परीक्षा उदाहरण म्हणून घेऊ.

सर्वप्रथम पूर्वपरीक्षा असते. एकेकाळी तिच्याऐवजी थेट मुख्य परीक्षा असे. पण परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढू लागली व इतक्या सर्वांची परीक्षा घेणे अवघड जाऊ लागले. तेव्हा चाळणी लावून जे उमेदवार खरोखरच गंभीर आहेत त्यांची मुख्य परीक्षा घेणे योग्य असे वाटू लागले. ती चाळणी म्हणजे पूर्वपरीक्षा. ही फक्त चाळणी असल्याने ‌तिचे गुण मुख्य परीक्षेत धरत नाहीत. ही परीक्षा एका दिवसात संपते व ती पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाची असते. प्रत्येक प्रश्नाला उत्तरांचे चार पर्याय असतात.

यूपीएससीची पूर्वपरीक्षा - नागरी सेवा व भारतीय वन सेवा यांच्यासाठी ही परीक्षा समान असते. पूर्वपरीक्षेत मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संक्षिप्त स्वरूपात असतो. उदा. भारताचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी. या सर्वांना आपण सामान्य अध्ययन असे म्हणू. या सामान्य अध्यनाबरोबच सीसॅट नावाचा एक पेपर असतो. त्यात एम.बी.ए. सीईटी किंवा कॅट परीक्षांमध्ये असतात तसे प्रश्न असतात. जसे अंकगणित, उताऱ्यावरचे प्रश्न, माहितीचे विश्लेषण, निर्णय प्रक्रियेतील पर्याय इत्यादी. यूपीएससी परीक्षेत फक्त सामान्य अध्ययनाचे गुण निकालासाठी ग्राह्य धरतात व सीसॅटचे किमान गुण मिळवले तरी चालतात. (३३ टक्के) म्हणजेच सीसॅट पास व्हायचे असते. पण, सीसॅटचा पेपर पहिल्यांदा तपासतात व त्यात आवश्यक तेवढे गुण मिळाले तरच सामान्य अध्ययनचा पेपर तपासला जातो.

एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत अजून तरी सीसॅटचा पेपर फक्त किमान गुणांसाठी आहे. कारण, एमपीएससी आपल्या परीक्षांची चौकट यूपीएससीच्या धर्तीवर ठेवायचा प्रयत्न करते. ज्यामुळे उमेदवारांना एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणे सोपे जाते. राज्य सरकारलाही प्रशासक निवडताना पुरेशी निवडसंधी मिळते. उत्तर प्रदेश, बिहारमधील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संघ लोकसेवा आयोगाशी तंतोतंत जुळणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांचे उमेदवार दोन्हीकडे बसतात (संघ परीक्षा व राज्य परीक्षा) आणि कुठले ना कुठले पद मिळवतात.

अशा प्रकारे पूर्वपरीक्षेत दोन पेपर असतात. सामान्य अध्ययनयाला १०० प्रश्न असतात तर सीसॅटमध्ये ८०. दोन्ही प्रत्येकी २०० गुणांचे असतात. त्यापैकी सीसॅटमध्ये ६६ गुण मिळाले की काम झाले. खरी स्पर्धा ही सामान्य अध्ययनात होते. तिथे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात. २००पैकी साधारणत: १२० गुण तरी मिळणे आवश्यक असते.

स्पर्धापरीक्षांच्या पूर्वपरीक्षेत नकारात्मक गुण नावाचा एक प्रकार असतो. एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर १/३ गुण कापले जातात. उदा. एखाद्याने ८० प्रश्न सोडवले. त्यातील २० प्रश्न बरोबर आले व ६० प्रश्न चुकले तर गुण ०. कारण, हे चुकलेले ६० प्रश्न २० बरोबर प्रश्नांची पुण्याई खाऊन जातात. पूर्वी काही टाइमपास म्हणून परीक्षा देणारे उमेदवार रामभरोसे सर्व उत्तरपत्रिका काळी करून ठेवत आणि कधीकधी त्या पद्धतीने त्यांचा अंदाज अचूक बसून तेही पास होऊन जात. त्यामुळे अभ्यासू मुलांवर अन्याय होत असे. त्याशिवाय आयोगाला निवडीसाठी चांगल्या उमेदवारांचा कमी चॉईस मिळत असे. म्हणून नकारात्मक गुण आणले गेले. त्यामुळे आता 'ठोकून देता ऐसा की जे' अशा प्रकारचा दबंगपणा महागात पडतो. कमीत कमी प्रश्न चुकवून, जास्तीत जास्त प्रश्न बरोबर सोडवायची तारेवरची कसरत करावी लागते.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- पूर्वपरीक्षेची २०-२० मॅच