स्पर्धा परीक्षांचा आराखडा.....( लेख क्र . ५ )
विद्यापीठीय परीक्षा या एकाच प्रकारच्या ज्ञानाची तपासणी करतात. जसे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची अकांउट्स या विषयाची. स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र अनेक विषयांचे ज्ञान तपासले जाते. अनेक विषयांची खिचडीच असते. जसे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, इतिहास, परराष्ट्र संबंध, भूगोल इत्यादी.
विद्यापीठीय परीक्षा एकरेषीय असतात. जसे, अकरावीनंतर बारावी, नंतर तेरावी अशाप्रकारे. हे टप्पे साधारणतः पाचवर्षे चालतात. पण स्पर्धा परीक्षेत पूर्व, मुख्य व मुलाखत असे तीनच टप्पे असतात व ते एका वर्षात संपतात. स्पर्धा परीक्षेत एकरेषीय प्रकार नसतो. पूर्व पार करून मुख्य परीक्षा दिली व त्यात यश आले नाही, तर परत पूर्व परीक्षा दयावी लागते. मुलाखतीपर्यंत जाऊनही अपयश आले, तर पुन्हा पूर्व परीक्षा. थोडक्यात स्पर्धा परीक्षा हा सापशिडीचा खेळ असतो. सापाचे तोंड लागले, तर पुन्हा मागे.
विद्यापीठीय परीक्षांमध्ये पास-नापास हा प्रकार असतो. स्पर्धा परीक्षांमध्ये पास-नापास अशी विभागणी नसते. एकतर पद मिळते किंवा मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठ परीक्षांसारखे पास क्लास, पहिला वर्ग असे प्रकारही नसतात.
विद्यापीठीय परीक्षांमध्ये एखाद्याया वर्षी अपयश आले, (नापास झालात तर) तर तीच परीक्षा पुन्हा देता येते. पण स्पर्धा परीक्षांमध्ये मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत पोहोचलात, तर पुन्हा तिथूनच सुरुवात करता येत नाही. मागे यावे लागते. इतकेच नाही; तर समजा तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात आणि तुमची मुख्य परीक्षेची पुरेशी तयारी नाही, तर तुम्ही पूर्व परीक्षेचा निकाल तसाच ठेवून पुढच्या वर्षीची मुख्य परीक्षा दिली तर चालेल का? तर नाही. त्या वर्षाची स्पर्धा त्या वर्षाची असते. त्यामुळे एकाच वर्षात पूर्व, मुख्य व मुलाखत हे तीनही अडथळे पार पाडावे लागतात. या तीनपैकी कोणताही एक टप्पा तुम्ही कोणत्याही कारणाने देऊ शकला नाहीत, तर पुढच्या वर्षी पुन्हा पूर्व परीक्षा.
विद्यापीठीय परीक्षांमध्ये पास कितीला होणार, याची टक्केवारी ठरलेली असते. तसे स्पर्धा परीक्षांचे नसते. प्रत्येक टप्प्यात किमान गुण किती मिळाले पाहिजेत, हे निश्चित केले असले, तरी कमाल गुण निश्चित केलेले नसतात. त्यामुळे किमान गुण मिळाल्यावर पुढे जात जास्तीत गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. समजा, मागच्या वर्षी यूपीएससीमध्ये ७७५ गुणांचा कटऑफ लागला होता. मग यावर्षी तो तितकाच लागेल, याची खात्री काय? तर काहीही नाही. ते पेपर किती कठीण/सोपे होते, स्पर्धा किती तीव्र होती, यावर अवलंबून राहील. थोडक्यात, गुणांचा नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षेनेच धावावे लागते.
विद्यापीठीय परीक्षांमध्ये एखाद्या वर्षी सगळेच्या सगळे नापास झाले, असे होऊ शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये असे होत नाही. किमान गुण मिळाल्यानंतर जे कोणी उमेदवार असतात, त्यांच्या गुणांनुसार क्रम लावून पदे भरली जातात. मग एखाद्या वर्षी खूप जास्त गुण मिळालेले उमेदवार होते किंवा एखाद्या वर्षी कमी गुण मिळालेले उमेदवार यशस्वी झाले, या चर्चेला तसा काही अर्थ नसतो. त्या त्या वर्षीच्या स्पर्धेत सर्वोत्तम असतात, त्यांची निवड होते. ही चर्चा थोडी पुढे नेली, तर लक्षात येईल की, स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर सोपे होते की कठीण या चर्चेलाही अर्थ नसतो. पेपर कठीण असतील, तर सर्वांनाच कठीण जातात व सोपे असतील तर सर्वानांच सोपे. उमेदवार इतर स्पर्धकांवर कशी मात करतो, हे महत्त्वाचे असते. याचाच अर्थ, आयोग उमेदवारांचे गुण खरे तर बघतच नाही. त्याच्याशी आयोगाचे तसे देणे-घेणे नसते. एखाद्या वर्षी १,२०० जागा असतील, तर कोणते १,२०० उमेदवार निवडले जाणार? तर त्या वर्षी ज्यांनी सर्वोत्तम गुण मिळवत पहिल्या १,२०० जणांमध्ये स्थान पटकावले आहे ते.
- भूषण देशमुख
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)
सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times
No comments:
Post a Comment