नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Sunday 9 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

अभ्यासाची बाराखडी .....( लेख क्र . १3)

अभ्यासाची बाराखडी

दिसामाजी काही तरी लिहावे

आपण जे काही वाचतो त्याच्या नोट्स काढणे अत्यंत आवश्यक आहे. मागच्या प्रश्नप​त्रिका अभ्यासक्रम समोर ठेवून त्या प्रकाशात नोट्स काढायच्या. काहींना हे काम वेळखाऊ व अनेकांना कंटाळवाणे वाटते. नुसतं वाचायला मजा येते व वाचन भराभर होते. त्यामुळे अनेक पुस्तकांचा फडशा पाडून स्वतःलाच खूप वाचल्याचे समाधान देता येते. पण हे समाधान फसवं असतं. इतकी पुस्तकं वाचली की यश असा काही स्पर्धापरीक्षांमध्ये फॉर्म्युला नाही आहे. त्या पुस्तकातील किती समजलं व त्यातील किती लक्षात राहिलं हे निर्णायक ठरतं. तेव्हा संख्येचा नाद सोडा. कमी पुस्तके वाचली तर चांगली ज्ञानप्राप्ती होऊ शकतेच. शेवटी जास्त अभ्यास करून कमी समजून घ्यायचं नाही, तर कमी अभ्यासात जास्त समजले पाहिजे. थोडक्यात नोट्स काढल्या पाहिजेत. अगदी रोजच्या वृत्तपत्राच्याही नोट्स काढल्या पाहिजेत. पाठपुस्तकांच्या व संदर्भ ग्रंथांच्याही.

नो शॅार्टकट्स

यावर काही जण असा शॉर्टकट काढतील आदल्या वर्षी यशस्वी झालेल्या मुलांच्या नोट्स रेडीमेड वापरल्या तर, तर हा टप्पाच गाळता येईल. सावधान! हा शार्टकट लाँगकट ठरू शकेल. कारण प्रत्येक जण आपापल्या आकलन क्षमतेप्रमाणे आपल्या भाषेत नोटस् काढतो. त्यामुळे एकाचे कपडे जसे दुसऱ्याला फिट होत नाहीत तसे एकाच्या नोट्सचा दुसऱ्याला उपयोग नाही. कारण ज्याने नोट्स काढल्या असतात त्याने 'त्याला' महत्त्वाचे वाटणारे, 'त्याच्या' लक्षात न राहणारे मुद्दे वेगवेगळया आकृत्या काढून नोट्स मध्ये घेतले असतात. इथे धोका असा आहे की त्याने ज्या नोट्स काढल्या आहेत ते तुम्हाला आधीच माहिती आहे व जे त्याने नोट्समध्ये उतरवले नाही ते तुम्हाला माहीत नाही. (mismatch) खेळ खल्लास. सारांश अशा की ज्याच्या नोट्स त्यालाच कळतात. इतरांनी त्या वाचून काडीभरही फायदा होत नाही. स्वतःच्या नोट्स स्वतःच बनवलेल्या बऱ्या.

नोट्स काढायचे तंत्र

आता नोट्स कशा काढायच्या? तर नोट्स काढायच्या वेगवेगळया पद्धती आहेत. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे त्या वापरू शकतो. पारंपरिक पद्धत म्हणजे वेगळ्या पानांवर नोट्स काढायच्या. वहीत काढण्यापेक्षा सुट्या पानांवर काढणे बरे पडते. कारण त्याचे फायलिंग करणे सोपे जाते. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तरपत्रिकेवर रेघा नसतात. त्यामुळे नोट्स काढतानाच रेघा नसलेल्या कागदांवर नोट्स काढल्या तर आपोआपच सराव होतो. ज्या पेनने मुख्य परीक्षा लिहीणार त्याच पेनने नोट्स काढायच्या. हे आपण फारच तपशिलात जातो असे एखाद्याला वाटेल. पण म्हणतात ना, God is in details. बऱ्याच वेळा उमेदवार नोट्स काढताना साधे पेन वापरतात व परीक्षेआधी महागाचे भारी पेन घेतात. पण त्या पेनची सवय नसल्याने चुकल्याचुकल्यासारखे वाटते व एकाग्रता भंगते.

मर्मबंधातली ठेव

नोट्स काढायच्या म्हणजे एखादया गोष्टीचे मर्म मुठीत पकडणे. त्यामुळे संपूर्ण पानाचे किंवा धड्याचे मर्म जाणून ते नोट्स मध्ये पकडता आले पाहिजे. नोट्स वाचल्या की तो धडा जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे. हे ज्यांना कळत नाही, ते नोट्स काढताना पट्टी घेऊन बसतात व सगळ्या ओळी अधोरेखित तरी करतात किंवा जशाच्या तशा नोट्समध्ये उतरवून काढतात. याचा उपयोग नाही. नोट्स नेहमी थोडक्यातच पाहिजेत. एखादया धड्यातील मर्माचा मुद्दा (key point) एखाद्या उताऱ्यातील मर्माचे वाक्य (Trigger sentence) व एखाद्या वाक्यातील मार्मिक शब्द (trigger word) ओळखता आला पाहिजे. तो तसा ओळखून नोट्समध्ये घ्यायचा. अख्खीच्या अख्खी वाक्य उतरवायची गरज नाही. संकल्पनांना छोटे रूप दयायचे. असे करताना आकृत्या, फ्लो चार्ट, बाण यांचा सढळ वापर करायला काहीच हरकत नाही. असंही नुसते शब्द वाचून वाचून कंटाळा येतो. आकृत्यांच्या सहाय्याने लक्षात ठेवणे सोपे जाते. नोट्स काढताना अक्षरही अगदी मोत्यासारखे आले पाहिजे अशी काही गरज नाही. आपल्याला नंतर वाचता आले म्हणजे झाले.

काळा, निळा, हिरवा अशा वेगवेगळया रंगाचे पेनही वापरायला हरकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपे जाते. नोट्स काढताना एकाच भाषेत काढल्या पाहिजे असेही काही नाही. इंग्रजीतून नोट्स काढणारांनी अधूनमधून देवनागरी शब्द, वाक्य लिहिली तरी चालतील. मराठीतून नोट्स काढणारांनी रोमन लिपीचा वापर केला तरी चालेल. तेवढेच ते आकर्षक होते व लक्षात ठेवायलाही सोपे जाते.

नोट्स थोड्या सुटसुटीत काढायच्या. दोन्ही बाजूला थोडी जागा सोडायची. कारण आपण काढलेल्या नोट्स काही अचूक नसतात. ती फक्त एक बाह्य संरचना असते. जेव्हा त्या विषयाबद्ल नवीन माहिती मिळते तेव्हा ती त्या नोट्समध्येच अपडेट करायची. हे अपडेट करायचे काम सातत्याने करायचे व तिथेच करायचे. उदा. तुम्ही अकबराच्या कारकिर्दीवर नोट्स काढल्या. तर त्यातच अपडेट करत जायचे. प्रत्येक वेळेला नवीन माहिती मिळाली की वेगळ्या नोट्स काढायच्या नाहीत. तसे केले नंतर नोट्सचे व्यवस्थापन जड जाईल व शिवाय असे वाटू लागले की इतिहासात बरेच अकबर होऊन गेले. याचाच अर्थ नोट्सचा एकच सेट असला पाहिजे.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- अभ्यासाचे जंतर मंतर

No comments:

Post a Comment