स्पर्धा परीक्षा आणि माध्यमाची निवड...(लेख क्र . २९)
एमपीएससी
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हा प्रश्न पडत नाही; कारण ही पूर्ण पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाची परीक्षा आहे. पूर्व व मुख्य असे दोन्ही टप्पे फक्त पर्यायी आहेत. मराठी व इंग्रजी भाषेत पेपर असतो व योग्य उत्तरावर काळे करायचे असते. त्यामुळे मराठी किंवा इंग्रजीत अभ्यास करूनही चालते. मुलाखत तोंडी असते. थोडक्यात राज्यसेवा परीक्षेत हा प्रश्न गंभीर रहात नाही. अर्थात तिथेही परीक्षेचा अभ्यास मराठीत करायचा की इंग्रजीत हा प्रश्न आहेच. राज्यसेवेच्या स्पर्धा परीक्षेचे चांगले अभ्याससाहित्य मराठीतून आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडीसुद्धा मराठी वृत्तपत्रे व मासिकातून चांगल्याप्रकारे समजतात. त्यामुळे राज्यसेवा स्पर्धा परीक्षा इंग्रजीतून देणाऱ्यांना राज्य शासनाची इंग्रजी माध्यमाची शालेय पुस्तके व काही मूठभर इंग्रजीतील पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. ते पुरेसे नसते. या सर्वामुळे राज्यसेवेचा संपूर्ण अभ्यास इंग्रजीतून करणे जवळजवळ अशक्य आहे. मराठीतून वाचावेच लागते.
यूपीएससीतील पेच
खरी बिकट वाट केंद्र लोकसेवा आयोगाची आहे. मुख्य परीक्षा लेखी असते. वरील समस्या येथे अगदी उलट आहे. यूपीएससीचे चांगले अभ्याससाहित्य इंग्रजी किंवा हिंदीत उपलब्ध आहे; मात्र तितक्या प्रमाणात ते मराठीत अद्याप उपलब्ध नाही. त्याचवेळी मराठीतून शिक्षण घेतलेले उमेदवार बहुतेककरून ही परीक्षा मराठीतून देण्यास इच्छुक असतात. पण, त्यांना पुरेसे अभ्याससाहित्य वेळेवर उपलब्ध झाले नाही तर त्यांची बरीचशी ऊर्जा ते जमवण्यातच खर्च होते. सुदैवाने आता राज्यसेवेसाठी विपुल व दर्जेदार अभ्याससाहित्य उपलब्ध होऊ लागले आहे. त्याचा वापर यूपीएससीचे विद्यार्थी करू शकतात; कारण बहुतेक अभ्यासक्रम सारखाच आहे. मराठी माध्यम घेणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवारांमध्ये जास्त आहे. साक्षरता वाढू लागली आहे व महत्त्वाकांक्षाही. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी मोठ्या संख्येने ही परीक्षा मराठीतून देतात.
भाषिक त्रिशंकू
महाराष्ट्र राज्यात आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्याचा फायदा म्हणजे आपले विद्यार्थी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषा जाणतात. तोटा म्हणजे यातील कोणत्याच भाषेवर त्यांची म्हणावी तशी पकड निर्माण होत नाही. Jack of all and master of none अशी ही स्थिती होते. परिणामी माध्यम निवडीचा प्रसंग हा 'पेचप्रसंग' बनतो. मराठीत लिहावे म्हटले तर मध्येच इंग्रजी शब्द अवतरतात व पूर्ण इंग्रजी लिहायचे म्हटले तर विचारप्रक्रिया मराठीतून चालू असल्यामुळे अचूक इंग्रजी शब्द व चपखल वाक्यप्रयोग साधता येत नाहीत. इंग्रजीत वाचून मराठीत लिहायचे म्हटले तर इंग्रजीतील कर्ता, कर्म, क्रियापदे मराठीपेक्षा वेगळ्या पद्धतीने चालतात व त्यामुळे मराठीतील वाक्यरचना इंग्रजीसारखी होऊ लागते. हिंदीत अभ्यास करणे हा एक मार्ग आहे व अनेक उमेदवार तो पत्करतातही. हिंदीत इंग्रजीच्या तोडीस तोड अभ्याससाहित्य उपलब्ध आहे. पण, इथेही एक पेच म्हणजे आपले हिंदी म्हणजे बॉलिवूड धाटणीचे. त्या धेडगुजरी हिंदीच्या बळावर शुद्ध हिंदी समजणे अवघड जाते व त्यापेक्षा इंग्रजीत वाचलेले बरे असे वाटू लागते.
भाषिक भुलभुलय्या
यूपीएससीसारख्या देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षेत अभिव्यक्ती ही वेगाने, अचूक व मोजक्या शब्दात करावी लागते. आय.ए.एस बनण्याची पुरेपूर क्षमता असूनही निव्वळ ही बाब न जमल्यामुळे मागे पडलेले अनेक उमेदवार माझ्या डोळ्यासमोर आहेत. अशाप्रकारे उत्तर किंवा दक्षिणेपेक्षा हा माध्यमाचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाचा आहे. उत्तर व दक्षिणेत राज्यांनी द्विभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यामुळे हा प्रश्न त्यांना तितकासा भेडसावत नाही. पण, त्यांच्याशी स्पर्धा असलेली मराठी मुले भाषिक समस्येची योग्य उकल न झाल्याने मागे पडतात.
काही समज, काही गैरसमज
काही उमेदवारांना उगाचच असे वाटत राहते की प्रादेशिक माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांना आयोग दुय्यम वागणूक देतो, गुण देताना हात आखडतो घेतो. पण, तसा काही अनुभव नाही. काहींना वाटते की इंग्रजी माध्यम घेऊ म्हणजे त्यानिमित्तने इंग्रजी सुधारेल. असा विचार करणे असंबंद्ध आहे. आपल्याला पद मिळवायचे आहे की इंग्रजी सुधारायचे आहे? इंग्रजी एरवीही सुधारता येईल. परीक्षेच्या प्रश्नांशी हा मुद्दा जोडून गुंतागुंत करायची गरज नाही. उलट काहींना असे वाटते की मराठीतून परीक्षा देऊ. कारण पेपर शेवटी तपासणीला राज्यातच येणार, आपला मराठीच माणूस पेपर तपासणार, तो नक्कीच भरभरून गुण वाटेल. शिवाय 'स्पर्धा'ही कमीच असेल. पण, असा विचार फार वरवरचा आहे. एकतर असा काही अनुभव नाही. आयोग किती गुण दिले पाहिजे याची काही अंतर्गत प्रमाणके निश्चित करतो, शिवाय गुणनियंत्रक असतोच. त्यामुळे असे काही होऊ शकत नाही. काही उमेदवार या प्रश्नाकडे 'नशिबाचा खेळ' असे बघतात. मागच्या दोन मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिल्या यावेळी मराठीतून देऊन बघू, असे ठरवतात. या प्रकारच्या माध्यम परिवर्तनाला कोणताही तार्किक आधार नाही. काही उमेदवारांनी असा पक्का समज करून घेतला असतो की मराठी माध्यमातून पद मिळते हे मान्य; पण फार वरचे पद मिळत नाही. पुन्हा हाही गैरसमजच आहे. दोन वर्षापूर्वीच प्रतीक ठुबे या विद्यार्थ्याने मराठीतून परीक्षा देऊन आय.पी.एस हे पद काढले आहे. सध्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग घोले यांनीही संपूर्ण परीक्षा मराठीतून देऊनच आय.ए.एस. मिळवले आहे. या पेचावर तोड म्हणून काही उमेदवार तर हिंदी माध्यम निवडतात. हे तर रोगापेक्षा उपाय भयंकर असे झाले. कारण, उत्तरेतल्या मुलांची हिंदी मातृभाषा असते व त्यात ते अगदी सहज अभिव्यक्त होतात. त्यांच्याशी त्यांच्या मैदानात स्पर्धा करणे आत्मघातकी ठरू शकते. मग करायचे तरी काय? हा दुस्तर घाट कसा पार करायचा ते उद्या बघू. निदान तर झाले आता उपचारांची चर्चा करू.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
मिनी परेडच्या शेवटाकडे...(लेख क्र . २८)
मानसशास्त्र
यावर्षीच्या निकालात पहिल्या शंभरापैकी एकाचा मानसशास्त्र हा वैकल्पिक विषय होता. मानसशास्त्र हा विषय आपले आयुष्य व्यापणारा आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माणसाची मानसिकता कशी बदलत जाते हे येथे अभ्यासता येते. हॅलोसिनेशन होते म्हणजे काय होते, केमिकल लोचा कसा होतो हे मानसशास्त्र पद्धतशीरपणे उलगडून दाखवते; हा मानव्यविद्याशाखेतील वैद्यकीय विषय आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याचा वेगाने विकास होत आहे. अभ्यासक्रम खूप मोठा वा छोटा नाही. एकदा विषयाचे सूत्र समजले की अभ्यासाला गती येते.
नेहमीप्रमाणे पहिला पेपर हा सिद्धांत्त व सज्ञांचा व दुसरा पेपर हा उपयोजन अशीच विभागणी आहे. पहिल्या पेपरचा अभ्यास करून पाया पक्का झाला की दुसरा पेपर कमी वेळात संपवता येतो. उत्तरे वरवरची न वाटता, वैज्ञानिक पद्धतीने व त्या प्रकारच्या भाषेत मांडावी लागतात, माणसाची मानसिक घडण जैविक आहे की सामाजिक यासारखे महत्त्वाचे वाद व त्यातील प्रतिवाद जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. ज्या थोड्या वैकल्पिक विषयांमध्ये 'स्वतःच्या भाषेत' उत्तर लिहिण्याला आयोग महत्त्व देतो त्यापैकी एक मानसशास्त्र आहे. उत्तरे देताना बातम्या, चित्रपट यातील उदाहरणे नावीन्यपूर्ण पद्धतीने जोडून घेता येतात. हा विषय मेडिकलचे पदवीधर आवडीने घेतात. इतरांनीही काही प्रमाणात हा विषय घेऊन यश प्राप्त केले आहे.
तत्त्वज्ञान
मानव्यविदयाशाखेतील एक लोकप्रिय व भरभरून गुण देणारा विषय म्हणजे तत्त्वज्ञान. यावर्षीच्या यादीत अंतिम शंभर जणांपैकी पाच जणांचा हा वैकल्पिक विषय होता. भारतीय संस्कृती व विचारांचा मोठा भाग तत्त्वज्ञानाने व्यापला आहे. पाश्चात्यांनी प्राचीन युगात मोठे मंथन केले उदा. 'प्लेटो आणि अॅरिस्टॅाटल, किंवा आधुनिक युगात हेगेल, मुरे, रसेल यांनी चर्चा पुढे नेली. हा सर्व अभ्यास पेपर एक मध्ये आहे. पेपर दोन मध्ये सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान उदा. मार्क्सवाद, मानवतावाद तसेच धार्मिक तत्त्वज्ञान उदा. धर्म आणि नैतिकता, धार्मिक अनेकतावाद यांचा अभ्यास करायचा आहे.
अभ्यासक्रम तुलनेने छोटा आहे. विचारांच्या विस्तारापेक्षा खोलीला महत्त्व या विषयात जास्त आहे. त्यामुळे 'चिंतन' असेल तर विषय हाताळणे सोपे जाते. हा विषय पूर्णपणे मराठीतही तयार करता येतो हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. हा विषय एकीकडे अभ्यासक्रम व रेडीमेड विचार देतोच पण त्याचवेळी उमेदवारांना स्वतःची अशी विचारपद्धती विकसित करून मांडण्याची संधीही देतो. स्वतःचे मत मांडणे इथे निर्णायक ठरते.
हा विषय लोकप्रिय असला तरी मार्गदर्शन उपलब्ध नसताना तो घेणे अडचणीचे ठरू शकते. सगळ्याच क्लिष्ट संकल्पना वाचून कळत नाहीत. अशा वेळी जर मार्गदर्शन असेल तर अमूर्त संकल्पनाही लवकर स्पष्ट होतात. हा विषय बाहेरून
आकर्षक वाटला तरी तत्त्वज्ञानाच्या खोल विवरात उतरणे कधीकधी कंटाळवाणे ठरू शकते. त्यामुळे खरोखरच तत्त्वज्ञानाची आवड असेल तर घेतलेला बरा.
उरलसुरलं
आतापर्यंत आपण काही लोकप्रिय पर्याय बघितले. त्यापलीकडेही काही वैकल्पिक विषय आहेत. उदा. कॉमर्स. कॉमर्समध्ये पहिला पेपर हा सैद्धांतिक आहे तर दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल आहे. हा विषयही चांगले यश देतो. जसे आपल्याकडे संपदा मेहताचे उदाहरण आहे. पण नुसत्या बी.कॉमच्या शिदोरीवर हा विषय घेणे अडचणीचे ठरू शकते कारण बहुसंख्य स्पर्धक हे चार्टड अकाऊटंट असतात. मेडिकल सायन्स हाही एक यशदायी वैकल्पिक विषय आहे. या वर्षीच्या निकालात महाराष्ट्रातून तारूल भावसार हिने हा विषय घेऊन यश मिळवले आहे. विशेष म्हणजे ती होमिओपॅथीची पदवीधर असूनही तिने हा विषय घेऊन यश मिळवले आहे. आपल्याकडे श्रीकर परदेशी यांचे उदाहरण तर आहेच. त्यांचाही मेडिकल सायन्स हा वैकल्पिक विषय होता.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित असे शुद्ध विज्ञानाचे विषय घेऊनही यश मिळवणारे उमेदवारही आहेत. गणित विषय घेऊन तर पहिल्या शंभरात चौघांनी बाजी मारली आहे. हे विषय एकतर खूप गुण देतात नाहीतर कधीकधी एकदम बेरीज खाली आणतात. पाली साहित्य हाही एक लोकप्रिय विषय होता. पण मागे झालेल्या बदलांमध्ये आयोगाने तो कुठलेही कारण न देता काढून टाकला आहे.
'वैकल्पिक'चे महत्त्व अबाधित
जेव्हा दोनऐवजी एकच वैकल्पिक विषय ठेवला व त्याचवेळी सामान्य अध्ययनाचे टॉपिक व गुण वाढवले तेव्हा असे वाटले होते की वैकल्पिक विषयाचे महत्त्व आता कमी होईल. पण तसे झालेले नाही. सामान्य अध्ययनात सर्वांना जवळपास सारखेच गुण पडत आहेत. अशावेळी वैकल्पिक विषयांचे गुण निर्णायक भूमिका निभावताना दिसतात. अनेकांना सरासरी ५०० पैकी २०० गुण आहेत तर काहींनी वैकल्पिक विषयात ३५०पर्यंत स्कोअर नेला आहे. दीडशे मार्कांचा फरक निर्णायक ठरतो. तेव्हा वैकल्पिक विषयांचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे या निष्कर्षाला यावे लागते.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
नवा इतिहास पुन्हा घडवू...(लेख क्र . २७)
इतिहास
यावर्षीच्या अंतिम यादीत इतिहास विषय घेऊन पहिल्या शंभरात दोन विद्यार्थी आले आहेत. महाराष्ट्राचे व या विषयाचे विशेष नाते आहे. आपल्याकडे बहुसंख्य विद्यार्थी इतिहास विषय घेऊन यशस्वी झाले आहेत. याही वर्षी श्रीकांत येईलवाड, श्रीकांत सुसे यांचा इतिहास वैकल्पिक विषय होता. मराठी मुलांचा हा आवडता विषय असल्याचे कारण असे आहे की, आपल्याकडील विद्यार्थ्यांना या विषयाची आधीपासूनच गोडी असते व थोडे फार वाचन असते. इतिहास विषयाचे अभ्याससाहित्य पूर्णपणे मराठीतूनही उपलब्ध आहे, हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवाय कोणत्याही पदवीधराला हा विषय घेता येतो. आता काही जास्तीची कारणे जमा झाली आहे. सामान्य अध्ययनात आता प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक व जगाचा इतिहासाचा समावेश आहे. हे सर्व वैकल्पिक इतिहास विषयाचे समान विभागणीचे (१२५गुण प्रत्येकी) घटक आहेत. त्याशिवाय आता पूर्व व मुख्य परीक्षेत भारतीय संस्कृती या घटकाचे महत्त्व वाढते आहे. इतिहास वैकल्पिक विषय असल्यावर संस्कृतीचे प्रश्न कठीण वाटत नाहीत.
अभ्यासाची गुरूकिल्लीशाळेमध्ये अनेकांनी सनावळ्या, राजांची नावे यामुळे इतिहास विषयाचा धसका घेतला असतो. पण तो इतिहास वेगळा व यूपीएससीमधील इतिहास वेगळा. यूपीएससीतील इतिहास हा विश्लेषणात्मक आहे. एखादा काळ व त्याचे रहस्य जाणून घेणे म्हणजे इतिहास. तेही फक्त राजकीय अंगाने नव्हे तर सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच बाजूने. इतिहासाच्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक भाग नाही. दोन्ही पेपर उपयोजित स्वरूपाचे आहेत. पेपर एक मध्ये प्राचीन व मध्ययुगीन इतिहास आहे तर पेपर दोनमध्ये आधुनिक व जगाचा इतिहास आहे. अशाप्रकारे अश्मयुग ते आतापर्यंत अशी टाइममशीनमध्ये फिरावे तशी सहल आहे. एकून ५०हून जास्त टॉपिक आहेत. त्यामुळे विषयाचा विस्तार बघूनच अनेकांचे डोळे दिपतात. पण अभ्यासक्रमाचे काळजीपूर्वक वाचन केले व पद्धतशीर अभ्यास केला तर विषय आवाक्यात येतो. अभ्यासक्रमावर पकड ही यशाची गुरूकिल्ली आहे.
दुसरीकडे निव्वळ अनेक जण घेतात म्हणून इतिहास घेतला व त्यात आवडच निर्माण झाली नाही तर विषय नीरस, बेचव वाटू शकतो. दुसऱ्या टोकाला अशीही उदाहरणे आहे की अतिच आवड तयार होऊन काहीजण ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायला लागतात. ते अनावश्यक आहे. त्यामुळे आपल्याला नक्की काय व किती अभ्यासायचे आहे, याबाबत स्पष्टता असली पाहिजे. नाहीतर इतिहासात चकवा लागून आपणच इतिहासजमा होऊ शकतो.
कायदायंदाच्या अंतिम यादीत पहिल्या शंभरापैकी पाच यशस्वी उमेदवारांचा वैकल्पिक विषय कायदा (विधी) हा होता. हा विषय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आदर्श व त्यावर आधारलेली भारतीय राज्यघटना यांचे मूर्तरूप आहे. हा विषय सर्वच घेऊ शकतात हे खरे असले तरी 'विधी' शाखेच्या पदवीधरांसाठी हा होमपीच आहे. या विषयाचा फायदा सामान्य अध्ययनातही होतो. राज्यघटना हा विषय पूर्व व मुख्य परीक्षेत आहे. हा विषय संकल्पनात्मक असल्यामुळे संकल्पना समजून घेण्यावर भर द्यायला हवा. कायद्यात एक शब्द इकडचा तिकडे केल्यास अर्थ बदलतो. त्यामुळे अभ्यासात काटेकोरपणा हवा. अघळपघळपणे लिहिणे चालत नाही. मोजक्या शब्दात अचूक मांडणी करावी लागते.
चालू घडामोडींशी अभ्यासाचा दुवा जोडावा लागतो. सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निकाल, आंतरराष्ट्रीय कायद्यातील बदल यांचाही सम्यक आढावा घ्यावा लागतो. अशा प्रकारे कायदा हा वैकल्पिक विषय सातत्याने चांगले गुण देणारा विषय आहे. ज्यांना 'कायद्याच्या भाषेची' आवड आहे, त्यांनी नक्कीच घ्यायचा विचार करावा.
इंजिनीअरिंगचे विषयया वर्षीच्या अंतिम निकालात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या विषयाचे चार उमेदवार यशस्वी झाले आहेत. या आधीच्या वर्षांमध्ये वरच्या रँकमध्ये इंजिनीअरिंगचे पदवीधर मोठ्या संख्येने असले तरी त्यांचे विषय मानव्य विद्याशाखांमधील असत. पण निदान यावर्षी तरी वेगळा ट्रेंड दिसतो. आयआयटीची मुले मोठ्या प्रमाणात यूपीएससी परीक्षा देऊ लागल्यामुळे असेल पण इंजिनीअरिंग विषयांना सोन्याचे दिवस आले आहेत. हे विषय अर्थात त्या विषयांचे पदवीधरच घेतात. पण या विषयांचे वैशिष्ट्य म्हणजे यूपीएससी अभ्यासक्रम विद्यापीठीय अभ्यासक्रमापेक्षा व्यापक असतो. अभ्यासगट सहसा मिळत नाही. आवड असतेच असे नाही. मुले म्हणतात की आम्ही इंजिनीअरिंगच कसेबसे केले तर कुठे परत ते घेऊ? शिवाय सर्व इंजिनीअरिंगचे विषय उपलब्ध नाहीत उदा. इन्ट्रुमेंटल, इंडस्ट्रियल अभियांत्रिकी विषय यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत नाहीत. पण ज्यांना खरोखर हे विषय आवडतात, त्यांनी घ्यायला हरकत नाही.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
विषयांचे ओळखपत्र...(लेख क्र . २६)
यूपीएससी परीक्षेत देशात दुसऱ्या आलेल्या तरुणीचा मल्याळम साहित्य हा वैकल्पिक विषय होता. मागील वर्षी तर देशातील पहिल्या चौघांपैकी तिघांचा मल्याळम साहित्य हा विषय होता. महाराष्ट्रातून ४२२वी रँक मिळवणारा रहुल कार्डिले याने मराठी साहित्यात ५००पैकी ३५५ गुण मिळवले होते. साहित्य विषय घेऊन असे यश मिळवणाऱ्यांची मोठी परंपरा आहे. भूषण गगराने, अजित जोशी, रवींद्र शितवे, क्षिप्रा आंग्रे, कौस्तुभ दिवेगावकर अशा अनेकांनी हा विषय घेऊन मोठे यश मिळवले आहे. या विषयांमुळे सनदी सेवा आपल्या आवाक्यात आहे, असे ग्रामीण विद्यार्थ्यांना वाटू लागले. हा विषय घेऊन यश मिळवणाऱ्यांमध्ये सर्व प्रकारचे पदवीधर आहेत. मराठी वाङ्मय विषयातून बीए, एमएसाठी अभ्यास करणे आणि त्या अभ्यासाचा उपयोग यूपीएससी परीक्षेसाठी करणे यात गुणात्मक फरक आहे. या विषयाचा आवाका मोठा असतो आणि अभ्यासासाठी वेळ मर्यादित असतो. त्यामुळे स्पर्धात्मक, व्यवसायिक दृष्टिकोन घेऊन अभ्यास करावा लागतो. मराठी वाङ्मय पेपर-१ हा भाषा, व्याकरण, बोली, लोकसाहित्य, समीक्षा, व्यवहार यांचा विचार करतो. हा भाग नेमकी बांधणी, मांडणी, पाठांतराचा वापर करून सादर करता येतो. पेपर-२मध्ये १९ साहित्यकृती अभ्यासाला आहेत. उदा. नारायण थोरवे यांचा 'जाहीरनामा', गौरी देशपांडे यांचे 'एक एक पान गळावया' इत्यादी. यात कथा, कादंबऱ्या, कविता असे विविध वाङ्मय प्रकार हाताळावे लागतात. दोन ते तीन कलाकृतींना जोडून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कोणतीही कलाकृती टाळता येत नाही. मराठी वाङ्मय हा विषय खूप लोकप्रिय असला तरी याचा अर्थ असा नाही की, तो डोळे झाकून सर्वांनी घ्यावा. पहिली अट म्हणजे या विषयाची आवड असावी व थोडे तरी वाचन आधीच केले असेल तर चांगले. दहावीपर्यंत तरी मराठी माध्यमात शिक्षण झालेले असावे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे व ते मिळायलाही हवे. कारण हा विषय एकट्याने अभ्यास करून होईल, असे अजिबात नाही. अभ्यासगट असेल तर चर्चेने विषय लवकर उमगतो. साहित्य विषयामध्ये मुलांमध्ये मोठे चढउतार दिसून येतात. त्यामुळे तीही बाब विषय घेताना ध्यानात ठेवली पाहिजे.
राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंधयंदा १६वी रँक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा विषय राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हा होता. महाराष्ट्रातून या वर्षी पहिल्या आलेल्या अबोली नरवणे हिचाही हाच विषय होता. वैकल्पिक विषयांपैकी एक लोकप्रिय विषय म्हणजे राज्यशास्त्र. हा विषय कोणताही पदवीधर निवडू शकतो. याचा सामान्य अध्यायन, निबंध व मुलाखत अशा सर्व स्तरांवर फायदा होतो. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन्ही ठिकाणी या विषयाद्वारे पाय रोवले आहेत. त्यामुळे सामान्य अधायनाचा पाया पक्का होतो. हा विषय समकालीन (complementary) आहे. तेव्हा वृत्तपत्रे, मासिकांचे वाचन अनिवार्य ठरते. आंतरराष्ट्रीय संबंध तर क्षणाक्षणाला बदलत असतात. या अभ्यासाच्या निमित्ताने चालू घडामोडी आपोआपच समजतात. पहिल्या पेपरमध्ये राजकीय संबंध, न्याय, समानता, हक्क, लोकशाही, सत्ता या संकल्पना विविध राजकीय विचारसरणी, भारतीय राष्ट्रवाद, राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्ये व संघराज्याची रचना, नियोजन, पक्षपद्धती व सामाजिक चळवळी यांचा समावेश होतो. पेपर-२मध्ये जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप, संयुक्त राष्ट्र संघ, असंलग्न राष्ट्रांचे चळवळ, मानवी अधिकार आदींचा समावेश होतो.
परीक्षेपर्यंत अभ्याससिद्धांताद्वारे (थीअरी व उपाययोजना) राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास करावा लागतो. हा विषय तसा डिमांडिंग आहे. भारताची राज्यव्यवस्था व तिच्यातील सिद्धांत व वास्तवातील फरक जणून घेऊन त्याचे विश्लेषण करणे आवश्यक असते. एकदा एखाद्या गोष्टीकडे संविधानिक पद्धतीने बघायची दृष्टी विकसित झाली की, मग या विषयाचा सूर गवसला, असे म्हणता येईल. हा विषय सातत्याने यशोशिखरावर आहे. तरीही काही पेच आहेतच. एक तर या विषयाचा अभ्यासक्रम व आवाका खूप मोठा आहे. एवढा मोठा विषय सर्वांनाच झेपतो, असे नाही. त्यासाठी वाचन खूप करावे लागते व चालू घडामोडी सातत्याने अपडेट कराव्या लागतात. विविध वेबसाइट व मासिके यांच्या सहाय्याने हा विषय शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यासावा लागतो. असा हा विषय काहींना सोपा तर काहींना जड जाऊ शकतो.
मानव वंशशास्त्रमाणसाचा जैविक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास म्हणजे मानव वंशशास्त्र असे आपण म्हणू शकतो. हा तसा अलीकडच्या काळात उदयाला आलेला विषय आहे. परदेशात यावर जितके काम झाले आहे, तितके भारतात झाले नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम संक्षिप्त स्वरूपाचा आहे. इथे मानवशास्त्रीय दृष्टिकोन व आजुबाजूच्या केसस्टडीचा मेळ घालून अभ्यासाला सामोरे जावे लागते.
पेपर-१मध्ये सामाजिक, सांस्कृतिक मानव वंशशास्त्र आहे. तर, पेपर दोनमध्ये भारतीय मानव वंशशास्त्र अभ्यासाला आहे. फिजिकल अन्त्रेपोलोजिस्ट हा भाग तथ्यात्मक स्कोअरिंग मानला जातो. आकृत्या, तक्ते, विषयाचे वैज्ञानिक स्वरूप जपता येते. हा विषय सामान्यतः विज्ञान विषयांच्या पदवीधरांमध्ये लोकप्रिय आहे. या विषयाचे अभ्याससाहित्य इंग्रजीत असून, मराठीत तुलनेने कमी उपलब्ध आहे.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
विषयांची मिनी परेड...(लेख क्र . २५)
वैकल्पिक विषय निवडताना कोणकोणते विकल्प येतात व कोणत्या संकल्पांनी त्यांच्यावर मात करता येईल, याचा आढावा घेतला. आता आपण या विषयांची एक मिनी परेड करू या.
अटेन्शन
उमेदवारांना आयोग विषय निवडीचे वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध करून देतो. जो विषय लहानपणापासून आवडता होता, पण खोलात जाऊन शिकायची संधी मिळाली नव्हती, ती संधी यूपीएससीची परीक्षा मिळवून देते. आपण काही लोकप्रिय वैकल्पिक विषयांचा थोडक्यात आढावा घेऊ. जर नुकताच लागलेला यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल बघितला तर पुढील चित्र दिसेल.
देशात पहिल्या शंभरात आलेल्या उमेदवारांपैकी १२ जणांचा विषय समाजशास्त्र व भूगोल होता. ११ जणांचा विषय लोकप्रशासन, ८ जणांचे साहित्य विषय, ७ जणांचा राज्यशास्त्र व मानववंशशास्त्र, ५ जणांचा कायदा व अर्थशास्त्र तर ४ जणांचा गणित आणि इलेक्ट्रिक अभियांत्रिकी होता. दोघांचा भौतिकशास्त्र, इतिहास व वाणिज्य, एकाचा मेडिकल सायन्स तर एकाचा मानसशास्त्र हा विषय होता.
समाजशास्त्र
या वर्षी देशात चौथ्या आलेल्या वंदना राव या विद्यार्थिनीचा विषय म्हणजे समाजशास्त्र. भारताइतकी धर्म, वर्ण, जाती यांची गुंतागुंत जगात कुठेच नाही. त्यामुळे हा विषय शिकायला खूप मजा येते व त्याची मांडणी करणे तर त्याहून जास्त मजेशीर असू शकते. नेहमीप्रमाणे पेपर पहिला हा विविध उपपत्तिनी (theory) भरलेला आहे. तर पेपर दोनमध्ये उपयोजित (applied) समाजशास्त्र आहे. ते दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात. एकातून सैद्धांतिक संरचना कळते व दुसऱ्यातून प्रत्यक्ष समाजाची इमारत कशी आहे, याचे आकलन होते. हा विषयच असा आहे की यात अंतिम निष्कर्ष निघालेले नाहीत. त्यामुळे प्रश्न हे खुल्या स्वरूपाचे (open ended) असतात
समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम तसा मर्यादित आहे व कोणताही पदवीधर तो घेऊ शकतो. यामुळे अनेकांचा हा डार्क हॉर्स ठरला आहे. सामान्य अध्यायनातही 'भारतीय समाजाचा अभ्यास' नावाचा धडा असल्याने समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय सामान्य अध्ययनाला पूरक ठरतो. पण याचा अर्थ सगळ्यांनाच हा विषय सोपा जाईल, असे अजिबात नाही. स्वत:चे चिंतन हवे व वरवर सोप्या वाटणाऱ्या या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची तयारी हवी.
