लॉग-इन : स्पर्धा परीक्षांचे ( लेख क्र . २ )
यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक सरकारी नोकऱ्यांची उत्तम संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहे. पण या संधी नेमक्या कशा मिळवाव्यात याविषयी हजारो विद्यार्थी अजूनही अंधारात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारी नोकऱ्यांचे हे शिवधनुष्य यशस्वीपणे कसे पेलावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आजपासून 'यशाचा मटामार्ग' या शैक्षणिक उपक्रमांतर्गत लेखमाला सुरू करीत आहे. सोमवार ते शुक्रवार प्रसिद्ध होणाऱ्या या लेखमालेत यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, विषयांचा अभ्यास कसा करावा, परीक्षांच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन या क्षेत्रातील तज्ज्ञ करणार आहेत.यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांबाबत आजही अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग नेमका कसा प्राप्त करावा, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची नेमकी पद्धती काय असते, ती कशी द्यायची, त्याचे वेगवेगळे टप्पे कोणते, यांसारख्या अनेक प्रश्नांचा आढावा घेऊ या.
सर्वांची लहानपणीची स्वप्ने वेगळीच असतात. पण जसे आपण मोठे होतो, तशी क्षितिजे विस्तारत जातात. लहानपणीची स्वप्ने छोटी असतात, मोठेपणीची मोठी. अशीच एक स्वप्नवत संधी म्हणजे तरुणपणीच उच्चपदस्थ सरकारी अधिकारी म्हणून काम करणे. तुम्ही जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, इन्कम टॅक्स आयुक्त, अबकारी आयुक्त अशा पदांबद्दल ऐकले असेलच. किमान तुम्ही सुती कपडे, फॉर्मल पँट व ट्राऊजर घातलेला एखादा अधिकारी मोटारीतून ऐटबाजपणे उतरताना बघितलाच असेल. निदान त्यांचा दबदबा तर कानी नक्कीच आला असेल.
अनेकदा पदवीपूर्वी स्वप्रतिमा व स्वप्ने याबद्दल चित्र स्पष्ट नसते. किंबहुना अनेकदा शैक्षणिक महत्त्वाकांक्षा हळुहळू जागी होते. पण तोपर्यंत काही क्षेत्रे आधीच मागे पडलेली असतात. अशावेळी पुढे गेलेल्यांना गाठण्याची संधी म्हणजे स्पर्धा परीक्षा. रॉकेट लाँचिंगच्या स्थानकावरून जसे रॉकेट अवकाशाकडे उसळी घेते, तशी मोठी झेप यातून घेता येते. सरकारी क्लास वन व सुपर क्लास वन अशा प्रकारची पदे त्यातून मिळतात. एक स्थिर व तरीही आव्हानात्मक करिअर तुमच्यापुढे उभे राहते. सरकारी काम करताना लोकांसाठी थेट व परिणामकारक बदल घडवून आणता येतात. समाजात किर्ती व आदर प्राप्त होतो. या सदरातून सरकारी सेवांच्या स्वप्नवत करिअरची माहिती आपण घेणार आहोत. करिअर हे एक दीर्घकालीन उद्दीष्ट असते व तिथे ठरवून पोहचावे लागते.
मंझिले अपनी जगह है।
रास्ते अपनी जगह।
ध्येय निश्चित केल्यास वाटचाल करणे सोपे आहे. आयएसएस, आयपीएस, परराष्ट्र सेवा, राजस्व सेवा अशा सरकारी सेवेत काम करणे म्हणजे थेट देशसेवाच! मात्र मग स्वप्न व वास्तव यातील दरी कशी ओलांडायची? ती ओलांडता आली नाही तर? अनेक प्रश्न तरुण-तरुणींसमोर उभे राहतात. आपण प्रमुख प्रश्न व त्यांची उत्तरे शोधून पाहू. ज्यांना पदवीपरीक्षेत खूप गुण मिळतात, त्यांनाच या परीक्षा देता येतात का? नाही. पास क्लासचे गुण असले किंवा अगदी ATKT करत पदवी झाली असेल तरी चालते. अशाप्रकारची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी यशस्वीही झाले आहेत. बदलापूरचा संजय सुतार सरासरी शैक्षणिक गुणवत्ता असलेला होता. बीएससी नापास झाल्यामुळे तर त्याचे वर्ष वाया गेले होते. पण संजय आता भारतीय परराष्ट्र सेवेत महत्त्वाच्या पदावर काम करीत आहे.
दुसऱ्या विद्यापीठाची पदवी चालते का?
होय. अगदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालते.
मराठी भाषेतून या परीक्षा देता येतात का?
हो आयएएसची परीक्षा मराठीतूनही देता येते. महाराष्ट्रातून मराठीतून परीक्षा देऊन उच्चपद प्राप्त करणाऱ्यांची मोठी परंपराच आहे. जसे भूषण गगराणी, विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, नुकताच आयपीएस झालेला प्रतीक ठुबे. बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यासाठी इंग्रजीचा सराव करावा लागतो, पण तो फारसा कठीण नसतो.
महाराष्ट्राबाहेर काम करावे लागते का?
जर परराष्ट्र सेवेत असाल तर देशाबाहेरही काम करावे लागते. एक यशस्वी विद्यार्थी नितीन येवला अफगाणिस्तानात काम करत आहे. खरोखर ते तितके कठीण नसते. सरकार सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर काम करण्याचा मुद्दा प्रामुख्याने प्रशासकीय सेवा (आयएएस), पोलिस सेवा (आयपीएस) व परराष्ट्र सेवा (आयएफएस) यांना लागू होतो. बाकी सर्व सेवांची नेमणूक आपल्याच राज्यात होते. त्यामुळे या मुद्द्याचा बाऊ करण्याचे कारण नाही.
निवड होण्यासाठी लाच द्यावी लागते का?
हा एक अगदी सामान्य गैरसमज आहे. या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अशा तटस्थ व पारदर्शक पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांकडून घेतल्या जातात. त्यांची व्यावसायिकता व सचोटी वादातीत असते. गेल्या अनेक वर्षांचा निकाल पाहिल्यास इतक्या सामान्य घरातील मुले यशस्वी झालेली दिसतील की, हा गैरसमज तिथेच गळून पडेल. नितीन जावळे आयएएस होण्यापूर्वी घाटकोपरला झोपडपट्टीसारख्या ठिकाणी एका खोलीत रहायचा. मी स्वत: त्याच्या घरी गेलेलो आहे.
अभ्यास खूप कठीण असतो का?
अभ्यास कठीण असे म्हणता येणार नाही, पण विषयांमध्ये विविधता असते. प्रश्न विचारताना चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काहींना या परीक्षा अनाकलनीय व कठीण वाटतात. पण प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केल्यास कठीण काहीच नाही. उलट या परीक्षांच्या अभ्यासातून जितके शिकायला मिळते ते इतर कोणत्याही कोर्समधून मिळत नाही. अगदी एमबीए, सीए, लॉ अशा कोर्सेसपेक्षाही या परीक्षांतून जास्त शिकायला मिळते. यातून व्यक्तिमत्वाची जी जडणघडण होते, ती अतुलनीय असते.
परीक्षेत यश मिळतेच याची खात्री काय?
जर मनापासून अभ्यास केला असेल तर पदप्राप्ती होईलच असे आपण म्हणू शकतो. पण धोका तर असतोच. पण धोका कुठे नसतो? 'If you fail to take a risk, then that itself is a biggest risk'.
तुमचे इतर मित्रमैत्रिणी काट्याकुट्यातून पायवाटेने फिरत असताना, या स्पर्धा परीक्षा तुम्हाला मात्र एक्स्प्रेस वेवर आणून सोडतात. तर मग तयार आहात या भन्नाट प्रवासासाठी? आहे धमक हे शिवधनुष्य पेलण्याची? असेल तर यापुढे आपण या सदरातून या परीक्षांचे तंत्र व मंत्र उलगडत नेऊ. जर लॉगइन केले असेल तर हा परीक्षांचा चक्रव्यूह भेदायचा पासवर्ड तुम्हाला एकेका लेखातून मिळत जाईल. म्हणतात ना...
मंझिले उन्ही को मिलती है
जिनके कदमों में जान होती है।
पंखोसे सें नही,
हौसलोंसे उडान होती है।
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment