नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Sunday, 9 August 2015

14) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

अभ्यासाचे जंतरमंतर .....( लेख क्र . १४)

अभ्यासाचे जंतरमंतर
आपण अभ्यासाचे जे चार कोन त्यांची चर्चा सुरू केली होती. ते म्हणजे वाचन, नोट्स, उजळणी व सराव. त्यातील नोट्सची चर्चा आपण आधी पूर्णत्वाला नेऊ. नोट्स काढताना त्या वेगळ्या कागदांवरच काढल्या पाहिजेत असे काही नाही. ते वेळखाऊ वाटत असेल तर एखादे पुस्तक प्रमाण मानून त्यातच अधोरेखित करायचे. त्या पुस्तकातच समासात नवीन मुद्दे जोडायचे. हे करताना जागा पुरली नाही तर त्या पुस्तकात बाहेरूंन पानं घालायची. या पद्धतीनेही नोट्स काढल्या तरी चालतात.

नाय, नो, नेव्हर

नोट्स काढताना कधीच त्या दुसऱ्या कोणत्या तरी नोट्सवरून काढू नका. पुस्तकातून नोट्स काढतात, नोट्समधून नव्हे. काहींना नोट्सची लपवालपवी करायला आवडते. त्याची काही गरज नाही. बिनधास्त कोणालाही दाखवा. तुमच्या नोट्स समोरच्याला काहीच उपयोगाच्या नसतात. नोट्स काढायची कोणा इतरांची शैली कॉपी करायचा प्रयत्न करू नका, स्वतःची शैली विकसित करा. किंवा ती आपोआप विकसित होत जाते. इतके सगळे नोट्सपुराण लावले आहे कारण एकदा नोट्स तयार झाल्या की स्पर्धापरीक्षेच्या इमारतीचा ढाचाच तयार झाल्यासारखे आहे. आता त्यामध्ये फक्त रंग भरायचे काम करायचे असते (तपशिल) पण ते तुलनेने सोपे असते. कोणी म्हणेल की एवढे सव्यापसव्य करण्यापेक्षा थेट लक्षातच ठेवायचे ना वाचलेले! ही कल्पना वाटते तेवढी सोपी नाही. अख्खेच्या अख्खे पुस्तक पाठ करून परीक्षेला जायला स्पर्धापरीक्षा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा नव्हे. तिथे अभ्यासक्रम अगदीच मर्यादीत असतो. स्पर्धापरीक्षेत अभ्यासक्रमाचा विस्तार (range) खूप मोठा असतो. अशावेळी निव्वळ पाठांतर करून लक्षात ठेवायचा पर्याय बाद होतो. तेव्हा सेकंड बेस्ट पर्याय म्हणजे नोट्स काढणे.

अचूकतेच्या वाटेवर

नोट्सचा आणखी एक फायदा म्हणजे दोन वेगळया गोष्टीतील दुवे शोधून (linkages) त्या गोष्टीतील आंतरसंबंध जोडणे सोपे जाते. नोट्स नसतील तर नुसत्या मनातल्या मनात ही उलाढाल करणे जड जाते. नोट्समुळे होणारा एक मोठा मानसिक फायदा म्हणजे काहीतरी साध्य केल्याचे समाधान. एरवी अभ्यास ही अमूर्त प्रक्रिया आहे. अशावेळी नोट्स नसतील व एखादयाने प्रश्‍न विचारला की गेले चार महिने काय केले? तर निश्‍चित सांगता येत नाही. पण नोट्स असतील तर त्या पुरावा म्हणून मांडता येतात.

नोट्स काढताना एखाद्या प्रकरणाचे प्राण/मर्म काढून घ्यावे लागते. आपोआपच त्या विषयाची मनात चांगली घुसळण होते, तेव्हाच मर्म सापडते. या प्रक्रियेतच अर्धा अभ्यास होतो. नुसतं वाचून पुढे जाण्यापेक्षा ही प्रक्रिया जास्त फलदायी ठरते.

नोट्स लिहून काढण्याच्या प्रक्रियेतून तो अभ्यास आपल्या शरीरात भिनतो. writing makes man perfect असं ते म्हणतात, ते याच अर्थाने.

नोट्स लिहिण्याच्या निमित्ताने हात लिहिता होतो व स्वतःची एक लेखनशैली विकसित होते. तिचा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत खूपच फायदा होतो. एरवी मुख्य परीक्षेत तीन तासांत पाच हजार शब्द लिहिणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!

कधी कधी स्पर्धापरीक्षेत असे होते की एखादी पोस्ट मिळते पण ती खालची असते व उमेदवाराला इच्छा असते की आपण पुन्हा नशीब अजमावून पाहू. म्हणून तो पुन्हा बसतो. पद कायम ठेवून बसता येते. त्यामुळे बहुसंख्य यशस्वी उमेदवार पुन्हा बसतातच. अशा वेळी पुन्हा सगळे नव्याने वाचायला वेळ नसतो. पण जर नोट्स हाताशी असतील तर कमी वेळातही सुधारणा करून वरचे पद हस्तगत करता येते.

या सर्व चर्चेतून ही गोष्ट स्पष्ट होईल की नोट्स काढणे हा जरी वरवर लाँगकट वाटला तरी प्रत्यक्षात तो शॉर्टकट आहे. नोट्स काढल्याने अभ्यासक्रमावर जी पकड येते ती इतर कशानेही येत नाही.

उजळणीचे कर्मकांड

आतापर्यंत आपण दोन टप्पे पार पाडले. वाचन व नोट्स. आता तिसऱ्या टप्प्याकडे वळू, ती म्हणजे नोट्सची उजळणी. नोट्सबद्दलचा आग्रह बघून काही उमेदवार रडतखडत का होईना नोट्स काढतात पण मग त्यांची उजळणी करायला कंटाळा करतात. जर वेळोवेळी उजळणी केली नाही तर नोट्स काढूनदेखील फायदा नाही.

उजळणी म्हणजे नोट्स फक्त वाचून काढायच्या. साधारणतः आठवड्याने किंवा दहा दिवसांनी हे कर्मकांड न चुकता करायचे. त्यादिवशी नवीन वाचन नाही झाले तरी चालेल पण उजळणी करायचीच. नोट्स जर थोडक्यात काढल्या असतील तर सगळ्या नोट्सचीसुद्धा एका दिवसात सहज उजळणी होते. उजळणी करताना एकेक शब्द, एकेक वाक्य वाचताना डोळ्यासमोर पुस्तकाचे पान तरळू लागते. अनेक खिडक्या उघडतात. अर्थात हे सगळे स्वतःच्या नोट्स उजळणी करताना होते. दुसऱ्याच्या रेडीमेड नोट्सची उजळणी करायला घेतलीत खिडक्या उघडणार नाहीत तर बंद होतील.

उजळणी करताना अधोरेखित केलेले, टिपणे काढलेले असे सर्वच वाचायचे व तेही अगदी नियमितपणे. जसे रंग देणारे रंगाचा पहिला हात दिल्यानंतर काही दिवसांनी दुसरा हात देतात. मगच रंग पक्का बसतो. तसाच हा प्रकार आहे. उजळणी केल्यानेच अभ्यास पक्का होतो.

उजळणी केल्याने शब्द व त्यांचा क्रम डोळयात फिट बसतो, विसरू म्हणता विसरता येत नाही. पाठांतराला उजळणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- उजळणीने उजळतील दाही दिशा

No comments:

Post a Comment