भूगोल
भारतात पहिल्या आलेल्या इरा सिंघलचा वैकल्पिक विषय भूगोल होता. महाराष्ट्रातून तिसऱ्या आलेल्या अभिजित शेवाळे याचाही हाच विषय होता. भूगोल हा विषय विज्ञान आणि मानव्यविद्या यांच्या सीमेवर मोडतो किंवा आपण असे म्हणुया की, हा कलाशाखेतील वैज्ञानिक विषय किंवा विज्ञान शाखेतील मानव्य विषय आहे. एकाच वेळी प्राकृतिक भूगोल, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, लोकसंख्येचा अभ्यास असे सैध्दांतिक धडे आहेत, तर त्याचवेळी संस्कृती, वसाहती, राष्ट्रीय भूगोल असे मानवी घटक आहेत. हा विषय सामान्य अध्ययनातही महत्त्वाचे स्थान राखून आहे. किंबहुना आता पूर्व व मुख्य परीक्षेत पर्यावरण हा घटक अभ्यासक्रमात जोडला आहे व त्याचे महत्व उत्तरोत्तर वाढत चालले आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी भूगोल पूरक ठरतो.
भारत या खंडीय देशात भौगोलिक वैविध्य चकित करणारे आहे. एकीकडे वाळवंट तर दुसरीकडे हिमाच्छादित प्रदेश तेव्हा समाजशास्त्राप्रमाणे भूगोल विषय खूप काही शिकवून जातो. या विषयातला बराचसा भाग हा संकल्पनात्मक आहे. आकृत्या, नकाशे, आलेख यांचे महत्व खूप आहे. त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचा अभ्यास आवडतो, त्यांना भूगोल सोयीचा ठरतो. ज्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी विज्ञान विषयाची आहे, त्याचा भूगोल या विषयाकडे नैसर्गिक कल दिसून आला आहे. हा विषय कमीत कमी संदिग्धता ठेवतो, हे त्या मागचे एक प्रमुख कारण असावे. विषयाकडे दुसऱ्या बाजूने पाहिले तर मोठा अभ्यासक्रम काहींना आटपत नाही. कधीकधी संकल्पना स्पष्ट होत नाही व खूप अभ्यास करूनही आऊटपुट काहीच नाही, अशी ही स्थिती येते.
लोकप्रशासन
यावर्षी २५वी रँक असणाऱ्या उमेदवाराचा लोकप्रशासन हा विषय होता. जीन ऑस्टीन यांनी म्हटल्याप्रमाणे 'भारतातील लोकप्रशासन (Indian Administrative) ही फक्त कामकाजाची संरचना नसून विकासाचे वाहन आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्रशासन फक्त सुविधा पुरवणार (facilitator) नसून बदलांचे प्रतिनिधी (change agent) असतात. भारतीय प्रशासनाची स्टीलफ्रेम माथ्यापासून पायथ्यापर्यंत कशी आहे यांचा अभ्यास या विषयात मोडतो, सिद्धांत व उपाययोजना या दोन्ही अंगानी. सामान्य अध्ययनातील बराचसा अभ्यासक्रम आता प्रशासनातील धोरणे, ग्रामीण विकास, कायदा व सुव्यवस्था यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे लोकप्रशासन सामान्य अध्ययनाला चांगलाच पूरक आहे. विषयाची उत्तरे जर चालू घडामोडीला जोडून घेतली तर परीक्षकाला प्रभावित करता येते. त्यामुळे रोजचे वर्तमानपत्र, योजना, कुरुक्षेत्र, आयआयपीएचे जर्नल, वेतन आयोगाच्या शिफारसी यांचे विषयांच्या दृष्टीने वाचन केले तर चांगले.
विषयाचे कोणते घटक अडचणीचे ठरू शकतात, हे बघितले तर अभ्यासक्रम छोटा वाटला तरी अभ्यासक्रमातील कोणत्याही छोट्या घटकावर मोठे प्रश्न तयार करून टाकण्याची चाल आयोग खेळतो. त्यामुळे लँडमाइन्स पेरल्या असाव्यात तसे अचानक प्रश्न समोर येतात. प्रशासकीय दृष्टिकोनातून उत्तरे लिहावी लागतात. पण हा प्रशासकीय दृष्टिकोन म्हणजे काय व तो कसा आणायचा हे अनेकांना उमगत नाही.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times