मुख्य परीक्षेचे अंतरंग .....( लेख क्र . १२ )
अभ्यास म्हणजे चार गोष्टींचे एकात्मिक रूप असते. वाचन, नोट्स, उजळणी व सराव.
संदर्भ साहित्य व पाठ्यपुस्तके
पहिला टप्पा म्हणजे वाचन. आज टीव्ही, कम्प्युटर, मोबाइल यांचा दबदबा असला, तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. अभ्यासाचे घटक व उपघटक यांच्या संदर्भात वाचन म्हणजे अभ्यासाचा पहिला टप्पा. अभ्यास साहित्य दोन प्रकारचे असते. एक संदर्भ साहित्य आणि दुसरे म्हणजे पाठ्यपुस्तके. संदर्भ साहित्य हे विस्तृत स्वरुपात उपलब्ध असते उदा. विश्वकोश. त्याचा उपयोग एखादी गोष्ट खोलात समजून घ्यायची असेल किंवा संकल्पना स्पष्ट करून घ्यायची असेल तर होतो. संदर्भ साहित्य खूप उपयोगी पडू शकते. संदर्भ साहित्य जितके दर्जेदार वापराल, तितका संकल्पनेतील गोंधळ कमी होईल. पण संदर्भ साहित्य वापरताना थोडी काळजी घ्यायला हवी. एकतर ते आपण ओळ अन् ओळ वाचू शकत नाही, कारण ते प्रचंड असते. त्यामुळे त्याचा वापर आवश्यक तितकाच केला पाहिजे. दुसरे म्हणजे संदर्भ साहित्य आपल्या सर्वोत्तम अभ्यास वेळेव्यतिरिक्त (non prime time) वेळात वाचले पाहिजे.
पाठ्यपुस्तकातील गुंतवणूक
पाठ्यपुस्तके ही आपणासाठी सर्वात महत्त्वाची आहेत. हे खरे की, स्पर्धा परीक्षांच्या जगात विद्यापीठीय परीक्षांसारखी नेमलेली पाठ्यपुस्तके नसतात. लोकसेवा आयोग कधीच कोणत्या पुस्तकांची शिफारस करत नाही. तरी आता बाजारात विविध प्रकाशनांची अभ्यासक्रमानुसार तयार केलेली चांगली पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून घेता येईल. संदर्भ पुस्तके ग्रंथालयातून आणली तरी चालतील. पाठ्यपुस्तके मात्र स्वतःची स्वत: घेतलेली बरी. कारण ती वारंवार अभ्यासावी लागतात. त्यावर अभ्यास करताना आपण अधोरेखित (underline) करतो. मोकळ्या जागेत टिपणे लिहितो. हे सर्व ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांवर करता येत नाही व करूही नका. त्यासाठी स्वतःची पुस्तके विकत घेतलेली बरी. जर ती सहज मिळत नसतील, तर इंटरनेटवरूनदेखील मागवता येतात. जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच तर लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरदेखील उपलब्ध आहेत. या पाठ्यपुस्तकांची नीट काळजी घ्या. पुस्तकांवरची गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक असते.
वाचन योग
वाचन करताना सुरुवातीलाच येणारी अडचण म्हणजे काहीच समजत नाही. एक एक ओळ लावून वाचता वाचता वेळ खूप जातो. मग प्रश्न पडतो की, कुठे तडजोड करायची? संकल्पना आत्मसात करीत बसलो, तर वेळ कमी पडतो व वेग गाठायला गेलो तर संकल्पना अर्धवट राहतात, असा हा तिढा आहे. अर्थात सुवर्णमध्य गाठला पाहिजे. दोन्ही महत्त्वाचे आहे हे ओळखून अभ्यास केला पाहिजे. तरीही त्यातल्या त्यात वेग जास्त महत्त्वाचा आहे. किती वेळात अभ्यास साहित्याचा फडशा पाडायचा आहे, हे एकदा ठरवले की, आपोआप आकलनशक्तीही वाढत जाते. थोडक्यात थोडे ताणल्याशिवाय काम होत नाही. वाचनाचे वेळापत्रक आखताना आपला दिवसातील सर्वोत्तम वेळ (prime time) कोणता हे शोधून काढा. तो कोणाचा सकाळी ८ ते १० असू शकेल, तर कोणाचा मध्यरात्री १ते ३ असू शकेल. प्रत्येकाच्या शरीराचे जीवशास्त्रीय घड्याळ (biological clock) वेगवेगळे असते. त्यामुळे स्वत:चा सर्वोत्तम वेळ स्वत:च शोधून काढायला हवा. त्या वेळात अभ्यासाचा जो भाग समजायला कठीण वाटतो तो वाचा. या वेळात सर्वोत्तम एकाग्रता असते त्यामुळे अवघड गोष्टीही सोप्या होतात. आवडीचे विषय इतर वेळी (non prime time) करा. आवडीचे असल्याने आपोआप एकाग्रता वाढते व तेही होऊन जातात.
वाचन करताना एकाग्रता महत्त्वाची आहे. जर एकाग्रता सारखी ढळली, तर अमूर्त संकल्पना समजावून घेणे कठीण होऊन बसते. आज ही समस्या मोबाइल, व्हॉटसअॅप यामुळे वाढली आहे. जेव्हा मोबाइल नव्हते, तेव्हा एकदा वाचनालयात बसलेला विद्यार्थी संध्याकाळी घरी गेला की, मगच त्याला दिवसभरात काय झाले ते कळे. आता सेकंदा- सेकंदाला जगाशी संपर्क ठेवायच्या नादात अभ्यासाशी संपर्क तुटतो. तेव्हा अभ्यास करताना मोबाइल बंद ठेवा किंवा निदान सायलेंट मोडवर ठेवून बॅगेत ठेवून द्या. संपर्क ठेवणे ही गरज असली, तरी तिचे व्यसनात रुपांतर होता कामा नये. नाहीतर मग आता नवीन म्हण तयार झालीच आहे 'लवकर निजे, लवकर उठे, त्याच्याकडे इंटरनेट नसे'.
एकाग्रतेचे रहस्य
एकाग्रता प्राप्त होण्यासाठी मनोमन निश्चय करा की, मला हे एकच आयुष्य मिळाले आहे. त्यामुळे मी जे काही पाहीन, वाचेन, ऐकेन ते पूर्ण एकग्रतेनेच. याच निश्चयात अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. ते म्हणजे एक पुस्तक किती वेळा वाचायचे? दहा पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहावेळा वाचणे चांगले, असे म्हटले जाते. ते बरोबरही आहे. पण इथे थोडा फरक करावा लागेल. संदर्भ साहित्य एकदाच वाचा. पाठ्यपुस्तके एकाहून जास्त वेळा वाचायला हरकत नाही. पण म्हणजे ती दहावेळा वाचेन, असा निश्चय करायचा, असाही अर्थ होत नाही. शेवटी ज्ञान हे साध्य आहे व पुस्तके हे फक्त साधन आहेत, हे विसरून चालणार नाही.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment